[[{“value”:”
World Hearing Day 2025 – दि. ३ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. आपली ऐकण्याची क्रिया किती महत्त्वाची आहे आणि कानांची व श्रवणशक्तीची काळजी घेणे किती आवश्यक आहे, याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हे हा दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट आहे. एळाद्या व्यक्तीला ऐकण्याची अनुभूती होणे.
म्हणजे श्रवण ! डोळे, नाक, जीभ, कान व त्वचा या पाच इंद्रियांमधून आपल्याला सभोवतालची माहिती मिळत असते. यातील साधारणपणे ७५ ते ८० टक्के माहिती आपल्याला कानांच्या माध्यमातून मिळते, आणि तरी एवढ्या महत्त्वाच्या अवयवाकडे, त्याच्या संवेदनेकडे आपण दुर्लक्ष करीत असतो. जोपर्यंत आपल्या कानातून पाणी, पू किंवा रक्त येत नाही, कानाला फटका बसत नाही, तोपर्यंत आपण कानाच्या देखभालीकडे दुर्लक्षच करीत असतो. कानांच्या आरोग्यासाठी खास डॉक्टरांकडे जाण्याचे आपण टाळत राहतो.
हे असे आपण इतर अवयवांसाठी करतो का, हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला प्रामाणिकपणे विचारणे आवश्यक आहे. दिसायला कमी लागले की आपण लगेच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जातो, तपासणी करून चष्माही लावतो. छातीत दुखत असेल, तर लगेच हृदयरोगतज्ज्ञांकडे जातो, ईसीजीही करून घेतो. पोटात दुखत असेल, तर लगेच सोनोलॉजिस्टला भेटून सोनोग्राफी, एक्स-रे वगैरे करून घेतो. पण मग कानांच्या बाबतीत आपण लगेच जागृत का होत नाही? थोडे कमी ऐकायला येत असेल, तरी हा बहिरेपणाच तर आहे; नीट ऐकायला नाही आले, तर काय फरक पडतो? दोन शब्द नाही कळले, तर मी मॅनेज करेन, असे म्हणणाऱ्या व्यक्ती आपल्याला अनेकदा दिसतात. हे चुकीचे आहे, हे नंतर कळते.
मुळात, कान हा ऐकण्यासाठीचा अवयव असला, तरी त्याचे मुख्य कार्य आहे शरीराचा तोल (बॅलन्स) सांभाळण्याचे ! ऐकण्याचा आणि तोल सांभाळण्याचा मोठा संबंध असतो. ज्या व्यक्तींना ऐकायला कमी येते, त्या व्यक्तींना त्यांच्या तोल साधण्याच्या क्षमतेमध्ये बिघाड झाल्याचे कालांतराने जाणवू लागते हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे. शरीराचा तोल साधणारी नस (vestibular nerve) आणि ऐकण्याची नस (auditory nerve) ह्या दोन्ही नसा अगदी एकत्रितपणे पुढे मेंदूपर्यंत जातात. त्यामुळे एखाद्याच्या ऐकण्यामध्ये बिघाड झालेला असेल, तर त्याचा दुष्परिणाम त्याच्या तोल सांभाळण्याच्या शक्तीवर होऊ शकतो.
श्रवण तपासणी कोणाची केली जाऊ शकते?
तर एका दिवसाच्या बाळापासून ते अगदी शंभरी गाठलेल्या आजी-आजोबांपर्यंत, सर्वांची तपासणी होऊ शकते. आता प्रश्न पडेल की एका दिवसाचं बाळ कसं काय सांगेल त्याला ऐकायला कमी येतंय किंवा नाही? तर ज्या त्या वयानुसार प्रत्येकासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या तपासण्यांची निर्मिती झालेली आहे. लहान बाळांची तपासणी करायची असेल तर ऑटो ऑकॉस्टिक एमिशन (OAE) नावाची तपासणी केली जाते. त्यातून बाळाच्या आंतरकर्णामध्ये असलेल्या केसपेशींची माहिती मिळू शकते. तसेच BERA नावाची एक चाचणी असते. तिच्यातून आपल्याला रुग्णामध्ये कुठल्या प्रकारचा दोष आहे, त्याची तीव्रता किती आहे, हे कळू शकतं. आपल्याला किती बारीक आवाज ऐकायला येतो, हे स्वतःहून सांगण्यास असमर्थ असणाऱ्या व्यक्तींसाठी या दोन्ही तपासण्या केल्या जातात.
शुद्ध ध्वनी चाचणी (PTA) आपण साधारण अडीच ते तीन वर्षांपुढील वयाच्या व्यक्तींसाठी करता येते. अशी व्यक्ती स्वतःहून सांगू शकते की तिला किती आवाज ऐकायला येतोय. त्याहून पुढे जर आपल्याला जायचं असेल तर कानाच्या पडद्यामागे काही दोष आहे का, कानाच्या पडद्यामागील हाडांची साखळी व्यवस्थित आहे का? किंवा ती साखळी ज्या मध्य कर्णाच्या पोकळीमध्ये आहे, त्या पोकळीमध्ये सर्दी किंवा कुठल्याही प्रकारचा दोष आहे का किंवा घशाच्या मागून निघणारी एक नळी असते (Eustachian tube) ती नळी मध्य कर्णामध्ये उघडते त्या नळीचे कार्य व्यवस्थित सुरळीतपणे चालू आहे का?. अशी ती तपासणी जिला आपण इम्पिडन्स ऑडिओमेटरी (IA) असे म्हणतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करून आपण अगदी कानाच्या बाहेरून ते अगदी मेंदू पर्यंतच्या सर्व तपासण्या करू शकलो.
