हिवाळ्यात भरपूर भूक लागते. शिवाय अन्न पचनही चांगलं होतं. त्यामुळे थोडं वजन वाढवणाऱ्या ताकद वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करण्यात हरकत नाही. नवीन धान्यांपासून बनवलेले पदार्थ या दिवसांत खाल्ल्याने आरोग्य बिघडत नाही. मात्र, या सर्वामुळे अपचन होणार नाही, याचीही काळजीही घ्यायला हवी. गहू, तांदूळ, उडीद, तीळ टाकून खिचडी केली जाते. ती या ऋतूत पथ्यकर समजली जाते. ( winter season diet plan )
दिवाळी संपली. तुळशीचं लग्नही लागलं. कार्तिक पौर्णिमेला बरंच गारठल्यासारखं झालं. फ्रीझचा दरवाजा उघडून पुढ्यात उभं राहिल्यावर जाणवतो अगदी तसाच अनुभव आला. आता ठिकठिकाणी रात्रीच्या शेकोट्या पेटलेल्या दिसू लागल्या आहेत. दिवस छोटे आणि रात्री मोठ्या झाल्या आहेत. या दिवसांत पहाटेच्या गुलाबी थंडीत रजई ओढून झोपून राहण्याचा मोह बहुतेकांना आवरत नसेल. ही थंडी सुरू झाल्याची अचूक लक्षणं आहेत.
थंडीच्या दिवसांचे आपण दोन भाग करू शकतो. एक गुलाबी थंडीचा आणि दुसरा बोचऱ्या थंडीचा. सध्या गुलाबी थंडी सुरू आहे. हा गुलाबी थंडीचा काळ हेमंत ऋतू म्हणून ओळखला जातो. या काळात थंडपणाबरोबर हवा कोरडी होत जाते. वातारवरणातील कोरडेपणा हळूहळू वाढत जातो. नंतर नंतर हवा बोचरी होते. बंद वाहनांतून प्रवास करताना आपण काचांवर बाष्प धरत गेल्याचं पाहतो. हा परिणाम असतो बोचऱ्या हवेचा.
वातावरणातील या बदलांप्रमाणे आपल्या शरीरातही बदल होतात. त्वचेलगतच्या शिरा संकुचितात. रोमरंध्रंही संकुचित पावतात. त्यामुळे जो उष्मा शरीराबाहेर पडायला हवा तो शरीरातच कोंडून राहातो. या परिस्थितीत भूकही छान लागते. पचनही चांगलं होतं. अशा शरीरस्थितीत आपणही आपल्या आहारात बदल करायला हवे.
तृणधान्यं गहू
खाण्यात तांदळापेक्षा गव्हाचे पदार्थ वाढावेत. गहू तांदळापेक्षा थोडे स्निग्ध आणि पचायला जड असतात. या दिवसांत गाईच्या दुधापासून तयार केलेलं साजूक तूप लावून पोळ्या खाव्यात. गव्हाच्या पिठापासून केलेले पदार्थ उदा. भरपूर तूप टाकून केलेला हलवा, बदमी हलवा, चुरमे लाडू इ. खायला हरकत नाही. ( winter season diet plan )
साजूक तुपात केलेल्या गव्हाचा शिरा खाण्यास हरकत नाही. या गोड शिऱ्यात काजू, बदाम, बेदाणा, वेलची, अननसासारख्या फळांचे बारीक तुकडे घालून त्यातील पोषणमूल्यात वाढ करता येईल. तिखट उपमा करताना त्यात उडीद आणि काजू घालण्यास काहीच हरकत नाही. गव्हाच्या पिठाच्या शेवया किंवा गवल्यांची खीर करावी. या शेवयांचा गोड किंवा तिखट-मिठाचा शिरा करता येतो. मोहनथाळ किंवा वड्याही सकाळी न्याहरीच्या वेळी देता येतात. भाजणीच्या चकल्या, करंज्या, शंकरपाळ्यांत गव्हाचे पीठ वापरतात. त्यामुळे हे पदार्थही या सीजनला खाण्यात असण्यात काहीच हरकत नाही. गव्हाचं पीठ तुपात भाजून त्यात काजू, शेंगदाणा कूट मिसळायचं.
या मिश्रणात गुळाचा एकतारी पाक मिसळावा. मिश्रण एकजीव करून लाडू वळावेत. हे लाडू आरोग्यादायी समजले जातात. बेसनच्या लाडवात गव्हाचा रवा घालून रवा-बेसन लाडू करतात. डिंकाच्या किंवा मेथीच्या लाडवात गव्हाचं पीठ वापरण्यास काहीच हरकत नाही.
