सध्याच्या वेगवान जगात वाहनाचा वापर अनिवार्य ठरू लागला आहे. त्यामुळेच दुचाकी, चारचाकी वाहन चालवणाऱ्यांची संख्या बरीच वाढल्याचे दिसते. तरी वाहन चालवताना काही गोष्टी अवश्य लक्षात घ्यायला हव्यात. सर्वसाधारणपणे गाडी चालवणारे लोक स्वत:च्या सोयीप्रमाणे गाडीचे सीट ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतात.
हेड रेस्ट काढून टाकण्याकडे अनेकांचा कल असतो; परंतु यामुळे मानेत वेदना होऊ शकतात. वाहन चालवताना कंबरेत वेदना होतात अशीही अनेकांची तक्रार असते. तुमची सीट योग्य पद्धतीची आणि योग्य प्रकारची असावी. मुख्यत्वे सीट 100 ते 110 अंश या कोनातच असावी. त्यामुळे शरीराच्या वरच्या भागास योग्य आधार मिळतो.
वाहन चालवताना पाय मागे-पुढे करण्यासाठी व्यवस्थित जागा असेल अशा प्रकारे सीटची रचना असावी. रिअर ब्ल्यू मिररकडे पाहताना मान अवघडली जाणार नाही अशा प्रकारे त्याची रचना असावी. दूरचा प्रवासा असेल तर अधुनमधून कंबरेला विश्रांती मिळावी यासाठी थांबावे. वाहन चालवण्यापूर्वीच कंबरदुखीचा त्रास असेल तर वाहन चालवण्यासाठी बसताना योग्य आकाराच्या गादीचा वापर करावा.
वाहन चालवताना बसण्याची चुकीची पद्धत बऱ्याचदा कंबरदुखीला निमंत्रण देणारी ठरते. थोडासा निष्काळजीपणा हाडांसाठी, विशेषत: कंबरेसाठी मोठी हानी पोहोचवणारा ठरू शकतो. त्यामुळे वाहन चालवताना आसनाची योग्य स्थिती कंबरदुखीला, मानदुखीला दूर ठेवू शकते.