पुणे – माणसाचं मन शांत असणं ही एक आदर्श स्थिती आहे. त्याचप्रमाणे माणसाचा मनाजोगा उत्कर्ष होणं ही पण एक आदर्श स्थिती आहे. परंतु एकाच वेळी दोन्हीही स्थिती प्राप्त होत असताना त्या माणसाचं मन अशांतच असतं. तो त्याच्या ध्येयामागे धडपड करत असतो या प्रयत्नात त्याचं मन गुंतलेलं असतं. त्यामुळे चांगल्या प्रकारे का होईना पण मन यावेळी अशांतच असतं. अशावेळी मनावर ताण (stress) निर्माण होतो.
माणसाला जाणतेपणी आणि अजाणतेपणी उत्कर्ष व मन:शांती या दोन्ही गोष्टी एकाच वेळी पाहिजे असतात. पण उत्कर्ष आणि मनाची शांती यांच्यातला संघर्ष हा मानवी जीवनातला मूलभूत संघर्ष आहे. प्रगती हवी असेल तर कष्टाची गरज असते. आणि कष्टासाठी मनात ईर्षा, प्रेरणा असावी लागते. ईर्षेच्या, प्रेरणेच्या अभावी माणूस काहीही करू शकत नाही. जिथे ईर्षा, प्रेरणा आहे तिथे मनाला शांती नाही.
ध्येयपूर्तीचा ध्यास माणसाला लागला की तो माणसाच्या मनाचा कब्जा घेत नाही तोपर्यंत त्याच्या ध्येयाप्रत पोहचू शकत नाही. पर्यायांने मनाला शांतता लाभत नाही. आपल्याला आलेला ताण (stress) दूर होण्यासाठी ताणाचं (stress) मूळ कारणच दूर होणं आवश्यक असतं. त्यासाठी ताण निर्माण करणारी परिस्थिती आपल्याला नेमकी समजायला हवी. ती नेमकी समजली तरच त्यातली समस्या आपल्याला स्पष्ट दिसेल. मग तिची संभाव्य उत्तरं लक्षात घेऊन ती कोठे आणि कशी मिळवता येतील याची रूपरेषा आपल्याला आखता येते. त्याद्वारे आराखडा ठरवून कृती केली की, ताणाचा (stress) निचरा होईल.
1) ताणाचा (stress) निचरा होण्यासाठी प्रभावी मार्ग म्हणजे व्यायाम. मात्र ताण (stress) असताना कोणताही व्यायाम करण्यापेक्षा असाच व्यायामप्रकार निवडावा की ज्यामध्ये शरीराच्या अनेक सांध्यांची हालचाल होईल, पण दमछाक होणार नाही. अशा प्रकारांत संथ गतीनं दिर्घकाळ पायी चालणं, संथ गतीनं सायकल चालवणं किंवा संथ गतीन पोहणं, योगासनं इ. समावेश होतो. व्यायामात स्नायूंच आकूंचन-प्रसरण होणं जसं अभिप्रेत असतं तसचं स्नायूंच्या कमाल शक्तीच्या दोन तृतीयांश एवढी शक्ती वापरून स्नायूंच जे आकुंचन होईल ते सहा सेकंद टिकवून धरणं म्हणजे व्यायाम होय.
* ताणाच्या (stress) परिस्थितीत स्नायूंचं आकुंचन दीर्घकाळ टिकून राहतं त्यामुळे त्यातं नेहमीएवढं रक्त जाऊ शकतं नाही. शिवाय स्नायूंमध्ये तयार होणारं लॅक्टिक ऍसिड रक्तप्रवाहाबरोबर बाहेर न पडल्याने अंगही दुखू लागतं व स्नायूंवर विपरीत परिणाम होतो. ताणाच्या (stress) परिस्थितीत होणारे हे विपरीत परिणाम टाळण्यासाठी स्नायूंना पुरेसा प्राणवायू आणि ऊर्जा मिळायला हवी. त्यासाठी स्नायूंची हालचाल म्हणजेच आकुंचन-प्रसरण होण्याची नितांत गरज आहे. म्हणूनच व्यायामाला पर्याय रहात नाही.
2)दूरपर्यंत पायी फिरायला जाणं हा पण एक ताणाचा (stress) निचरा करण्यासाठी उत्तम मार्ग ठरतो. पण या प्रकारात मानसशास्त्रीयदृष्ट्या आणखी एक फायदा होतो तो म्हणजे समस्या निर्माण झालेल्या ठिकाणापासून शरीरदृष्ट्या आपण दूर जातो. अशाप्रकारे दूर गेल्यानंतर आपलं मनही त्या समस्येपासून दूर जातं. मनासाठी हा बदल आवश्यक असतो, गरजेचा असतो. मनाला रंजन हवं असतं. आपण लांब फिरायला गेलो की तेथे वारा वाहत असतो, झाडांची पानं हालत असतात. काही गळत असतात ताणाच्या परिस्थितीपेक्षा हे वातावरण वेगळं असतं. त्यामुळे या बदलाचा मनावर परिणाम होतो आणि ते उल्हासित होतं.
