कोणतेही सत्कार्य साधायचं झाल तर ठणठणीत असल्याशिवाय त्या कार्याची फलश्रृती समाधानकारक नसते. मनाचे स्थास्थ्य शरीरावर अवलंबून आहे. सध्याच्या करोना संसर्गाच्या काळात शारीरिक आरोग्याचे महत्व काही वेगळे सांगण्याची गरज नाही. ( yoga benefits for health )
भारत सरकारच्या प्रयत्नाने सुरू झालेला व जगभर पाळला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस. केवळ आसन किंवा प्राणायाम यांनाच बऱ्याच वेळा योग समजले जाते. मात्र, तसे नसून योगाची व्याप्ती खूप मोठी आहे. योग शब्दाचा अर्थ “जोडणे’ असा होतो. म्हणजेच आपले मन, शरीर, आत्मा यांना जोडणे याला योग म्हणतात.
वाढत्या आत्महत्येचे प्रमाण व तसेच करोना संर्सगाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे निरोगी शरीर व मन याचे महत्व सर्वांच्या लक्षात नक्कीच आले असेल. या दोन्ही गोष्टींना एकत्रित जोडणारी शैली म्हणजे योगसाधना. योग करण्याचे फायदे जाणून घ्यायला हवेत. योगामध्ये विविध प्रकारचे अभ्यास व पद्धती आहेत. ते म्हणजे ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग, राजयोग. ज्याची पुढे जाऊन आठ अंगांमध्ये विभागणी केली आहे. त्यालाच अष्टांग योग म्हणतात.
आपण सर्वांनी नियमित योगसाधना करणे महत्वाचे आहे व ती कशी करावी, सर्वप्रथम कोणत्या वेळी आणि किती वेळ करायचे ते ठरवावे. आपले शरीर व मन निरोगी राहण्यासाठी पाऊण तासाचा कालावधी आवश्यक असतो. शक्यतो सकाळी योग हा सातत्याने आणि सावकाश पद्धतीने करावा. कारण व्यायामासारखे योगामध्ये फक्त हालचालींना प्राधान्य नाही. योगाभ्यासाबरोबर आहार, नियमावली ठरवलेली असावी. आहारानंतर 3 ते 4 तासांनी योग करावा, दुर्धर व मानसिक आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.( yoga benefits for health )
नियमित योगसाधना केल्याने अनेक फायदे होतात.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. मानसिक आरोग्यावर केंद्रित करण्यासाठी प्राणायाम व ध्यान हे योगाचे अविभाज्य घटक समजले जातात. प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासोश्वासाचे नियंत्रण आणि विस्तारीकरण. श्वासोश्वासाच्या योग्य तंत्राचा योग्य सराव केल्यास रक्तातील आणि मेंदूला होणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे प्राणशक्ती आणि जीवनऊर्जा यांच्या नियंत्रणास मदत होते. म्हणून प्राणायाम व योगासन एकमेकांस पूरक आहेत. या दोन तत्वांचा मिलाफ झाल्याने शरीर आणि मनाच्या उत्तम प्रतीचे शुद्धीकरण व आत्मनियमन प्राप्त होते.
शक्तीचा संचय वाढतो. व्याधींवर उपचारात्मक म्हणून आसनांचा अभ्यास करता येतो. योगाने स्फूर्ती आणि उत्साह वाढतो. स्नायू बळकट होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. ताणतणावावर नियंत्रणही ठेवता येते. पचनक्रिया आणि मज्जासंस्था तसेच श्वसनसंस्थेचे कार्य सुधारते. जे आपणास फक्त करोनासारख्या आजारावर नव्हे तर कोणत्याही विषाणू किंवा त्याच्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यास अत्यंत उपयोगी पडते.( yoga benefits for health )
म्हणून आजच्या जागतिक योगदिनानिमित्त आपण सर्व निर्धार करुयात की योग या शास्त्राकडे फक्त एक व्यायाम प्रकार म्हणून न पाहता एक दैनंदिन साधना म्हणून वैयक्तिकरित्या स्वीकार करून सध्या असलेल्या करोनाच्या दुर्धर आजारावर सामाजिकरित्या विजय मिळवूया.( yoga benefits for health )
सौ. अनिता दिलीप ढाणे