बऱ्याचदा दात खूप किडला असेल तर ट्रिटमेंट करताना संपूर्ण कीड काढून झाल्यावर असे लक्षात येते की, दाताचा पुष्कळसा भाग पोखरला गेलाय. असे दात नुसतेच सिमेंट लावून ठेवले तर तुटू शकतात. एखादा दात जर खोलवर फ्रॅक्चर झाला तर तो काढावा लागतो. असे होऊ नये म्हणून दातांवर कॅप बसवतात. ( dental care information )
1. डेन्टल कॅप केव्हा केव्हा बसवावी लागू शकते ?
1. रूट कॅनल झालेल्या दातावर
2. इंप्लांट बसवला असेल तर त्याच्यावर चावण्यासाठी
3. जर ब्रिजच्या सहाय्याने नसलेले दात बसवायचे असतील तर बऱ्याच डेन्टल कॅप मिळून एक ब्रिज बसवता येतो.
4. जर एखादया व्यक्तीला दात चावायची सवय असेल, तर दातांची झीज होण्यापासून थांबवायला
5. जर एखाद्याच्या दातांचा आकार, रंग, ठेवण दुरूस्त करायची असेल तर डेन्टल कॅपच्या सहाय्याने स्माईल डिझाइनिंग करता येते.
डेन्टल कॅपचा रंग दातासारखा करता येतो का ? ( dental care information )
होय. डेन्टल कॅपचा रंग दातासारखा करता येतो. बऱ्याच वेगवेगळया प्रकारच्या कॅप्स करता येतात. आपल्या डॉक्टरांशी बोलून आपण ठरवू शकता की, आपल्यासाठी सर्वात उत्तम कोणती ठरू शकते. मेटल, सिरॅमिक मेटल असलेले, झिरकोनिया इत्यादी. बिना मेटलचे सिरॅमिक डेन्टल कॅपचा रंग अगदी हुबेहुब दातासारखा करता येतो. जर समोरचा दात असेल तर अगदी ओळखू न येण्याइतका रंगात साम्य आणता येते.
कॅप बसवण्यासाठी दातात काही फरक करावा लागतो का?
डेन्टल कॅप बसवण्यासाठी दाताला एक विशिष्ट आकार द्यावा लागतो. कॅप बसवण्यासाठी जागा तयार करावी लागते. त्यासाठी दात सर्व बाजूंनी लहान करावा लागतो.
कॅप बसवल्यावर अन्न चावायला त्रास होतो का ?
अन्नाचे चावणे व्यवस्थित व्हावे म्हणूनच आपण डेन्टल कॅप बसवतो. कॅप बसवल्यावर नेहमीच्या जेवणातले सर्व पदार्थ खाता यायला पाहिजेत. फक्त खूप चिकट पदार्थ खाणे टाळावे. त्याने कॅप निघून येऊ शकते.
डेन्टल कॅप निघून आल्यास नवीन कॅप बसवावी लागते का?
बसवलेली कॅप जर निघून आली तर तिचे निघायचे कारण निश्चित करणे महत्वाचे असते. जर आतला दात खराब झाल्यामुळे डेन्टल कॅप निघाली असेल, तर दात व्यवस्थित करून मग ठरवता येते की तिच कॅप बसेल का नवीन करावी लागेल. जर नुसतीच कॅप निसटून आली असेल तर 4-5 दिवसांत तीच बसवली जाऊ शकते. त्यानंतर डेन्टल कॅपचे फिट बिघडते. कॅप बसवल्यावर साधारण 1 तास काहीही खाऊ नये. तासभरानंतर खायला सुरवात करता येते.
डेन्टल कॅप बसवल्यावर दात घासताना ती पडेल का?
दात घासताना कॅप पडत नाही. कॅप बसवल्यावर ब्रशिंग व फ्लॉसिंग नियमितपणे चालू ठेवावे. डेन्टल कॅपची काळजी अगदी खऱ्या दातासारखी घ्यावी. तरच ती दीर्घकाळ टिकेल.
कॅप आयुष्यभर टिकते का? ( dental care information )
आपला खरा दात खराब झाला की त्यावर कॅप बसवावी लागते. जर खरा दात आयुष्यभर नाही टिकत, तर कॅप कशी टिकेल? एक कॅप साधारण 5-7 वर्षे टिकू शकते. जर मेंटेनन्स व्यवस्थित असेल तर अजून जास्ती दिवस टिकते.
कॅप बसवायची प्रक्रिया कशी असते?
पहिल्या भेटीत डेन्टीस्ट आपल्या दाताला आकार देऊन त्याचे माप घेत असतो. दुसऱ्या भेटीत ट्रायल घेतली जाते. जर ट्रायल व्यवस्थित असेल तर तिसऱ्या भेटीत डेन्टल कॅप बसवली जाते.