पुणे – ‘योग’ (yoga) हा शब्द संस्कृतच्या युज’ या धातूपासून तयार होतो, ज्याचा अर्थ जोडणे असा आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मस्तु अशी योगाची (yoga) व्याख्या आहे. योगाभ्यासाने मी’ ची ओळख होते. मी म्हणजे शरीर असे आपण समजतो, म्हणजेच आधी शरीराला जाणून घेऊन त्या शरीररूपी नगरात असलेल्या चेतनतत्वाची जाणीव करून घेणे हा योगाभ्यास आहे. योग म्हणजे फक्त आसनांचा शारीरिक व्यायाम करणे असे नसून मोक्ष हे त्याचे उद्दिष्ट आहे.
या ध्येयासाठी शरीर हे साधन आहे. आपल्याला मिळालेला देह निरोगी ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. परंतु फुकट मिळणाऱ्या वस्तुंची किंमत न करणे हा आपला स्वभाव असल्याने जोपर्यंत शरीरात काही बिघाड होत नाही तोपर्यंत बहुतांश लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. हे सर्व जाणून शरीराला निरोगी राखण्याचे काम करणारेही बरेच लोक आहेत.
योगाभ्यास करताना आपला प्रवास हा व्यक्ताकडून अव्यक्ताकडे असा होत असतो. त्यातूनच संयमाचाही अभ्यास साधला जातो तसेच सृष्टीउत्पतीचा क्रमही समजून घेतला जातो. शरीरातील अकरा संस्था ज्या आपला दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी एका विशिष्ट लयीत असणे गरजेचे असते ते योगासनांनी शक्य होते. प्रत्येक पेशीपर्यंत रक्तप्रवाह व जीवनऊर्जा योग्य (yoga) प्रमाणात, योग्य (yoga) दाबाने पोहोचवणे, रक्ताभिसरण विनाअडथळा होणे योगासनाने शक्य होते. योगासनात स्नायुंना नियंत्रित ताण देणे व परत पूर्ववत करणे या हालचाली आपण करत असतो त्यामुळे स्नायुंची लवचिकता योग्य प्रमाणात राहते. पेशींना पोषण व ऑक्सिजन मिळून एकंदरीत शरीराची कार्यक्षमता वाढते.
प्राणायामामुळे दीर्घ श्वसन साधून शरीरात शोषल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. त्यामुळे एकंदरीत ऊर्जा वाढून आनंदीपणा वाढतो. श्वसनाच्या बऱ्याच व्याधी प्राणायामाने कमी होतात. मनाचीही एकाग्रता शक्य होते, संयम, मन:शक्ती वाढून आयुष्य जगण्याची मजा अनुभवता येते. बैठ्या जीवनशैलीमुळे पोटाचे असंख्य विकार आजकाल पाहण्यास मिळतात. अपचन, ऍसिडीटी, मलावरोध या समस्या रोजच्या जीवनात आपण अनुभवतो आहोत. नियमित योगासने केल्याने पाचकरस योग्य प्रमाणात स्त्रवले जातात, त्यामुळे अन्नाचे योग्य (yoga) पचन होउन वरील समस्या होत नाहीत. तसेच हालचाल सुधारल्यामुळे मलावरोध होत नाही.
योगाभ्यासाचा अस्थिसंस्थेवरही अतिशय उत्तम परिणाम होतो. हाडांची शक्ती वाढते, हाडे बळकट होतात. कॅल्सिटोनीन या हार्मोनची निर्मिती वाढते ज्याने हाडातील कॅल्शियमचे डीपॉझिशन वाढते व रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण योग्य (yoga) राखण्यासाठी हाडामधून कॅल्शियम घेतले जाते. ग्रंथीचे श्राव नियमित व योग्य प्रमाणात होतात त्यामुळे रक्तातील घटकांचे प्रमाण योग्य राहण्यास मदत मिळते.
शरीरात होणारी हालचाल सांध्यांची रचना आणि स्नायूंच्या आकुंचन प्रसारणाने सांध्यात होते. जर स्नायू आकुंचित राहिले, पूर्ववत होऊ शकले नाहीत, तर सांध्यातील पोकळी कमी होऊन हाडे एकमेकावर घासली जातात. घर्षणाने कुर्चांची झीज होऊन वेदना होतात. नियमित योगासनामुळे आखडलेले स्नायू मोकळे होतात, कमजोर स्नायूंची ताकद वाढते, स्नायूंचा नैसर्गिक ताण परत येतो आणि यामुळे सांध्यातील पोकळी पूर्ववत होऊन सांधेदुखी होत नाही.
स्नायूंची कार्यक्षमता त्यांच्या पोषण व हालचालीवर अवलंबून असते. स्नायुंचा योग्य (yoga) वापर न केल्याने स्नायू कमजोर होऊन शरीर आकारहीन दिसू लागते. स्नायुंची बिघडलेली लय पूर्ववत होण्यास योगासने मदत करतात. स्नायू नैसर्गिक अवस्थेत ठेवण्याचे व त्यांची कार्यक्षमता वाढण्याचे काम योगासनाने होते. शरीरातील सर्व संस्था कार्यक्षम झाल्यामुळे, सर्व ग्रंथींचे स्त्राव योग्य (yoga) प्रमाणात झाल्याने त्वचा नैसर्गिक, नितळ, टवटवीत, स्निग्ध राहते.
शरीराचे आरोग्य सुधारून मनाच्या दिशेने प्रयाण करून मन स्थिर करणे, बुद्धीचा अंकुश मनावर ठेउन संयमी आयुष्य जगणे योगाभ्यासाने शक्य होते. संयमी समाज निर्माण झाल्यास अनेक सामाजिक समस्याही आपोआप कमी होतील ज्यायोगे एक स्थिर समाज निर्माण होऊ शकतो. चला तर नियमित योगाभ्यास करून व्यक्ताकडून अव्यक्ताकडे प्रवास सुरू करुया.
-डॉ. चंद्रकला वाघ