सुजाता गानू
रानकंद
अर्जिनिया इंडिका
कुल : लिलिअेसीई
भारतीय नावे : मराठी – रानकंद; हिंदी – जंगली प्याझ, बन प्याज, कोलिकंद; बंगाली, गुजराती – जंगली प्याझ, संस्कृत – कोलकंद; तमिळ – नारिवेंगायम; तेलुगू – नक्कवल्लिगड्ड
या प्रजातीच्या युरोपियन जातीस “स्किवल’ हे नाव देण्यात आले आहे. या जातीऐवजी भारतीय जाती वापरण्यास चांगली आहे तिला भारतीय स्किवल म्हटले जाते. हे झाड वायव्य हिमालयात 2000 मीटर उंचीपर्यंत सापडते आणि दक्षिण भारतापर्यंत व पूर्वेकडे बिहारपर्यंत सापडते.
कंदधारी झाड, कंद, 5-10 से.मी. मळकट पांढरे किंवा फिके, अंडाकृती, खालची पाने जवळपास सपाट, फार लांब, अरुंद,
टोकदार, फुलांचे खोड ताठ, सुमारे 45 से.मी. उंच, फिकी तपकिरी, सडपातळ लांब गुच्छांमध्ये, फळ 1.5-2 से.मी. लांब, दोन्ही टोकास अरुंद, बिया काळ्या.
उपयुक्तता : कंदाच्या बाहेरचे आवरण काढल्यावर कंदाचे तुकडे करून वाळवतात, हे रानकंद या नावाने ओळखले जाते. या औषधात जवळपास डिजिटॅलिस सारखेच गुणधर्म आहेत. ते हृदयाच्या, कफाच्या आणि श्वसननलिका सुजण्याच्या वेदनांवर वापरले जाते. ते मूत्रविरेचक आहे. त्यामुळे मुत्राचे सर्व विकार बरे करण्यासाठी रानकंदाचे चूर्ण घ्यावे. युरोपीयन स्क्विल प्रमाणेच भारतीय स्क्विलही परिणामकारक आहे. श्वसननलिका सुजण्यावरच्या जुन्या रोगांवर आणि पडसेसर्दीवर रानकंद उपयुक्त वनौषधी होय.
ट्रिब्यूलस टेरेस्ट्रिस
कुल : झायगोफिलसीई
भारतीय नावे : मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी – गोखरू; हिंदी – छोटो गोखरू; कानडी – नेग्गलू; मल्याळी – नेरिगिल; संस्कृत – लघु-गोक्षुर; तमिळ – नेरुंजी; तेलुगू – पल्लेरु
300 मीटर उंचीपर्यंत हे झाड सर्वत्र सापडते.
जमिनीवर रांगणारी औषधी, संपूर्ण झाड बारीक केसांनी आच्छादलेले, पाने संमुख जोड्यांमध्ये, 5-8 से.मी. लांब, संयुक्त, पर्णिका 4-7 जोड्या, 8-12 मि.मी. लांब, फुले पिंगट पिवळी, 1-1.5 से.मी. परिघाची, एक एक, पानाच्या अक्षकोनातून किंवा विरुद्ध बाजूने निघणारी, फळ विशेष प्रकारचे आणि त्यावर असलेल्या काट्यांनी सहज ओळखता येणारे, चिकटणारे.
उपयुक्तता: या झाडाची फळे औषधी आहेत. फळे मूत्रांच्या विकारावर, लैंगिक अशक्तपणावर उपयोगी. शीतल असतात. या फळांचा काढा संधिवातावर आणि मूत्राशयाच्या विकारावर उपयोगी आहे. ते मूत्रविरेचकपण आहे. लघवी होण्यास मदत करण्याची या औषधाची क्षमता असते.
ट्रिब्युलस टेरेस्ट्रिसला छोटा गोखरू म्हणून ओळखले जाते तर पीडॅलियम म्यूरेकस (पीडॅलियेसीई) मोठा गोखरू म्हणून ओळखला जातो. अनेक
आयुर्वेदिक औषधात छोट्या गोखरूसारख्या गुणधर्मांसाठीही वापरला जातो. गोखरू ही एक वनौषधी आहे. रसायन चूर्णामध्ये गोखरूचा वापर करतात. रोग प्रतिकारकशक्ती गोखरू चूर्णाने वाढते.
लालसाबुनी- बिशखापरा
ट्रयऍन्थेमा पोर्च्युलॅकॅस्ट्रम. ट्रायऍन्थेमा मोनोगायना.
कुल : फिकॉइडिई
भारतीय नावे : हिंदी – लालसाबुनी; बंगाली – साबुनी; गुजराती – साटोडी; कानडी – मुच्छूजोनी; पंजाबी – बिशखापरा; संस्कृत – पुनर्नवी; तमिळ – शारुन्नई; तेलुगू – गलीजेरू
हे झाड भारतात सगळीकडे सापडते. भाजीच्या घोळापेक्षा (पोर्च्युलॅका ओलेरिशिया) हा घोळ निराळा असतो. हा पाणी दिलेल्या शेतात व पावसाळ्यात शेतांमध्ये तण म्हणून उगवतो.
रसदार, पसरणारी औषधी, खोडे बहुशाखीय, कोन असलेली, पाने अग्राकडे रुंद, फुले फार लहान, पर्णवृंत्ताच्या खालच्या भागात पूर्णपणे लपलेली, फळे लहान, फुलांप्रमाणेच पानाच्या पर्णवृंत्ताच्या खालच्या भागात लपलेली, बिया अनेक, काळ्या, मूत्रपिंडाच्या आकाराच्या, आवरणापासून निघालेल्या बाह्य वाढींनी आच्छादलेला.
उपयुक्तता: या झाडाची पाने औषधी आहेत. पानांमध्ये “पुर्ननविन’ नावाचे ऍल्कलाइड असते. ते मूत्रविरेचक आहे. म्हणूनच जलोदरात उपयोगी आहे. यकृत किंवा मूत्राशयाच्या अकार्यक्षमतेमुळे शरीरावर होणाऱ्या फाजील वाढीवर (गाठी) हा घोळ उपयोगी आहे.
विशेषकरून रोगाच्या प्राथमिक अवस्थेत परिणामकारक आहे. तसेच रोगाच्या विकसित अवस्थेतही उपयोगी आहे.
या झाडात गर्भपात करण्याची क्षमता तपासण्यासाठी चाचण्या घेण्यात आल्या आहेत, गर्भाशयाला ते सौम्यपणे संकुचित करते.
इतर जाती अशा
या प्रजातीची ट्रयऍन्थेमा डिकॅन्ड्रा ही दुसरी जातीसुद्धा औषधी आहे. मुळे रेचकयुक्त आहेत आणि मासिक पाळी बंद करण्यासाठी व अंडकोश सुजण्यावर उपयोगी आहेत. फुप्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त वनौषधी आहे.