[[{“value”:”
World Kidney Day 2026: मानवी शरीरातील किडनी हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. आकाराने लहान असली तरी शरीराच्या अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत ठेवण्याचे काम किडनी करते. मात्र सध्या जगभरात किडनीच्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेषतः मधुमेह (डायबिटीज) आणि उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) नियंत्रणात नसल्यास किडनीला गंभीर नुकसान होऊ शकते, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी ‘जागतिक किडनी दिन’ साजरा केला जातो. यंदा १२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या दिवसाचा उद्देश लोकांना किडनीच्या आजारांबद्दल जागरूक करणे आणि योग्य काळजी घेण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.
किडनीचे मुख्य काम म्हणजे रक्तातील घातक पदार्थ आणि अतिरिक्त पाणी शरीरातून बाहेर टाकणे. दररोज किडनी सुमारे १३० ते १४० लिटर रक्त फिल्टर करते. यामधून युरिया, क्रिएटिनिनसारखे अपायकारक पदार्थ बाहेर काढले जातात. तसेच शरीरातील सोडियम, पोटॅशियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखणे, रक्ताचा पीएच स्तर नियंत्रित ठेवणे आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यातही किडनी महत्त्वाची भूमिका बजावते.
तज्ज्ञांच्या मते, चुकीची जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमुळे किडनीचे आजार वाढत आहेत. जास्त मीठ असलेले पदार्थ खाणे, धूम्रपान आणि मद्यपानाची सवय, जास्त वजन किंवा स्थूलता तसेच वारंवार वेदनाशामक औषधांचा वापर हे किडनीच्या आजारांचे महत्त्वाचे कारण ठरू शकतात.
याशिवाय दीर्घकाळ साखर आणि रक्तदाब वाढलेला राहिल्यास किडनीवर त्याचा गंभीर परिणाम होतो. जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते, तेव्हा किडनीतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना हळूहळू नुकसान होऊ लागते. या स्थितीला डायबिटिक नेफ्रोपॅथी असे म्हणतात. यामुळे किडनीची फिल्टर करण्याची क्षमता कमी होते आणि लघवीत प्रोटीन येऊ लागते. ही स्थिती पुढे क्रॉनिक किडनी डिजीजमध्ये रूपांतरित होऊ शकते.
तसेच उच्च रक्तदाबामुळेही किडनीतील नाजूक रक्तवाहिन्यांवर ताण येतो. त्यामुळे त्या हळूहळू खराब होऊ लागतात. किडनी नीट काम करू शकत नसल्यास शरीरात मीठ आणि पाणी साचू लागते आणि त्यामुळे रक्तदाब आणखी वाढतो. ज्या व्यक्तींना एकाच वेळी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असतो, त्यांना किडनीच्या आजारांचा धोका अधिक असतो.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्याने वजन, रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. आहारात मीठाचे प्रमाण कमी ठेवणेही महत्त्वाचे आहे. दिवसातून पुरेसे पाणी आणि इतर द्रवपदार्थ घेणे आवश्यक आहे.
तसेच आहारात ताज्या भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करावा. प्रक्रिया केलेले अन्न, जास्त मीठ आणि साखर असलेले पदार्थ शक्यतो टाळावेत. धूम्रपानही किडनीसाठी घातक ठरू शकते, कारण त्यामुळे किडनीकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो.
तज्ज्ञांच्या मते, मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांनी किडनीची तपासणी नियमितपणे करून घेतली पाहिजे. वेळेवर काळजी घेतल्यास किडनीचे गंभीर आजार टाळणे शक्य आहे.
“}]]
