आधुनिक यूग हे खर तर अत्यंत फास्ट असे आहे. निसर्गाचा सहवास, ताजी शुद्ध हवा ही आजकाल दुर्मीळ गोष्ट बनत चालली आहे. निसर्गाच्या हिरवाईत राहायला आजकाल आपल्याला मिळत नाही. आपण शहरात राहातो. जिथे अनेक प्रदूषणांचा भस्मासूर राहात आहे. मग शहरातील घाई, गर्दी, धूळ, प्रदूषण, यामूळे आपण श्वाससुद्धा वरवर घेतो. श्वास नीट घेण्याची सवय नसणे ही तर नित्य बाब होऊन बसते. पण गरोदर स्त्रीला हे चालत नाही.
तिला तिच्या बाळासाठी भरपूर ऑक्सिजन लागतो. त्यातून गरोदर स्त्रीचे जर पोट खूप मोठे झाले असेल तर सहाजिकच फुप्फुसांवर त्याचा दाब येतो. गर्भवती स्त्रीने या साऱ्यांना तोंड देण्यासाठी श्वसनाचे काही व्यायाम शिकून घेणे व ते नियमितपणे करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच श्वसनाच्या व्यायामाच्या आधाराने शरीर शिथिलतेचाही अनुभव घ्यावा जो गरोदरपणी अत्यंत उपयुक्त आहे.
आपल्या शरीरात श्वसनक्रिया ही अत्यंत महत्तम संस्था सतत कार्यरत असते. या श्वसन संस्थेला गरोदरपणी स्वतःसाठी व बाळासाठी भरपूर प्राणवायूचा पुरवठा रक्तात उपलब्ध करता येणे आवश्यक असते. किंबहूना गरोदरपणात श्वसनसंस्थेचे हे एक महत्त्वाचे कार्य असते. तसेच श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची सवय जर आपण विकसित केली तर डिलीव्हरीच्या वेळीही श्वासांचे वेगवेगळे व्यायाम वेगवेगळ्या स्थितीत सुलभ करता येतात. त्यामूळे प्रसूतीवेदना सोपी होते.
मनावरचा ताण हलका होतो व ताण संपुष्टात आल्यामूळे गर्भाशयाचे मुख उघडण्यास मदत होते. म्हणूनच गर्भावस्थेत जेवढे लक्ष आहार, औषधे व व्यायाम यावर द्यावे तितकेच लक्ष गरोदर स्त्रीने आपल्या श्वासाच्या व्यायामावर म्हणजेच प्राणायामावर द्यावे अर्थात त्यासाठी योग तज्ज्ञांची मदत ही हवीच हवी. प्राणायामावेळी गरोदर स्त्रीने करावयाचा संकल्प श्वासाचे सर्व व्यायाम चालू असताना गरोदर स्त्रीने मनामध्ये नित्य अशी भावना किंवा संकल्प करावा. जो अत्यंत आवश्यक आहे. ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा स्रोत विकसित होतो व सुलभ नैसर्गिक प्रसूती होण्यास मदत होते. या प्राणायामामुळे माझ्या शरीरातील सर्व स्नायूंना प्राणवायूचा चांगला पुरवठा होणार आहे.
माझ्या शरीरातील खराब, निर्जीव पेशी जाऊन नव्या निरोगी पेशींची वाढ होणार आहे. माझे हृदय, माझी फुप्फुसे, माझी पचनसंस्था, माझी किडनी व माझ्या शरीरातील सर्व ग्रंथींचे कार्य उत्तम चालू आहे. त्याचा परस्परांशी चांगला सुसंवाद चालू आहे ज्यामुळे माझ्या गर्भस्थ बाळाच्या सर्व संस्था चांगल्या विकसित होणार आहेत. माझ्या बाळाला रक्ताचा योग्य पुरवठा होत आहे. मी करीत असलेल्या प्राणायामामुळे माझ्या बाळाची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होत आहे. अशा सकारात्मक भावनेतून गरोदर स्त्रीने सदैव आपल्या गर्भस्थ बाळाचे चित्र डोळ्यासमोर आणावे व त्या सोनुल्याशी सुसंवाद साधावा.