बाजरी : ( winter season diet plan )
बाजरी ही गव्हाच्याच गुणधर्माची असली तरी रुक्ष आहे आणि पचायला हलकीही आहे. गव्हाबरोवर अधून मधून बाजरीचाही खाण्यात वापर करावा. या धान्यांच्या पिठाची भाकरी करतात. याचा गव्हाप्रमाणेच रवा काढून त्याची खिचडी करता येते. बाजरीच्या पिठापासून बनवलेल्या भाकरीची पौष्टीकता वाढवण्यासाठी यात थोडं उडिदाच्या डाळीचं पीठ मिसळतात. उन्हाळ्यात ज्वारी आणि हिवाळ्यात बाजरी खावी. संक्रांतीपर्यंत तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोण्याबरोबर खाण्याची देशावर पद्धत आहे. वाढत्या वजनाची नको इतकी काळजी असणाऱ्यांनी गहू न खाता या दिवसांत बाजरीचा वापर करावा. बारीक माणसांनी या भाकऱ्या लोण्याबरोबर खाव्यात.
ज्वारी :
दिवाळीच्या सुमारास किंवा आत्ता दिवाळीनंतर ज्वारीची कोवळी कणसं भाजून त्यात तीळ मिसळून खाण्याची पद्धत आजही लोकप्रिय आहे. बरोबर वांग्याचं भरीत आणि ताजं दही खाण्याची रीत आहे.
उडीद :
महाराष्ट्राला आता उडीद नवीन नाहीत. रोजच्या रोज आपण उडीद खात असतो. इडली-डोसा, उत्तप्पासारख्या खाद्यपदार्थात उडदाच्या डाळीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. कोकणी लोकांचं तर आंबोळ्या म्हणजे पंचपक्वान्न. मूग-उडदाचे लाडू करतात. उडदाचे पीठ, मेथी, साखर, सुकामेवा यांच्यापासून साजूक तुपात केलेल्या वड्या गुजराती समाजात अददिनो पाक या नावाने प्रसिद्ध आहेत. ज्यांना उडीद पचत नाहीत त्यांनी मुगाच्या डाळीपासून पदार्थ बनवावेत.
खाजकुजलीच्या बिया :
उडदाचे गुणधर्म या खाजकुजलीच्या बियांतही आहेत. गुजराती हलवायांच्या दुकानाबाहेर कौंचापाक नावाच्या मिठाईच्या जाहिरातीचे बोर्ड आता झळकू लागले आहेत. पावासाळ्यात खाजखुजलीच्या वेली येतात. त्यांना शरद ऋतूत मलमली शेंगा येतात. शेंगावरची तुसं अंगाला खाज आणतात. शेंगा हिवाळ्यात पिकल्यावर त्यांच्या बियांचं पीठ केलं जातं. मग करतात पिठाची मिठाई. नवविवाहितांना ही मिठाई खायला देण्याची पद्धत रूढ आहे.
दुधाचे पदार्थ ( winter season diet plan )
गाईच्या किंवा म्हशीच्याही दुधाचा वापर करण्यास हरकत नाही. दही, ताक, लोणी, तूप, खवा-मावा, खीर-पायस, बासुंदी, सायीच्या बर्फीचा आहारात उपयोग करण्यास काहीच हरकत नाही. केसर टाकून दूध प्यावं.
ऊस आणि उसाच्या रसापासून केलेले पदार्थ हेही पदार्थ या थंडीच्या दिवसात आरोग्यादायी असतात. उसाच्या रसातून भरपूर उष्मांक मिळतात. तसंच साखर, गूळ, काकवी हे पदार्थही उसाच्या रसापासूनच तयार करतात. साखरेपेक्षा गुळाचा वापर करून केलेले पदार्थ या ऋतूत खाणं आरोग्यास केव्हास चांगलं. गूळ उष्णही आहे. गूळपापडी, चिक्की, त्यातूनही सुकामेवा टाकून केलेली चिक्की, गुळाच्या पाकात केलेले लाडू खावेत.
यावरून आपल्या हे लक्षात येईल की, प्रत्येक ऋतूत निसर्ग आपल्याला खाद्य पुरवतो, पण त्याचा वापर आपण आपल्या आहारात कसा केला पाहिजे, हे आपल्या हातात असतं. हा वापर करताना आरोग्य बिघडणार नाही, याचंही भान राखावं.( winter season diet plan )