उच्चरक्तदाब असेल तर मीठ खाऊ नये, असे सांगितले जाते. पण, अनेक रुग्णांना असं सांगितलेले आवडत नाही. मिठाशिवाय खायचे ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही. पण, यामागचे शास्त्रीय कारण आपण समजावून घेऊ. म्हणजे उच्चरक्तदाब असल्यास आपण स्वतःहून मीठ न खाण्याचे ठरवू शकू. ( salt harmful to high blood pressure )
आता मीठ काय काम करते हे पाहण्यासाठी एक उदाहरण पाहू. समजा एक कैरी घेतली. नुकतेच कैरीचे दिवस झाल्याने तुमच्या तोंडाला पाणीही सुटले असेल. तर आपण एक कैरी घेऊन चिरून ठेवून दिली तर थोड्यावेळाने काय होईल? तर, कैरी सुकून जाईल. पण, जर कैरीच्या तुकड्यांना मीठ लावून ठेवले तर काय होईल, कैरी सुकणार नाहीच. पण, कैरीवर पाणी आलेले दिसेल. कारण पाण्याला आकर्षित करण्याचा गुणधर्म मिठामध्ये आहे. आता मिठाचा हा गुणधर्म डोक्यात ठेवू.
आता आपल्या शरीराचा दुसरा महत्त्वाचा एक भाग, तो म्हणजे किडनी समजून घेऊ. आपल्या शरीरात सुमारे पाच लिटर रक्त वाहत असते.
एखाद्या व्यक्तीने समजा तीन ग्लास पाणी पिले. तर सुमारे अर्धा तासात ते पाणी रक्तवाहिन्यांमध्ये जाईल. म्हणजे तिथे रक्ताचे प्रमाण वाढले. त्यामुळे रक्तवाहिन्यावर दाब येईल. अशावेळी आपली कीडनी तिचे काम सुरू करते. रक्तवाहिन्यांमध्ये झालेले अतिरिक्त पाणी शोषून घेऊन, रक्तवाहिन्यांवरील दाब कमी करण्याचे काम किडनी करते. नैसर्गिकरित्या हे अत्यंत बेमालूमपणे घडत असते. त्यात आपल्याला वेगळे काही करायची गरज नसते. पण, आपण आपल्या जीवनशैलीमुळे निसर्गाने बनविलेल्या या अत्यंत सुंदर यंत्रणेत बिघाड करतो. ते कसे, तर पहा.( salt harmful to high blood pressure )
समजा एखाद्या व्यक्तीने आधी पाच-सहा चमचे मीठ खाल्ले आणि नंतर पाणी प्यायले तर काय होईल. वर दिलेल्या कैरीच्या उदाहरणात आपण पाहिले आहे की मीठ पाणी धरून ठेवते. आपल्या रक्तवाहिन्यात गेलेले मीठ तिथे आलेल्या पाण्याला धरून ठेवते. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर अधिक दाब निर्माण होतो. त्यामुळे उच्चरक्तदाब वाढतो. त्यामुळे आधीच उच्चरक्तदाब असलेल्या व्यक्तीने मीठ कमी खावे असे सांगितले जाते.( salt harmful to high blood pressure )