शरीराची चुकीची ढब, अतिकष्टांमुळे येणारा थकवा किंवा अनारोग्यकारक जीवनशैली यांच्यामुळे जडलेली पाठदुखी म्हणून बरेचदा दुर्लक्षित राहून जाणारे दुखणे हे प्रत्यक्षात एक ऑटोइम्युन म्हणजे शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीच्या अनिर्बंध वागण्यामुळे उद्भवणारी एक स्थिती अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस (एएस) असू शकते, जी अवघ्या विशी आणि तिशीत गाठू शकते व कायमच्या अपंगत्वास कारणीभूत ठरू शकते. ( back pain remedies )
पुणे येथील पाहणीतून असे दिसून आले की, एएसच्या जवळ-जवळ 70 टक्के रुग्णांच्या बाबतीतल आजाराच्या सुरुवातीच्या 3 वर्षांमध्ये किंवा त्याहून अधिक काळ आजाराचे योग्य निदान होत नाही, परिणामी त्यांची स्थिती अधिकच बिकट होते.
अँकिलोजिंगस्पॉन्डिलायटिसची लक्षणे वेळीच ओळखा :
– हा आजार चाळिशीच्या आधी सुरू होतो.
– त्याची सुरुवात धीम्या गतीने होते.
– सकाळी आणि संध्याकाळी दुखणे बळावते
– बराच काळ हालचाल न झाल्यास शरीर जखडते.
– व्यायामाने स्थिती सुधारते; आराम केल्यास अधिक बिकट होते.
– पार्श्वभागामध्ये वेदना होऊ शकतात
– शिंकताना दुखते/छातीच्या फासळ्यात वेदना होतात . ( back pain remedies )
उशीराने झालेले निदान हे बहुतांश रुग्णांसाठी लक्षणीय आव्हान असल्याचे या पाहणीतून दिसून आले. एएसचे निदान उशीराने होणे ही एक वैश्विक समस्या असली तरीही ही पाहणी भारतीय दृष्टिकोनातून केली गेली. त्यानुसार 58 टक्के रुग्णांनी संधिवाततज्ज्ञांकडे जाण्यापूर्वी तीन वेगवेगळ्या विशेषज्ज्ञांची भेट घेतली होती. केवळ 31 टक्के रुग्णांच्या बाबतीत अचूक निदान झाले तर इतरांच्या बाबतीत संधीवाततज्ज्ञांची गाठ पडण्याआधी हे दुखणे बैठी जीवनशैली, चुकीची ढब किंवा गरोदरपणामुळे सुरू झालेले दुखणे, यांत्रिक दुखापत इत्यादी कारणांमुळे सुरू झाल्याचे चुकीचे निदान होत राहिले.
या आजाराचे निदान होण्यास सरासरी 5.5 वर्षांचा उशीर होतो व महिला रुग्णांच्या बाबतीत हा उशीर अधिकच ठळकपणे दिसून येतो. बहुतांश रुग्ण सर्वप्रथम आपली समस्या घेऊन अस्थिविकारतज्ज्ञांकडे जातात व अगदी थोडे जण सुरुवातीच्या चिकित्सेसाठी संधीवाततज्ज्ञांची भेट घेताना दिसतात.
संधिवाततज्ज्ञांची अपुरी संख्या आणि भारतामध्ये स्क्रिनिंगसाठी आवश्यक साधनांच्या परिणामकारक वापराचा असलेला अभाव या कारणांमुळे एएसरुग्णांचे निदान उशीरा होते.
शंभरातील एक व्यक्ती मणक्याच्या इन्फ्लेमेटरी आर्थ्ररायटीसने ग्रस्त असते. या स्थितीमध्ये मणक्याची हाडे एकमेकांशी जोडली जातात व मणका ताठर होतो. यामुळे पाठीला कायमचा पोक येतो. साधारणपणे 14-20 वर्षे वयोगटामध्ये जडणारा व पुरुषांच्या उत्पादक वर्षांची मोठी हानी करणारा हा आजार घरगुती उपचार करून किंवा दुकानात मिळणारी औषधे घेऊन बरा करण्याचा प्रयत्न रुग्णांकडून बरेचदा केला जातो. ( back pain remedies )
निदान आणि उपचारांना उशीर झाल्यामुळे उत्पादकता कमी होत असल्याचे, कामावरील गैरहजेरी वाढत असल्याचे व त्यामुळे नोकरीवरही गदा आल्याचे पाहणीतून दिसून आले. यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक स्थितीवर लक्षणीय परिणाम झाल्याचे दिसून आले. योग्य निदानाच्या अभावी हा साधा पाठदुखीचा प्रकार असल्याचे समजून 90 टक्के रुग्ण पर्यायी उपचारांचा आसरा घेतात. अशा रुग्णांनी संधिवाततज्ज्ञांची वेळीच भेट न घेतल्याने व योग्य उपचार सुरू न झाल्याने त्यांचे आजारपण तुलनेने जास्त काळापर्यंत सुरू राहते व त्यांच्या जीवनमानाचा दर्जा अधिक खालावतो.
एएस ही एक दुर्धर स्थिती असून बायोलॉजिक्ससारखी अभिनव औषधे आणि जीवनशैलीतील सुधारणा यांच्या आधारे तिच्यावर परिणामकारकित्या उपचार करता येतात व तीव्र लक्षणे आढळणारे रुग्णही उपचारांती एक सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात.( back pain remedies )