श्वासोच्छवासाचे व्यायामतंत्र प्रत्येक गर्भवतीने श्वास घेताना आपल्या शरीरात चैतन्यदायी ऊर्जा व प्राणवायू माझ्या दोन्ही फुप्फुसात जात आहेत, ज्यामुळे माझी प्रसूती ही सुखद नैसर्गिक होणार आहे अशा सकारात्मक विचारानेच प्रसूतीपूर्व प्राणायामात श्वासोश्वासाचे तंत्र शिकून घ्यावे. पोटाने व छातीने श्वासोच्छ्वास कसा घ्यावा, मानसिक ताण असेल तर उथळ व जलद श्वास कसा घ्यावा व प्रसुतीकळांच्या वेळी बाळाला प्राणवायू चांगला मिळतो व त्याचे डोके लवकरच खाली येईल यासाठी कुठला श्वासोच्छ्वास करावा ह्याचे तंत्रयोग्य योग शिक्षकाकडून शिकून घ्यावे.
प्राणायामाचे वेळी असे चित्र रंगवा प्रत्येक प्राणायाम करण्याच्या वेळी शरिरातील एक ग्रंथी (एपवेलीळपश श्ररपव) याचे चित्र मनात रंगवायचे. या ग्रंथीतून संप्रेरक व्यवस्थित पसरत आहेत व माझ्या बाळापर्यंत जाऊन त्याच्या वाढीसाठी कार्यरत आहेत, ही सतत सकारात्मक कल्पना करावी. जिव्हाबंध बांधताना जमिनीवर मांडी घालून बसावे व डोळे बंद करावेत. जीभ बाहेर काढून तोंडाने श्वास घ्यावा व जीभ बाहेर ठेवूनच श्वास सोडावा.
असे चार वेळा दीर्घ श्वसन करावे. यामुळे घशाला घासून हवा आत बाहेर होत असल्याने घशाचे व टॉन्सिलचे विकार होत नाही.जर बाळामध्ये जन्मतःच थायरॉईड हार्मोन कमी असेल तर ते बाळ मतीमंद होण्याचा धोका असतो. जिव्हाबंध करताला गळ्यातल्या थायरॉईड ग्रंथीमधून थायरॉक्सीन संप्रेरक योग्य प्रमाणात निघत आहे. बाळाच्या मेंदूची वाढ उत्तम होत आहे, अशी सकारात्मक कल्पना करावी.
मात्र, सिंहमुद्रा करताना जमिनीवर सुखासनात म्हणजेच साधी मांडी घालून बसावे व डोळे बंद करावेत. जीभ बाहेर काढून हनुवटी खाली नेत नेत ती छातीला चिटकवावी व या स्थितीत चार दीर्घ श्वास घ्यावेत. श्वास घेताना तोंडावाटे घ्यावा व तोंडावाटे सोडावा. हे करताना मेंदूतली पिट्युटरी ग्लॅण्ड डोळ्यासमोर आणावी व त्यातून निघालेले सगळे संप्रेरक बाळाच्या शरीरातले होमिओस्टॅसिस किंवा बॅलन्स सांभाळत आहे हा सकारात्मक विचार करावा.
ब्रह्ममुद्रा करताना ब्रह्ममुद्रा करताना गरोदर स्त्रीने प्रथम जमिनीवर साधी मांडी घालून किंवा वज्रासनात बसावे. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवावेत. मान मागे नेत छातीकडे बघावे व जीभ टाळ्याला चिटकवून चार वेळा दीर्घ श्वास घ्यावा. परत मान सरळ करून मग आपली मान जेवढा ताण सुसह्य होईल इतपतच उजवीकडे जास्तीत जास्त वळवून मागे बघावे व परत चार दीर्घ श्वास घ्यावेत. जर चारवेळा दीर्घ श्वास घेणे जमत नसेल तर जेवढे जमेल तेवढ्या वेळा दीर्घ श्वास घ्यावा. परत मान सरळ करून डावीकडे जास्तीत जास्त वळवून चार दीर्घ श्वास घेऊन मग सावकाशपणे हळूहळू मान सरळ ठेवावी. कोणतेही असह्य होणारे ताण गरोदर स्त्रीने घेऊ नयेत.
अशा प्रकारे योग्य तऱ्हेने योगासने, प्राणायाम आणि हलकासा व्यायाम केल्यास जन्माला येणारे बाळही आरोग्यवान आणि योग्य वजनाचे असते. कोणत्याही परिस्थितीत शारीरिक चलनवलन योग्य प्रकारे ठेवणे, हे प्रत्येक गर्भवतीचे आद्य कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवावे.
– डॉ. शितल जोशी