तरुण वयात आपल्याला एखादा आजार झाला आहे हे मान्य करणे अनेकांना फार कठीण जाते. मान्य केलेच तरी त्याबद्दल काहीही उपाय करण्याचे अनेकदा टाळले जाते, पण अशा दुर्लक्ष करण्यामुळे, टाळाटाळीमुळे अनेकदा सहज बरा होऊ शकणारा आजार बळावत जातो. फार पूर्वी रक्तदाबाचा त्रास चुकूनच एखाद्याला व्हायचा. काही काळानंतर परिस्थिती बदलली आणि हा उतार वयातील किंवा पन्नाशीनंतरचा आजार म्हटला जायला लागला, पण आज आपल्याला जगभरात विशी आणि तिशीतील तरुणांमध्ये रक्तदाबाचा त्रास दिसू लागला आहे.
निरोगी माणसाचा रक्तदाब 80/120 असायला हवा. हा वरचा आकडा सिस्टोलिक आणि खालचा आकडा डायस्टोलिक असे म्हणतात. 90/130 ते 110/140 च्या मध्ये कुठेही जर हे आकडे राहत असतील तर त्याला उच्च रक्तदाब असे म्हटले जाते.
आज तरुणांमध्ये वयाच्या विशीत आणि तिशीत रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. सुरुवातीला अनेकदा ह्या त्रासाची लक्षणे सहज लक्षात येत नाहीत. म्हणून याला सायलेंट किलर असेही म्हणतात, पण सतत रक्तदाब जास्त राहिल्याने हृदयावर ताण येतो. त्यामुळे मग पुढे हृदयाचे विकार सुरू होण्याची शक्यता वाढते. रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होणे, किडनीवर ताण येऊन किडनीचे आजार सुरू होणे, मेंदूला नीट रक्तप्रवाह न मिळाल्याने लकवा येणे, डायबिटीस होणे, लैंगिक जीवनात कमजोरी किंवा अडथळे येणे, आंधळेपणा येणे, घोरणे, म्हणजे झोपताना श्वास घेण्यात अडथळा येणे असे अनेक आजार दुर्लक्षित रक्तदाबामुळे होऊ शकतात. रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याची अनेक कारणे आहेत, पण ही जवळजवळ सर्व कारणे बदललेले राहणीमान या महत्त्वाच्या घटकाकडे बोट दाखवताना दिसतात.
आपला रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी काही उपाय
रोजच्या आहारात भरपूर फळे आणि भाज्या ह्यांचा समावेश करावा. घरचे सकस भोजन घ्यावे.
आपल्या रोजच्या आहारातून फॅट्सना काढून टाकावे. तळलेल्या, जड पडणाऱ्या पदार्थांमध्ये, जंक फूडमध्ये फॅटस् मोठ्या प्रमाणावर असतात. हवाबंद प्लॅस्टिकमधील खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
दिवसभरातील मीठाच्या वापरावर थोडा आळा ठेवावा. रक्तदाब खूप नसेल तर मीठ पूर्ण बंद करण्याची गरज नाही, पण कमी नक्की करावे.
रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी वजन कमी करणे फार गरजेचे असते. शरीराचा स्थूलपणा जितका वाढत जातो तितकाच हृदयावरचा ताण आणि रक्तदाबाचा त्रास वाढत जातो. तुमच्या डॉक्टरांना विचारून तुमच्या उंची आणि वयाप्रमाणे तुमचे वजन किती असले पाहिजे हे जाणून घ्या.
दररोज शारीरिक व्यायामासाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. रोज कमीत कमी एक तास चालणे, धावणे, नाच करणे, पोहणे, एखादा आवडीचा मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे.
रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी दारू, सिगारेट किंवा इतर कोणत्याही उत्तेजनात्मक ड्रग्जचे सेवन बंद किंवा अगदी कमी करावे.
मानसिक ताणाचादेखील रक्तदाब वाढवण्यात हातभार असतो; त्यामुळे मानसिक ताण आटोक्यात ठेवा. त्यासाठी प्राणायम, योगा असे वेगवेगळे उपाय करा.
