काही काही गोष्टी विचार करण्याच्या पलीकडच्या असतात; म्हणजे तो विचार स्वप्नालासुद्धा शिवत नाही. जगात काय काय घडत असते याची अनुभूती सामान्य माणसालातर येणार नाहीच. काहींच्या कार्याला प्रसिद्धीची झालर मिळते, तर काहींच्या वाट्याला प्रसिद्धी जवळसुद्धा फिरकत नाही. जणू नशिबाने वाळीत टाकलेय.
असाच एक प्रसंग घडला अंगावर येणारा पण कौतुकास्पद! किती तरी वेळ तो डोक्यातून जात नव्हता. मध्यंतरी एका कार्यक्रमासाठी वरूडला गेले होते. अचानक मला बरे वाटेनासे झाले.संध्याकाळी हजार मुलांपुढे बोलायंचे होते म्हणून मी जवळचे मेडिकल गाठले. औषधे घेताना एक बाई मेडिकलमध्ये आली. पूर्ण चेहरा स्कार्फने झाकलेला, ती आली काहीच बोलली नाही. त्या मेडिकलमधल्या पोऱ्याने एक बऱ्यापैकी मोठा बॉक्स तिच्या पुढ्यात ठेवला. ती गेली. तिने पैसे दिले नाहीत. त्याने ते खात्यावर लिहून घेतले. मीही गेले. दुसऱ्या दिवशी पुण्याला निघताना पुन्हा त्या मेडीकलमध्ये जाऊन गोळ्या घेतल्या; तेवढ्यात मेडिकलचा मालक म्हणाला, “मॅडम, काल ऐकले मी तुमचे भाषण. माझी मुलगी त्याच शाळेत आहे. बायकोला आणले नाही, याची रुखरुख लागली. पण तुमचा नंबर द्या
पुण्याला आलो की नक्की तुमच्या संस्थेला भेट द्यायला येईन. तुमचे काम बघायला आवडेल.’ तेवढ्यात कालचीच बाई तशीच परत आली. कालप्रमाणेच तिला त्या मेडिकलच्या मालकाने मोठा बॉक्स दिला. तिने काही पैसे दिले आणि उरलेले वहीत लिहून ठेवले. मी निघणार तितक्यात तेच म्हणाले, “तुम्ही बायका असून खूप करता राव. आम्हाला असे काही जमत नाही.’ मी फक्त हसले.
त्याने त्याचे कार्ड दिले म्हणाला, “मॅडम,तुम्ही लिहिता ना! या बाईवर लिहा ना.’ मी काही बोलायच्या आत त्याने नुकत्याच गेलेल्या बाईची कथा सांगितली. ही बाई हरकत पुण्याच्या वेश्या वस्तीत राहते. म्हणजे तिचा व्यवसाय तोच आहे. यात कशी पडली, काय नाव आहे, काही माहिती नाही. पण बाई फार मोठे काम करतेय. तिला तिच्या व्यवसायात कुठल्याश्या गिऱ्हाईकामुळे एड्स झाला. त्यात ती खूप खचली. पण तिला हे काम न करून चालणार नव्हते. विचार करून तिच्या मानाने उभारी घेतली. तिने ठरवले की चुकून या घाणीत या सगळ्या वेश्या आल्या असल्या तरी यांनाही किमान सुदृढ राहण्याचा अधिकार आहे. मग तिने शासकीय आरोग्य विभागाचे कार्यालय गाठले. हा मुद्दा मांडला.
त्यासाठी तिने कंडोम्सची मागणी केली. कार्यालयाने फारशी दखल घेतली नाही; मात्र ही बाई जिद्दीला पेटली. खूप चकरा मारूनही तिला हवा तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी ती माझ्या दुकानात आली. आता ती रोज माझ्याकडून शंभर कंडोम्स घेऊन जाते. आधी रोज घेऊन जायची आणि पैसे द्यायची. एक दिवस तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या दुकानातल्या मुलाने तिला कंडोम्स देण्यास नकार दिला. तिने खूप गयावया केली. शेवटी तिने माझा नंबर घेऊन मला फोन केला आणि सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आले. मी लगेच दुकानात आलो.
तिच्या रोज शंभर कंडोम्स नेण्याच्या कल्पनेनेच मी कोड्यात पडलो होतो. ती म्हणाली की, ती वेश्या आहे. तिच्याकडून तिच्या मुलालाही एड्स झाला. म्हणाली, माझे आयुष्य काही धड नाहीच; पण माझ्या मुलाला जन्मताच मी हे दिले त्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाहीये. माझा मुलगा गेला. त्या दिवशी मी ठरवले हा नरक इच्छा असूनही संपणार नाहीये, पण किमान माझ्या मैत्रिणींना मी काळजी घ्यायला सांगू शकते. मी काळजी घेतली नाही म्हणून मी माझे बाळ गमावले.
बाळ गेल्याच्या दु:खापेक्षा तो गेल्याने आनंद नाही; पण बरे वाटले. कारण हे आयुष्य देऊन तरी मी त्याला आयुष्यभर नरकच देणार होते. मग त्याच दिवशी ठरवले, “मी माझ्या मैत्रिणींना काळजी घ्यायला सांगेन. त्यासाठी मी हे नेऊन देते दादा. येणाऱ्या गिऱ्हाईकांना हे मान्य नसते, मात्र मी सगळ्याना हे पटवून देतेय. त्यासाठी मी रोज 100 कंडोम्स घेऊन जाते. रोज मला बाहेर येणे शक्य होत नाही म्हणून मी इतके पॅक करून घेते. मला मिळणाऱ्या पैशातून मी इतकेच करु शकते. आज माझ्याजवळ पैसे नाहीत; पण आज जर तुम्ही मला हे दिले नाहीं तर आजच्या एका दिवशी कित्येक मैत्रिणींची आयुष्य बरबाद होतील. मी पाया पडते तुमच्या. मला रिकाम्या हाती परत पाठवू नका. मी जमल्यास आजच येऊन पैसे देऊन जाते. पण आता द्या मला.’
मेडिकलचा मालक पुढे म्हणाला, तिचा हा आर्त स्वर ऐकून माझे मन पिळवटले मॅडम, त्या दुवशी मी ठरवले, मी तिच्याकडून कंडोमचे पैसे कधीच घेणार नाही. तर त्या बाई म्हणाल्या, नको. माझ्या सत्कार्यात वाटेकरी होऊ नका. माझ्याकडे करण्यासारखे काहीच नाही. खूप वाटत असूनही माझ्यासाठी या समाजाचे दरवाजे बंद आहेत. फक्त आजचे पैसे मी नंतर आणून देते.’ पुढे मालक डोळ्यात पाणी आणून म्हणाला, ती त्या क्षणी मला माऊली वाटली आणि मलाही!