3) मनाच्या तीन मूलभूत गरजा असतात. (अ) थोपटणं, (ब) बदल, (क) वेळापत्रक
1) थोपटण: आपल्या मनाला नेहमीच प्रेमाने थोपटण्याची गरज असते त्यामुळे आपलं कोणीतरी आहे, ही आपली म्हणवणारी व्यक्ती आपल्या पाठीशी आहे, आपल्याला कोणत्याही संकटात तिचा आधार आहे, हा दिलासा जसा मनाला शांतवत असतो तसचं आपण एकटे नाही ही भावना वाढीला लागून मनाला उत्साह प्राप्त होतो. मन कृतिप्रवण होण्यास मदत होते. तसचं या व्यक्तीला आपलं कौतुक आहे, किंवा आपणही काही कौतुकास्पद गोष्टी करत आहोत किंवा केल्या आहेत किंबहुना करू शकतो ही भावना अशा थोपटण्याने निश्चितच वाढीला लागते. यातून माणसात आत्मविश्वास निर्माण होतो. आत्मविश्वास निर्माण होणे किंवा असलेला वाढीला लागणं ही तर जीवनातल्या आनंदाची मूलभूत गरज असते. त्यामुळे ती भागवली जाणं फारचं महत्वपूर्ण ठरतं. म्हणून आपल्या मनासाठी कोणीतरी थोपटण्याची जी गरज असते ती भागवली जाते.
2)बदल: आपल्या मनाला बदलाची नितातं गरज असते आणि तीही वेळोवेळी! हा बदल जागेचा, वातावरणाचा, परिसराचा, कामाचा, एवढचं नव्हे तर कपड्यांचा, भेटणाऱ्या माणसांचा, दैनंदिन कार्यक्रमाचा… असा कशातलाही बदल मनाला ताजतवानं करू शकतो. मनाची प्रसन्नता वाढवू शकतो. म्हणून अशा प्रकारचा बदल मनाला लाभतो आहे की नाही याची खात्री करून घेणं सहकाऱ्याचं ठरतं.
3) वेळापत्रक: आपल्या मनाला सतत व्यग्रतेची गरज असते. त्यादृष्टीने एक काम पूर्ण झालं की पुढे आपण काय करणार याची आखणी किंवा तजवीज असणं आवश्यक असतं. जोपर्यंत मनाला माहित असतं की आपला विश्रांती व्यतिरिक्तचा आजचा वेळ कार्यक्रमात, किंवा या कामात व्यतीत होणार आहे. तोपर्यंत मन त्या-त्या कृतीत व्यग्र राहतं. जेव्हा आता पुढे काय करायचं? अशी स्थिती उद्भवते तेंव्हा माणसाला कंटाळा येऊ लागतो. या कंटाळ्याच्या मन:स्थितीत नको ते; नको तसे म्हणजे थोडक्यात नकारार्थी विचार त्याच्या मनात येऊ लागतात. त्याचवेळी आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडू शकतं म्हणून अशी वेळ येणार नाही अशी खबरदारी घ्यावी, त्यादृष्टिने आपण आज काय काय करणार याची दररोज आखणी करावी. म्हणजे मन अशा यादीत व्यग्र राहते व शांतही राहते.
* वाचन किंवा चिंतन: प्रत्येक भाषेतील विविध पुस्तकातील विचार कालातीत आहेत. त्यांच्या वाचनाने, मननाने, चिंतनाने माणसाला मार्गदर्शन मिळतं. मन दैनंदिन जीवनातल्या ताणतणांपासून दूर राहत. प्रसंगी आपल्या समस्यांना अशा साहित्यातून उत्तरही सापडू शकतं. याप्रमाणे ताणाचा (stress) निचरा होण्यासाठी अशा प्रकारांचा अवलंब केल्यास मनावरील आलेला ताण (stress) दूर होण्यास नक्कीच उपयोग होईल व आपण ह्या सुंदर जगाचा आनंद लुटू शकू.
* समूहात जावं, उठावं, बसावं, चर्चा करावी. वैचारीक देवाणघेवाण करावी यातून आपलं मन मोकळं होऊ शकतं. आपलं म्हणण कोणीतरी ऐकून घेतल्यानेही मनावरचा ताण (stress) कमी व्हायला मदत होते. अशा
चर्चेतून आपल्या समस्येचे उत्तरही मिळू शकते.
* कर्मकांड: कोणतीही कृती अथवा कोणतेही कामं ठरावीक वेळी किंवा ठरावीक पद्धतीने करण्याचं बंधन आपण आपल्यावर घालून घ्यावं. त्यामुळे ते काम त्याचवेळी आणि त्याच पद्धतीने पार पाडण्यासाठी आपलं मन तत्पर राहतं. गुंतून राहिल्याने मन ताजं तवानं राहतं.
* नव निर्माण क्षमता: कोणत्याही नवनिर्माणाच्या कामातून मनाला नेहमीच आनंद प्राप्त होतो म्हणून आपल्याला जे आवडत असेल ते, जे जमत असेल ते किंवा ज्याची गरज आपल्याला फार जाणवत असेल ते काम करण्यास सुरूवात करावी. आपलं मन, आपल्या समस्येपेक्षा वेगळ्या विषयांत गुंतून राहिल्याने मनाला चांगला विरंगुळा मिळतो. मनावरचा ताण (stress) दूर होतो.
आलेला ताण (stress) दूर होण्यासाठी ताणाचं मूळ कारणच दूर होणं आवश्यक असतं. त्यासाठी ताण (stress) निर्माण करणारी परिस्थिती आपल्याला नेमकी समजायला हवी. ती नेमकी समजली तरच त्यातली समस्या आपल्याला स्पष्ट दिसेल. ताणाचे (stress) मूळ कारण शोधणे आवश्यक असते.
– डॉ. शीतल जोशी