दुय्यम प्रकारचा रक्तदाब हा हार्मोन्सच्या कमी जास्त पातळीमुळे, किडनीच्या आजारांमुळे, दारू किंवा इतर काही ड्रग्जमुळे सुरू होतो. या प्रकारच्या रक्तदाबासाठी औषधे सुरू करणे महत्त्वाचे असते. तरुणांमध्ये रक्तदाबाचा आजार जितक्या झपाट्याने वाढतो आहे, तो तितक्याच सहज आटोक्यात आणता येऊ शकतो, गरज आहे ती फक्त सजगपणे जगण्याची.
सामाजिक कारणे…
आजच्या जगात तणाव नाही असा माणूसच सापडणे कठीण झाले आहे. प्रत्येकाला कसली तरी काळजी लागून राहिली आहे, त्याचा तणाव माणसाला सहन करावा लागत आहे. या तणावामुळे रक्तदाबाचा विकार जडताना दिसतो. प्रत्येकाचे काम हे टार्गेट ओरिएंटेड असे झालेले आहे. ते टार्गेट किंवा उद्दिष्ट पूर्ण करण्याचा ताण मनावर आल्यामुळे माणूस सतत तणावपूर्ण वातावरणातच जगताना दिसतो. त्याला मनापासून हसायलाही वेळ नाही. आनंदी आणि सुखी-समाधानी जीवन नाही, अशी अवस्था प्रत्येकाची झालेली आहे. वेळेवर न होणारे पगार, त्यामुळे देणी कशी भागवायची याचा येणारा तणाव हे माणसाला रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरतात. आपल्या हक्कासाठी, आपल्या केलेल्या कामाचा मोबदला मागण्यासाठी आपल्याला वारंवार हेलपाटे घालावे लागतात, पगारपैसा वेळेत मिळत नाही, त्यामुळे कार्यालयीन वातावरण तंग आणि तणावपूर्ण होते. त्याचा परिणाम रक्तदाबाच्या विकारांना बळी पडावे लागते. पगार वेळेत नाहीत तरी देणेकरी थांबू शकत नाहीत.
मोबाइल बिल, लाईट बिल, पाण्याचे बिल, सोसायटीचे बिल, घरभाडे, दूधवाला, रेशनवाला, गॅस असे कोणतेही खर्च माणसाला थांबवता येत नाहीत. बसचा, लोकलचा पास आहे, रोजचा खर्च आहे. हे करायचे कसे? पगारच वेळेत होत नसेल तर हे सगळे थांबवता येणे शक्य नसते. त्यामुळे ऋण काढून सण साजरे करावे लागतात, कर्जबाजारी होण्याची वेळ येते. त्याचा सगळा तणाव त्या कर्मचाऱ्याच्या मनावर राहतो. त्यातून एकेक दिवस जसा पुढे पुढे ढकलला जातो आणि एकेक दिवस जसा आजही पगार नाही हे समजते तसतसा त्या माणसाचा ताणतणाव वाढत जातो. घरी जाऊन कुटुंबीयांना काय सांगायचे, असा प्रश्न त्याच्या मनात असतो.
एवढ्या मोठ्या कंपनीत काम करता अन् पगार वेळेत मिळत नाही, यावर कोणी विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ त्या कर्मचाऱ्यावर येत असते. हे थांबवणे त्याच्या हातात नसते. त्याला फक्त आपला पगार वेळेवर मिळाला तर आनंदात राहता येणे शक्य असते. कारण वेळेवर पगार न होण्यामुळे तो कर्जबाजारी होतो. त्याची बाजारातील पत कमी होते. वेळेवर पैसे न देणारी व्यक्ती अशी ख्याती त्याची मित्र परिवारात, आप्तेष्टांत होत असते. अशावेळी अनेक संशयाच्या भोवऱ्यात तो अडकतो. एवढी मोठी नाव असलेली कंपनी पगार वेळेवर देत नाही यावर कोणी विश्वास ठेवत नाही आणि सत्य परिस्थिती कुठे बोलता येत नाही याचे टेन्शन घेऊन जगताना त्या माणसाच्या चेहऱ्यावरची रयाच गेलेली असते. अशावेळी रक्तदाबाचा विकार जडण्यापलीकडे त्याच्या पदरात काहीही पडत नाही.
– डॉ. एस.एल. शहाणे