Monday, April 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

स्त्रिया आणि आरोग्याची हेळसांड

by प्रभात वृत्तसेवा
June 8, 2020
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

बऱ्याच घरात खाण्यापिण्याच्या तऱ्हेवाईक सवयी, आवडी-निवडी असतात. घरातील स्त्रियाच त्याला अनेकदा खतपाणी घालतात. भजी, बटाटेवडे यासारख्या वेळखाऊ मेन्यूची फर्माईश केली जाते. हल्ली चवीत बदलाच्या नावाखाली बाहेरून पार्सल मागवण्याचा शॉर्टकट काढला जातो. वीकेन्ड्‌सला मनसोक्‍त हॉटेलिंग केले जाते. यामुळे सर्वांच्याच पोटात निःसत्व अन्न जाते. बाहेरचे पदार्थ अस्वच्छ, स्वस्त तेलातले आणि फक्त जिभेसाठीच चांगले असतात. त्यांच्या वाटे न गेलेलंच बरं.

प्रसंग- महाशिवरात्रीचा दिवस. मीनल पहाटेच उठून कामाला लागली. घरातल्या मंडळींसाठी उपवासाचे चारी ठाव पदार्थ करायचे होते. शिवाय 8.00 ची लोकल गाठून कामावरही हजर व्हायचे होते. सर्व आवरेपर्यंत 8.15 वाजले. सकाळपासून पोटात काहीच नव्हते. तिचं डोकं ठणकू लागलं. कपभर चहा ढोसून ती बाहेर पडली. लंच टाईम एक वाजता होता!

प्रसंग – रविवारी नवऱ्याचे मित्र जेवायला येणार होते. शनिवारपासूनच वनिता तयारीला लागली. पुरणपोळी करण्याची फर्माईश होती. सगळा स्वयंपाक तिने 12 वाजता तयार ठेवला. जेवायला 12 वाजता येणाऱ्या मंडळींचा 2 वाजेपर्यंत पत्ता नव्हता. वनिताचा जीव भुकेने व्याकुळ झाला होता. सकाळपासून ती श्रमत होती पण पाहुण्यांच्या आधी कसं जेवायचं? शेवटी पाहुणे आले. आधी पुरुषांची पंगत बसली आणि कोशिंबीर, कटाची आमटी नावाजत त्यांनी फस्तदेखील केली! वनिताला आवराआवरी करून जेवायला 3.30 वाजले. तिचं मन आणि तोंड कडू झालं होतं.

प्रसंग- वसुधाला नाशिकला जायचं होतं. बसमधून उतरून मूत्रविसर्जन करावं लागू नये म्हणून तिनं सकाळपासून पाण्याचा थेंबही घेतला नव्हता.

वरील प्रसंग ओळखीचे आहेत? यात तुमचंच प्रतिबिंब तुम्हाला दिसत आहे? तुम्हीही स्वतःची तहान-भूक मारून घरासाठी वेळ देता? न संपणारे घरकाम, नोकरी, अबालवृद्धांची सेवा याला प्राधान्य देता?
स्वतःकडे दुर्लक्ष करता? बाईला असं “त्याग-त्याग खेळायचं’ बाळकडूच मिळालं असतं जणू! तुमचं पोट भरलं की मला ढेकर येते असे “सेंटी डायलॉग्ज’ ऐकतच ती मोठी झाली असते. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून घरातील इतरांच्या गरजा पूर्ण करण्यात तिला धन्यता वाटते. पण हा मार्ग विविध व्याधींपर्यंत तिला अलगद पोहोचवतो. रक्‍तक्षय (ऍनिमिया) नसलेल्या स्त्रिया बोटावर मोजण्याइतपतच असतील. ऍसिडीटी, मासिक पाळीच्या तक्रारी, पीसीओडी, सांधेदुखी, हायपोथायरॉईडिझम, वजनवाढ या स्त्रियांमध्ये नेहमी दिसून येणाऱ्या तक्रारी.

