दुपारच्या जेवणानंतर पोट जड झाले की अनेकांना डुलकी येते. रात्रीची झोप पूर्ण झाली नाही, वा फार श्रम झाले असले तरी डुलकी आल्याशिवाय राहात नाही. बसमधून प्रवास करताना शेजारचा प्रवासी डुलक्या घेता घेता आपल्या खांद्याची उशी करू लागतो हा देखील नेहमी येणारा अनुभव. खरं तर अशी डुलकी येणे हे आजकाल अशिष्टपणाचे लक्षण समजतात, पण अशी डुलकी ही आवश्यक असते, इतकेच नाही तर ती लाभदायक असते असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
पूर्वी आपल्याकडे जेवणानंतर वामकुक्षी करायची सवय होती, ती आरोग्यदायकच होती असे आता म्हणावे लागत आहे. दुपारच्या वेळी अशी डुलकी घेण्याला इंग्रजीत पॉवर नॅप असा वजनदार शब्द वापरला जातो आणि या पॉवर नॅपची आवश्यकता शास्त्रज्ञही बजावून बजावून सांगत आहेत.
आजच्या धकधकत्या जीवनात माणसाची झोप कायम अपूर्ण राहते आणि अपूर्ण राहिलेल्या झोपेचा कोटा पूर्ण करण्यासाठी डुलक्या अवतरतात. कधी काही क्षण-मान खाली झुकते आणि लगेच जाग येते. तर कधी काही मिनिटे.
या डुलक्या जर व्यवस्थितपणे मॅनेज केल्या तर अत्यंत लाभदायक असतात. माणसाला नेहमी ताजेतवाने राहण्यासाठी आपल्या व्यस्त शेड्युलमधून 10 ते 20 मिनिटांचा पॉवर नॅप घेण्याची आवश्यकता असते. अमेरिकन स्पेस एजेन्सी नासाच्या वतीने दररोज 10 ते 20 मिनिटांची पॉवर नॅप घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. जीे व्यक्ती दिवसातून एकदा तरी पॉवर नॅप घेते, ती व्यक्ती नेहमी टवटवीत राहते, असे दिसून आलेले आहे. नासाच्या संशोधकांनी लावलेल्या शोधानुसार दररोज 10 ते 20 मिनिटांची पॉवर नॅप शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या लाभदायक असल्याचे सिद्ध झाले आहे.
सध्या प्रत्येकाचे आयुष्य घड्याळाच्या काट्यावर पूर्णपणे आधारलेले आहे. अशात 7 ते 8 तास काम केल्याने माणूस थकून जातो. येणारी डुलकी टाळण्यासाठी मग प्रत्येक जण चहा, कॉफी घेत असतो. असे करून येणारी डुलकी टाळण्यापेक्षा जर 10 ते 20 मिनिटांची पॉवर नॅप घेतली, तर पुन्हा काम करण्यास उत्साह कायम राहतो. ऊर्जा वाढते.
हायपरटेन्शन कमी होते. हार्टअटॅक येण्याची शक्यता कमी होते. दुपारच्या डुलकीने रक्तदाब 3 मिमी एचजीने कमी होतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
ग्रेट इंडियन स्लीप स्कोरकार्डने दिलेल्या माहितीनुसार, 16 हजार नागरिकांबरोबर याबाबत चर्चा करण्यात आली. तर या चर्चेमध्ये 77 टक्के लोक 2 ते 3 दिवस ऑफिसमध्ये कामाच्या तासात झोपाळू स्थितीत असतात असे दिसून आले.
ग्रेट इंडियन स्लीप स्कोरकार्डने दिल्लीमध्ये केलेल्या सर्वेक्षणात 17 हजार लोकांना झोपेविषयी प्रश्न विचारण्यात आले, त्यापैकी 70 टक्के लोकांचे झोप पूर्ण न होण्याचे कारण समोर आले आहे. सतत सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे झोप पूर्ण न होण्याची ही समस्या फार गंभीर होताना दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत फेसबुक, व्हाट्सऍप इत्यादींच्या वापरामुळे ही बाब दिवसेंदिवस वाढत आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रोज 7 ते 9 तासांची झोप आरोग्यासाठी लाभदायक असते. झोप पूर्ण न झाल्यास डोके दुखणे, उच्च रक्तदाब यांसारखे आजार उद्भवतात.
कमी झोपेप्रमाणेच अति झोपही आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे 45 वर्षांवरील नागरिकांमध्ये हृदयविकार, मधुमेह, नैराश्य, लठ्ठपणा याचा धोका असल्याचा समोर आले आहे.
दुपारची झोप घ्यावी की नाही याबाबत मध्यंतरी खूप मतभेद होते, पण आता मात्र तुम्ही अगदी निश्चिंत मनाने दुपारी 10 मिनिटे ते 30 मिनिटांपर्यंत डुलकी म्हणजे पॉवर नॅप घेऊ शकता. त्याने आळस निघून जातो आणि मेंदू तरतरीत होतो.
नासाने पेन्सिल्व्हानिया युनिव्हर्सिटीच्या मदतीने एक अभ्यास केला होता. अंतराळात काम करणारे शास्त्रज्ञ आणि एकूणच सर्वसामान्य माणसे यांच्या झोपेचा हा अभ्यास होता, रात्रीची गाढ झोप आणि दुपारची डुलकी, म्हणजे पॉवर नॅप यावर हा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी 91 जणांची एक टीम 10 दिवस प्रयोगशाऴेत राहायाला आली होती.
त्यांच्यावर संशोधन करून शास्त्रज्ञांनी काही निष्कर्ष काढले. त्यात असे दिसून आले की, रात्री 6 ते 8 तास झोप घेतल्यानंतरही दुपारी 1 ते 3 या काळात एखादी डुलकी, म्हणजे पॉवर नॅप घेतली, तर अधिक ताजेतवाने वाटते आणि मेंदूला तरतरी येते. मेंदू तल्लख बनतो.
ही डुलकी 10 ते 30 मिनिटांची असावी. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ही डुलकी किंवा पॉवर नेप 90 मिनिटांपेक्षा अधिक असू नये यावर भर देण्यात आला, कारण त्याचा रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो. तसेच दुपारी 12 पूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतरही डुलकी म्हणजे पॉवर नॅप घेऊ नये.
हुकमी डुलकी येण्यासाठी मेडिटेशन, शवासन यांची माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.