वजन कमी करण्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी अनेकदा लोक भरपूर व्यायाम करतात. पण माहितीअभावी केलेल्या व्यायामामध्ये मोठ्या चुका होतात त्याचे शरीरावर दुष्परिणाम होणार.
व्यग्र दिनक्रम ः
व्यायाम करताना काही चुका होतात, त्यामुळे सर्वच दिनक्रम बदलून जातो. व्यायामामध्ये घाईगडबड किंवा जबरदस्ती करणे म्हणजे संकटाशी खेळ करण्यासारखे आहे. व्यायाम करण्यातला अतिउत्साह आणि लवकर परिणाम दिसावे यासाठी घाई केल्याने व्यायाम करताना शरीराची ठेवण आणि दमसास किंवा स्टॅमिना याच्याविषयी काही चुका होतात ज्याचे दुष्परिणाम काही काळानंतर शरीरावर दिसतात.
यूट्यूब आणि इतर संकेतस्थळावर व्यायाम करण्याविषयी माहिती उपलब्ध आहे ती सहज मिळतेही. पण कोणत्याही तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या अशा व्यायामाचे फायदे होण्यापेक्षा नुकसानच होते. व्यायामात झालेली लहानशी चूकही थेट बेड रेस्ट घेण्याची वेळ आणू शकते. त्यामुळे व्यायाम करताना काही चुका ज्याचे परिणाम मोठे असू शकतात त्या टाळायला हव्यात.
कोपर वर उचलणे ः
बेंच प्रेससारखा व्यायाम करताना कोपर खूप वर उचलल्यास खांद्यांला नुकसान होते. त्यामुळे जखमही होते. त्यामुळे स्ट्रेच करताना कोपर छाती जवळ ठेवावे जेणेकरून संतुलन ठेवता येईल. कोपरे खूप जास्त पसरवले तर त्याने नुकसान होऊ शकते.
लांब पावले टाकणे ः
उडी मारताना खूप लांब अंतरावरून मारल्याने कदाचित थेट अंथरूणावर पडावे लागेल. त्यामुळे उडी मारताना लहान अंतरावर मारावी.
ट्रेडमिलवरील वेग ः
ट्रेडमिलवर 7 ते 8 च्या वेगाने धावल्यास गुडघ्याच्या लिगामेंटच नव्हे तर गुडघ्याची लवचिकता खराब होते. अनेकदा गुडघ्यात चमक आल्याने व्यायाम थांबवावा लागतो.
टाचांवर धावणे ः
टाचांवर जॉगिंग करणे हे नक्कीच त्रासदायक ठरते. टाचांवर जॉगिंग केल्याने घोटा आणि गुडघे याबरोबर संपूर्ण पायावरही ताण येतो. त्यामुळे लवकर थकवा येतो पण व्यायामातही अडथळा येतो.
पाठ वाकवणे ः
डेडलिफ्टसारखा व्यायाम करताना पाठ वाकवताना लक्ष द्यावे, अन्यथा मणक्यातील चकत्यांना नुकसान पोहोचू शकते.
नेक पुशअप ः
पुशअप्स करताना किंवा स्क्वॅटस करताना मान खाली केल्यास सर्व्हायकलचा त्रास होऊ शकतो. वजन उचलण्याचे व्यायाम करताना केवळ दिखाऊपणा करताना जास्त वजन किंवा डंबेल उचलण्याने छातीच्या नसा खेचल्या जाऊ शकतात.
व्यायाम करताना या सर्व लहान पण मोठ्या परिणाम करणाऱ्या गोष्टी जरूर लक्षात ठेवाव्या. जेणेकरून आपले वजन कमी करण्याचे लक्ष्य साध्य होईल. तसेच शरीर अवयवांचे नुकसानही होणार नाही.
व्यायाम हा नेहमी योग्यरितीनेच केला पाहिजे. तसेच प्रत्येक वेळेस व्यायाम करताना आपली मन:स्थिती उत्तम असेल याचीही काळजी घेतली गेली पाहिजे. चुकीचा व्यायाम करण्यापेक्षा व्यायाम न केलेला परवडेल. योगासने करतानाही हेच ध्यानात ठेवणे गरजेचे असते. आपण शरीराच्या बलासाठी व्यायाम करतो तर योगासनांनी शरीरामधील विविध यंत्रणांना कार्यक्षम केले जाते. व्यायाम करताना घाम येणे स्वाभाविक आहे; पण योगासने करताना घाम येत असेल, तर नक्कीच काहीतरी चुकते आहे.