पालेभाजी आरोग्यासाठी चांगली हे तर स्त्रियांना माहिती असतं; पण ती निवडणे, स्वच्छ धुणे हे काम किचकट. शिवाय शिजवल्यानंतर भाजी बनते थोडीशीच. पालेभाजी केली तरीही सगळ्यांनी खाऊन तिला उरेलच असे नाही. डब्यात लोणचं-पोळी, सॉस पोळी, तूप-साखर पोळी असेच काहीबाही न्यावे लागते. म्हणून नोकरदार स्त्रिया पालेभाजी आणायचेच टाळतात. लोखंडाच्या भांड्यांना मेंटेनन्स जास्त. शिवाय त्यात भाज्या काळ्या होतात, दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायला लागतात. या कारणानी लोखंडाची भांडी वापरायचेही टाळतात. उपास-तापास करणाऱ्या स्त्रियांचा आहार हा वादाचाच विषय आहे. नॉनव्हेज खाणाऱ्या आधीच कमी. त्यात स्त्रियांच्या वाट्याला पिसेस कमी आणि रस्साच जास्त येतो! या सगळ्या कारणांमुळे स्त्रियांमध्ये होणारा रक्तक्षय खरंतर वारशाने पुढच्या पिढीतही येतो.

व्यायामाची व्यथा
प्रसंग : सुरेखा 50 वर्षांची झाली. तिची नुकतीच रजोनिवृत्ती झाली होती. याचदरम्यान वजनाने 80 किलोचा आकडा पार केला होता, कंबरदुखी, गुडघेदुखी मागे लागली होती. एके दिवशी तिला बागेत जॉगिंग करताना पाहून मी हादरले. वजन कमी करण्याची घाई झाली होती तिला. पण त्यासाठी तिने निवडलेला मार्ग कंबर व गुडघ्यांकरता हानिकारक होता. फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेऊन प्रशिक्षित सहायकाच्या देखरेखीखाली व्यायाम करणं खरंतर गरजेचं होतं.

प्रसंग : नेहा आणि मनालीने नवीन वर्ष सुरू होताच जिममध्ये नियमित जाण्याचा संकल्प केला. सुरुवातीचा एक आठवडा त्या उत्साहाने गेल्या देखील. पण मग जिमला न जाण्यासाठी रोज नवी कारणे त्या शोधू लागल्या. रोजच्या मालिका, व्हॉटसऍपवरील गप्पा यांच्या नादात रात्री झोपायला उशीर होत होता आणि सकाळी लवकर उठवत नव्हते.

व्यायामाबद्दल बायकांच्या कल्पना भन्नाट असतात. अनेक जणींच्या मते जिमला जाणे किंवा तज्ज्ञ व्यक्‍तींचा सल्ला घेणे आवश्‍यक नसते. त्यापेक्षा घरकाम, झाडू-पोछा करून पोट कमी होते, असा समज असतो. शिवाय जिमची फी आणि मोलकरणीचा पगारही वाचतो. डबल बचत! पोट कमी होणं म्हणजे फिटनेसची कमाल मर्यादा असाही अनेकींचा गैरसमज असतो. जसं काही पोट म्हणजे स्त्रियांच्या शरीरातील एकमेव महत्त्वाचा अवयव! योग्य व्यायामाच्या अभावी एक जिना चढला तरी या बायका धापा टाकतात. त्यांच्या पाठीच्या कण्याने लवचिकता गमावली असते आणि त्यांचे वजन वाढत्या श्रेणीवर असते.

अपुरी विश्रांती – रात्री उशिरापर्यंत मालिका आणि मोबाइल पहात बसणं, घरी उशिरा येणाऱ्या कुटुंबीयांची वाट पाहात बसणं, अशा कारणांमुळे अनेक स्त्रिया उशिरा झोपतात. सकाळी उशिरा उठायची मोकळीक मात्र त्यांना नसते. कारण लवकर उठून घरकाम करणं, सगळ्यांचे डबे करणं त्यांना अनिवार्य असतं. यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. दिवसभर थकल्यासारखं वाटतं. यामुळे चिडचिड वाढते, एकाग्रता कमी होते. त्यामुळे पुरेशी झोप घेण्याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.

