पुणे – कर्करोग झाल्यानंतर “केमोथेरपी’चा उपचार झाल्यावर केस जाण्याचे दु:ख अनेकांना पचवता येत नाही. त्यामुळे “डिप्रेशन’ येण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत “विग’ हा पर्याय आता पुढे आला असून, कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी तो एकप्रकारे आशेचा किरण ठरला आहे. त्यातून साध्यासुध्या दुकानात जाऊन “विग’ आणून लावणे ही शक्यता रुग्णांबाबत धोकादायक ठरू शकते, त्यामुळे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने ते बनवण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे.
कर्करोग झाल्यानंतर अनेक रुग्णांना “केमोथेरपी’चा उपचार घ्यावा लागतो. या उपचारामुळे केस गळतात. अगदी भुवयांचेही केस गळतात. भुवयांना आयब्रो पेन्सिल लावून एकवेळ “शेप’ आणता येतो, परंतु डोक्यावरील केस गेल्याने स्वत:ला आरशात पाहणे अनेकांना जड जाते. कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावरच अनेकजण आधीच खचून जातात. त्यातून, केस गळती झाल्याने स्वत:चे रुप आरशात पाहणेही अनेकांना जड जाते. याशिवाय, समाजात वावरणेही जड जाते. त्यावेळी आपल्याला सुटेबल असे “विग’ वापरणे हा पर्याय आता पुढे आला आहे.
स्वत:च्या केसांचे विग बनवणे शक्य होत नाही. कारण ते एका विगला तेवढे केस पुरेसे नसतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात “वेस्टेज’ होतो. एक “विग’ बनवायला सुमारे 45 दिवस लागतात. अशा परिस्थितीत रुग्णांना एवढे दिवस थांबणे शक्य नसते. त्यामुळे तयार आणि सुटेबल विगचा पर्याय अनेकजण निवडतात.
भारतात बालाजी मंदिरात अनेकजण केस दान करतात. त्या केसांचा उपयोग यासाठी केला जातो. यावर शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छता करून त्यापासून “विग’ बनवले जाते. रुग्णाची केसांची रचना, त्यांचा आधीचा हेअर कट, केसांचे टेक्श्चर या सगळ्या गोष्टींचा विचार करून रुग्णांना “विग’ सूचवला जातो.
सिंथेटिक आणि ओरिजनल केस असे प्रकारही यामध्ये पहायला मिळतात. परंतु, जे रुग्ण असतात त्यांना अन्य कोणत्या गोष्टींची ऍलर्जी होऊ नये, डोक्यावर पुरळ येऊ नये वगैरे काळजी घेऊन हे “विग’ तशा कापडांपासूनच बनवले जातात. याशिवाय ते बनवताना त्याचा रंग, क्वालिटी आणि अन्य गोष्टीही कटाक्षाने पाहिल्या जातात.
एक विग बनवण्यासाठी लागतात 14 ते 16 इंच केस
कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी “केस दान’ असे फॅड सध्या समाजात खूप दिसत आहे. परंतु, प्रत्यक्षात याचा उपयोग “न के बराबर’ असतो असे या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि “पॅपीलॉन हेअर वर्ल्ड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिकेत कोपरकर यांचे म्हणणे आहे. वास्तविक एक विग बनवण्यासाठी सुमारे 14 ते 16 इंच केस लागतात. कारण हे बनवताना बरेच केस वाया जातात. कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी “एक इंच केस दान करा’, “दोन इंच दान करा’ वगैरे आवाहनही केले जाते, परंतु त्याचा प्रत्यक्षात विग बनवता येत नाही. असेही डॉ. कोपरकर म्हणतात.