ह्या तपासण्या बॅचलर किंवा मास्टर्स ही डिग्री मिळवलेले तज्ज्ञच योग्य त्या पद्धतीने करू शकतात. तुम्ही ज्यांच्याकडे जाता, तो तज्ज्ञ योग्य आणि शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेला आहे का, ह्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. आता हे तुम्हाला कसं कळणार की हा तज्ञ ऑडिओलॉजिस्ट आहे कि नाही? तर सर्व ऑडिओ लॉजिस्ट हे रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया (RCI) मध्ये नोंदणीकृत असतात. त्यांना एक नोंदणी क्रमांक दिला जातो त्या नोंदणी क्रमांकाची सुरुवात हि ह्या अक्षरापासून केली जाते उदाहरणार्थ A00007. सोबत दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन तुम्ही त्याची शहानिशा करू शकता.
https://rciregistration.nic.in/rehabcouncil/SelectsSearch.jsp हे ऑडिओलॉजिस्ट दोन मोठ्या ऑर्गनायझेशन Indian speech and hearing association (ISHA) Maharashtra branch of Indian Speech and Hearing Association (MISHA) त्यांच्याशी संलग्नित असतात. अशाप्रकारे ती व्यक्ती योग्य आहे का? तज्ञ आहे का? हे ठरवून त्यांची पडताळणी करू शकता. ती योग्य शिक्षण घेतलेली तज्ञ व्यक्ती असेल तरच त्या तज्ञाकडून तुम्ही तुमच्या ऐकण्याची तपासणी करणे आवश्यक आहे. आपण आपलं हृदय कोणाच्याही हातात सोपवू का? आपले डोळे कोणाच्याही हातात सोपवू का? माझी किडनी मी कोणाच्याही हातात सोपवेन का? की त्या-त्या विषयातला तज्ञ व्यक्ती आपण निवडू, त्याचप्रमाणे तुमचा कान सुद्धा अतिशय महत्त्वाचा, संवेदनशील अंग आहे, त्यामुळे तुमच्या अनमोल कानाला तुम्ही इतर कोणाच्याही हातात सोपवणे हे योग्य नाही. त्यामुळे तुमची संवेदना अधिकाधिक खराब होऊन त्याच्यात अधिक बिघाड होऊन, तुम्हाला संपूर्ण बहिरेपणा येऊ शकतो.
ह्यात सुद्धा एक वर्षाचा डिप्लोमा करून स्वतःला ऑडिओ लॉजिस्ट म्हणून घेणाऱ्या लोकांची संख्या आता भरपूर वाढताना आपल्याला दिसते. एक वर्षाचा कोर्स आणि एखाद्या व्यक्तीने सहा वर्षांचा कोर्स केलेला असेल तर त्यांच्या अनुभवामध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये सुद्धा आपल्याला फरक करता आला पाहिजे. जागतिक श्रवण दिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्वसामान्य जनतेला हे आवाहन करू इच्छितो की त्यांना हा फरक लक्षात आणून देणे व योग्य त्या तज्ञाकडे जाऊन तुमचे उपाय उपचार करणे किंवा योग्य ती तपासणी करणे अतिशय आवश्यक आहे.
केवळ नफा मिळवण्याच्या उद्देशाने गल्लोगल्ली कानाचे मशीन विकताना लोक आपल्याला आढळून येतात, भरघोस सूट देताना ते आढळून दिसतात पण अशा प्रकारच्या कुठल्याही आमिषाला भाळून न जाता तुम्ही योग्य त्या तज्ञाची निवड करणे व त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या श्रवण यंत्राची निवड करणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींना श्रवणयंत्र लावून सुद्धा ऐकायला येत नाही अशा व्यक्तींकरिता कॉक्लियर इम्प्लांट नावाची सर्जरी केली जाते. त्याबद्दल तुमच्या तज्ज्ञासोबत चर्चा करणे हे ह्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
श्रवणयंत्र असू देत किंवा कॉक्लियर इम्प्लांट असू देत ते केल्यानंतरही जर योग्य त्या पद्धतीने श्रवण प्रशिक्षण जर तुम्ही घेतले नसेल तर कितीही चांगले श्रवणयंत्र असले तरीही त्या श्रवणयंत्राचा तीळ मात्र सुद्धा फायदा होणार नाही म्हणून योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच तुम्ही तुमचे कान व तुमच्या कानाची काळजी ही श्रवणतज्ज्ञांच्या हातात सोपवू शकता.
टेस्ट बॅटरी अॅप्रोच चा उपयोग करून इथंभूत तपासण्या करून केले गेलेले उपाय उपचार हे श्रवणबाधित व्यक्तीच्या सार्वभौम विकासासाठी अतिशय महत्वाचे ठरते व ह्या सर्व तपासण्यांचे सखोल ज्ञान हे फक्त श्रवणतज्ज्ञ ज्यांनी निदान ४ वर्षांचा पदवी कोरों केलेला आहे किंवा त्यापुढील शिक्षण घेतलेले आहे तेच करण्यास पात्र आहेत व तेच ह्या तपासण्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून करू शकतात, त्यामुळे तुमचे, तुमच्या पाल्याचे, पालकांचे कान असे कुणाच्याही हातात सोपवणे म्हणजे. आपणच आपणच आपल्या पायांवर धोंडा मारून घेण्याप्रमाणे आहे.
अविचल एल. आंबुलकर / MASLP, Audiologist and Speech Language Pathologist
संपर्क – 9860955565 / 9323815012
The post World Hearing Day 2025 : बहिरेपणाकडे दुर्लक्ष नको, जागतिक श्रवण दिनाचा संदेश ! appeared first on Dainik Prabhat.
“}]]