दुखणं अंगावर काढणे
प्रसंग : कमलच्या अंगात आठवडाभर ताप होता. अंग दुखत होतं. जेवणही जात नव्हतं. पण अंथरुणाला खिळलेल्या सासू-सासऱ्यांच्या कामापासून तिला सुटका नव्हती. घरातल्या माणसांच्या लक्षातही ही गोष्ट आली नाही. कमल नेहमीप्रमाणेच गृहीत धरली जात होती. दुखणं अंगावर काढत होती. अनेक स्त्रिया आपल्या दुखण्या-खुपण्याकडे दुर्लक्ष तर करतातच, शिवाय दुखणे दाबून टाकण्यासाठी पॅरसिटेमॉल सारखी औषधे बिनदिक्कतपणे खात रहातात. यामुळे फायदा तर सोडाच पण अशा स्वतःच्या मनाने घेतलेल्या औषधांचे शरीरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
सुंदर दिसणं की स्वास्थ्यपूर्ण असणं?

रजोनिवृत्तीनंतर स्त्रीचे शरीर बेडौल दिसायला लागते. केस पिकतात आणि याबरोबरच तिची सुंदर दिसण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू होते. ब्युटीपार्लरच्या खेपा वाढतात. कधीकधी तर औषधांसाठी किंवा आरोग्य तपासण्यांसाठी बाजूला ठेवलेले पैसे ती सौंदर्यप्रसाधनांवर खर्च करते. पण खरं तर वय काही केल्या लपत नाही. फेशियल, हेअर डाय, मसाज, नेलपॉलिश, लिपस्टिक अशा वरवरच्या बेगडी उपायांमुळे ती अधिकच बिचारी दिसू लागते. गॉसिपिंगचं कारण ठरते. कपडे, दागिने, घरगुती कार्यक्रमात ती मन रमवू पाहते पण अधिकच एकटी पडत जाते. मधुमेह, रक्‍तदाब, गुडघेदुखी यासारख्या व्याधींमुळे थकून जाते. त्यांकडे पुरेसे लक्ष न दिल्यास या व्याधी नियंत्रणाबाहेर जातात.

तशा तिला मैत्रिणी भरपूर असतात. विविध भिश्‍या असतात, किटी पार्ट्या असतात. पण व्यक्‍तिमत्त्व संपन्न करायला तिथे पुरेसा वाव नसतो. कपडे, दागिने, शॉपिंग यावरच्या गप्पा आणि इतरांची उणी-दुणी काढण्यातच वेळ निघून जातो. नवे छंद खुणावत नाहीत, नवी पुस्तके वाचण्यात मन रमवत नाही, नवीन काही शिकत नाही आणि जीवन एकसुरी, कंटाळवाणं होऊन जातं. मुलं मोठी होऊन स्थिरावतात, नवरा त्याच्या उपक्रमांमध्ये आणि मित्रमंडळीत बिझी राहतो. स्त्री मात्र एकाकी होते. रिकामपण तिला खायला उठतं. उदासीनता, चिंता यातून ती ते व्यक्‍त करते. मग वारंवार घर आवरणे, स्वच्छता करणे, धार्मिक कार्यक्रमांमध्ये वेळ घालवणे असे उद्योग सुरू होतात.

यावर पर्याय म्हणजे नियमित व्यायाम, योगासने, ध्यान करणे. आत्मपरीक्षण करणे, आपल्या आवडीचे छंद जोपासणे, बागकाम करणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे. स्त्रियांनी आपली सौंदर्याची व्याख्या तपासून पाहायला हवी. आपले शरीर आतूनही सुंदर, निरोगी कसे राहील याकडे लक्ष द्यायला हवे. नियमित आरोग्यतपासणी आणि औषधोपचार यामध्ये हेळसांड करता कामा नये.
हेळसांड नको, हितरक्षण हवे!

