वजन वाढू नये म्हणून प्रयत्न करतोच आपण त्यासाठी मोड आलेली धान्ये हा उत्तम पर्याय आहे. विशेषतः न्याहारीसाठी मोड आलेली धान्ये घेतली पाहिजेत. त्यामुळे आपला खूप फायदा होतो. सोयाबिन, काळा चणा, मूग, मटकी इत्यादी कडधान्यांना मोड आणून खावीत. मोड आल्यामुळे धान्याची पौष्टिकता वाढते. मोडाची धान्ये सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. तंतुमय घटक असलेली मोडाची धान्ये सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होते. अंकुरित धान्यांमध्ये अँटी ऑक्सिडंट आणि ए, बी,सी आणि ई जीवनसत्त्वांनी युक्त असते.
त्याशिवाय फॉस्फरस, लोह, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम सारखे घटक असतात. अँटी ऑक्सिडंट मुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढते त्याचबरोबर कॅल्शिअम मुळे हाडांची ताकदही वाढते. लोहामुळे रक्तात हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.
त्यातील पोषक घटकांमुळे आरोग्य चांगले राहाण्यास मदत होते. मोडाच्या धान्यात प्रथिनांचे प्रमाणही जास्त असते त्यामुळे आजारपणापासून बचाव होतो. अंकुरित धान्यात कॅलरीचे प्रमाण कमी असते त्यामुळे वजन वाढण्याचा प्रश्न येत नाही.
अंकुरित धान्ये रक्त साफ होण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हा नैसर्गिक पौष्टीक आहार असल्याने त्याचे दुष्परिणाम काहीही होत नाहीत. मेदमुक्त असल्याने वजन वाढण्याची शक्यता नाही. हे पचण्यास सुलभ असते. त्याचे सेवन केल्यास भूक न लागण्याची समस्याही दूर होते.