कोंडा बहुतेक सर्वांनाच होतो हे खरे आहे का? तर याचे उत्तर हो हे खरे आहे असेच असेल. दहापैकी पाच किंवा सहाजणांना कोंड्याचा त्रास होतो. विशेषत: स्त्रियांमध्ये डोक्यात कोंडा होण्याचे प्रमाण अर्थात जास्त आढळून येते. उन्हाळ्यात कमी होत जाणारा कोंडा हा थोडी थंडी पडू लागली मात्र पुन्हा डोके वर काढतो. कोरड्या आणि थंड वातावरणात कोंडा जास्त प्रमाणात होतो. याशिवाय प्रत्येकाची जीवनपद्धती, सेवन करत असलेले अन्नपदार्थ, त्वचेचा प्रकार आणि इतर काही छोट्या मोठ्या कारणाने डोक्यात कोंडा होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय ठरत असतात.
कोणत्या वयात कोंडा जास्त होतो?
सर्वसामान्य प्रकारचा कोंडा (ज्याला गार्डन व्हरायटी असं म्हणतता) तो पस्तीशी किंवा चाळीशीमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. पण कोंडा इतर वयात होतच नाही असे नाही. क्रॅडल कॅप नावाचा कोंडा तान्ह्या बाळालासुद्धा होतो. आईच्या शरीरातली काही हार्मोन्स बाळाच्या रक्तात मिसळली तर हा कोंडा होतो. सहा महिन्यांत बाळाच्या रक्तातले हे हार्मोन्स नष्ट होतात आणि कोंडाही आपोआप नाहीसा होतो
किशोरवयात कोंडा वारंवार का होतो?
दोषच द्यायचा असेल तर आपल्या जीन्सना म्हणजे जनुकांना द्यायला हवा. काहीजणांमध्ये ते अनुवंशीकच असते. मस्तकाच्या त्वचेच्या पेशी शरीरातील इतर ठिकाणी असलेल्या त्वचेच्या पेशींप्रमाणेच खालच्या थरातून वरच्या थरात सरकत येत असतात. मग त्या बाहेर टाकल्या जातात. याला 28 दिवस लागतात. या पेशी अतिसूक्ष्म असल्यामुळे साध्या डोळयांना दिसत नाहीत. आंघोळ करताना त्या निघून जातात. पण अनुवंशिकतेमुळे कोंडा होणाऱ्या व्यक्तींमध्ये ही प्रोसेस जरा वेगळी असते. किशोरवयात हार्मोन्समध्ये बदल होत असतो. त्याचाही परिणाम असतो.
अयोग्य आहार आणि केसांची नीट काळजी न घेणे यामुळे कोंडा होतो का?
त्वचेच्या तैलग्रंथीतून निघणारे सीबम हे तेलकट असल्यामुळे जेवणामध्ये तेलकट आणि तूपकट पदार्थ खाल्ल्यामुळे सीबमचे प्रमाण वाढते असा एक समज होता. पण आता त्याचे कारण हार्मोन्स आहे हे समजले आहे. तसेच रोज केसांना तेल लावल्याने कोंडा वाढतो असा एक समज होता तोही बरोबर नाही. केसांना आपण खोबऱ्याचे किंवा माक्याचे किंवा जे कोणते तेल लावतो त्यापेक्षा हे सीबम खूप वेगळे असते उलट रोज केसांना तेल लावल्याने आणि केस विंचरल्याने केसांमधला कोंडा काढून टाकण्यास मदतच होते. पण कंगवा जास्त वेळा फिरवू नये.ते खूप खाजवल्यासारखेच असते. त्यामुळे एका ठिकाणचे इन्फेक्शन दुसरीकडे पसरु शकते.
केसातील कोंड्याचा आरोग्यावर काही वाईट परिणाम होतो का?
तसा कोणताही वाईट परिणाम होत नाही. पण नखाने डोके खाजवल्यामुळे त्वचेचे बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ शकते. त्यात पू होतो. मानेला अवधान म्हणजे गाठी येतात. पण ही लक्षणे दीर्घकाळ कोंडा असेल तरच दिसतात. आता टीव्हीवरच्या जाहिरातीमुळे कोंड्याबाबत सर्वचजण इतके सावध झाले आहेत की दीर्घकाळ कोंडा राहातच नाही
कोंड्यावर प्रभावी उपाय कोणता आहे?
कोंडा होणे हे अनुवंशिक असल्यामुळे त्यावर रामबाण असे औषध अजूनही निघाले नाही. पण कोंड्यावर तात्पुरता इलाज करता येतो. रोजच्या रोज डोक्यावरून आंघोळ करा. आठवड्यातून दोनवेळा शाम्पूने केस धुवा. कोंडा जातो.
कोणता शाम्पू चांगला आहे हे कसे ठरवायचे?
शाम्पूचे मूळ दोन प्रकार आहेत. एक केसांचा शाम्पू आणि दुसरा आहे त्वचेचा शाम्पू. केसांच्या शाम्पूमुळे फक्त केसच स्वच्छ होतात. पण त्वचा स्वच्छ होत नाही. केसात कोंडा असेल तर केसांचा शाम्पू लावून कोंडा जात नाही. शाम्पूची सीबम आणि यीस्टवर क्रिया व्हायला हवी. तरच कोंडा जाईल. या शाम्पूमध्ये सेलीनियम सल्फाईड (सेल्सम), सीटाव्हॅलॉन, झिंक पायरीथीओन किंवा टार ही रसायने असतात. अशा शाम्पूने आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा डोके धुतले तर कोंडा जातो. वारंवार तोच शाम्पू वापरला तर त्याचा प्रभाव कमी होतो किंवा नंतर त्याचा परिणाम दिसतच नाही. एकदा केसाचा आणि एकदा त्वचेचा शाम्पू वापरावा.