या हेळसांडीच्या मागे काय असते?
मानसिकता – पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीची जडणघडण झाली असते. घरातील पुरुषांना आणि इतर कुटुंबीयांना सेवा देणे हाच गृहिणीधर्म असे संस्कार तिच्यावर असतात. स्वतःसाठी वेळ काढायचा म्हटलं की, तिला अपराधी वाटते.

मल्टीटास्किंगची धडपड – सर्वच पातळ्यांवर स्वतःला सिद्ध करण्याचा ताण स्त्रिया स्वतःवर घेतात. सुपर वुमन बनायच्या तणावाखालीच त्या हळूहळू खचत जातात. स्त्रिया कुटुंबाला प्राधान्य देतात. पण स्त्रियांना कुटुंबात प्राधान्य असतेच असे नाही. कुटुंबीयांचे प्राधान्यक्रम वेगळे राहतात, ते घरातील स्त्रिसाठी पुरेसा वेळ देत नाहीत. त्यामुळे तिच्या शारिरीक आणि मानसिक अपेक्षा बऱ्याचदा उपेक्षित राहतात. याचा परिणामही तिच्या आरोग्यावर होतो.

यावर उपाय काय?
स्त्रीने स्वतःच आपले हितरक्षण करायला हवे. ती ठीकठाक असेल तरच तिचे घर नीट राहील ना? तिने स्वतःसाठी (व्यायाम, छंद, वाचन) वेळ काढायला हवा. कोणी तिची काळजी घेत नसेल तर स्वतःच स्वतःची काळजी घ्यायला हवी. स्वतःशीसुद्धा तिने प्रेमाने वागायला हवे.

अधिक पैसा, अधिक साड्या आणि दागिने, अधिक सौंदर्यप्रसाधने, अधिक टाळ्या नाकारण्याचे धैर्य तिने दाखवायला हवे. उत्तम तब्येतीइतका सुंदर दागिना नाही!

स्वभावाला औषध असते. स्वतःच्या स्वभावातील व विचारांतील त्रुटींवर प्रयत्नपूर्वक काम करायला हवे.

आत्मपरीक्षणाची सवय लावून घ्यायला हवी. वाईट गोष्टींवर काय काम केलं त्याचीही नोंद करून ठेवायला हवी. अनेक दुखण्यांचा उगम नकारात्मक मानसिकता, स्व-उपेक्षा, चुकीच्या सवयी यात असतो.

तिने नाही म्हणायला शिकायला हवे. कोणी जर गृहीत धरत असेल, तिच्या वेळेवर अतिक्रमण करत असेल तर तिला स्पष्टपणे पण नम्रपणे नकार देता आला पाहिजे.

चाळिशीनंतर डॉक्‍टरांच्या सल्ल्याने नियमितपणे वार्षिक तपासण्या करून घ्यायला हव्यात. तिथे काटकसर कामाची नाही. मग भले एखाद्‌-दुसरी साडी किंवा चैनीची वस्तू कमी घेतली तरी चालेल! वार्षिक तपासण्या करून काही आजार प्राथमिक स्थितीत लक्षात आले तर आटोक्‍यात ठेवणं सोपं जातं.

योग्य आहार आणि व्यायामाबद्दल तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. डॉक्‍टर गुगल, व्हॉट्‌सऍप युनिव्हर्सिटी किंवा मित्र-मैत्रिणींनी दिलेल्या टिप्सवर अवलंबून राहू नये. जीवाला जीव देणारे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक जोडावेत. त्यांच्यापाशी आपले मन मोकळे करावे. नकारात्मक व्यक्‍ती, प्रसंग यांपासून चार हात लांब राहिलेलेच बरे. ते आपल्या ऊर्जेचे शोषण करतात.

आपल्याला आरोग्यदायी भविष्य दाखवणाऱ्या मार्गावर त्वरित चालणं सुरू करावं. चालढकल करू नये. सोबतीला कोणी असेल तर उत्तमच! कोणी नसले तरी एकट्यानं का होईना, पण धैर्यानं आणि चिकाटीनं त्या मार्गावर चालून आपलं उद्दिष्ट गाठावं!

 

Tags: aarogya jagar
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar