नैसर्गिकरीत्या आई न होता विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आई होणं ही नक्कीच नवीन आणि दखलपात्र बाब आहे. टेस्ट ट्यूब बेबीसारख्या विज्ञान तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या काही प्रयोगांची आपल्याला माहिती आहेच. आता याहीपुढे जाऊन फ्रोझन एग टेक्नॉलॉजी या एका नवीन तंत्राच्या आणि एका विशिष्ट प्रक्रियेच्या सहाय्याने आई होण्याच्या आनंदात आणखी भर घातली आहे. आज माजी जगतसुंदरी डायना हेडन आई झाली आहे. ही मोठी गोष्टं नाही पण वयाच्या 42व्या वर्षी वैद्यकीय संशोधनाच्या आधारे आई होणं ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. डायनाने 2008 साली आपली प्रजनन क्षमतेची बीजं एका विशेष प्रक्रियेच्या सहाय्याने गोठवून, जपून ठेवली होती.
डायनाला वाचनाची आवड असल्याने तिच्या वाचनात या प्रक्रियेबद्दलची माहिती आली होती. त्यात तिला विशेष रस निर्माण झाल्यामुळे तिने त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. अशी स्त्री प्रजनन क्षमतेची बीजं गोठवून ठेवण्याची प्रक्रिया परदेशात होते.
हे डायनाला माहीत होते. पण भारतातदेखील ती उपलब्ध आहे हे माहीत नसल्याने तिने तिच्या मित्रपरिवारात याची चौकशी केली. एका मित्राने तिला याबद्दल माहिती दिली आणि डॉ. नंदिता पालशेतकर यांच्याशी तिची ओळख करून दिली. डायनाच्या मतानुसार, ही प्रक्रिया स्त्रीला विज्ञानाची देणगी असल्याने तिचा फायदा तिने घेण्याचा ठरवलं. तिशी-पस्तिशीत असताना डायना आई होण्याची जबाबदारी स्वीकारण्याच्या तयारीत नव्हती. तिला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. आयुष्यात पुढे या स्त्री बीजांची गरज पडेल अशी शंका निर्माण झाली आणि तिने 2008 साली स्वतःची बिजं गोठवून ठेवण्याचा निर्णय घेतला.
काय आहे ही प्रक्रिया आणि ती भारतात कशी आली..?
ही प्रक्रिया डॉ. हृषिकेश पै यांनी 2007 साली भारतात आणली. पूर्वी ही प्रक्रिया थोडी अवघड होती असं त्यांचं म्हणणं आहे. विज्ञानात अनेक प्रयोग होत असतात त्यामुळे स्त्री बीजं गोठवून ठेवण्याची प्रक्रियादेखील तशी सोपी आणि सहज झाली आहे. ही प्रक्रिया करताना डॉ. पै यांच्या मतानुसार, स्त्रीच्या प्रजनन क्षमतेची बीजं काढण्याआधी स्त्रीला काही इंजेक्शन्स दिली जातात. त्यामुळे प्रजनन क्षमतेची बीजं स्त्री शरीरात अधिक प्रमाणात तयार होतात. मग त्या स्त्रीला गुंगीचं औषध देण्यात येते आणि एका सुईद्वारे तिची बीजं काढली जातात. ही काढलेली बीजं एका स्ट्रोमध्ये ठेवून त्याला लिक्विड नायट्रोजन गॅस, ज्याचं तापमान-200 डिग्री इतकं असतं, त्यात गोठवून जपून ठेवली जातात. जेव्हा एखाद्या स्त्रीला स्वतःचं मूल हवं असेल किंवा ती जबाबदारी स्वीकारण्यास सक्षम असेल तेव्हा तिची ती गोठवलेली बीजं तिच्या नवऱ्याच्या वीर्य यांच्याशी मेळ करून एम्ब्रियो तयार केला जातो. तो एम्ब्रियो मग स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो. थोडक्यात, शेवटची जी प्रक्रिया असते ती टेस्ट ट्यूब बेबीच्या प्रक्रियेसारखी असते.
ही प्रक्रिया ऐकल्यानंतर ती किती खात्रीलायक आणि सुरक्षित आहे असा विचार मनात येतो. पण या शंकेचं निरसन डॉ, नंदिता पालशेतकर करतात. या टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे त्यात तज्ज्ञ निर्माण झाले आहेत आणि त्यामुळे आत्मविश्वासाने त्या सांगतात की, ही प्रक्रिया संपूर्ण सुरक्षित आहे. विज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे डॉ. पालशेतकर स्त्रियांना आणि जोडप्यांना सकारात्मक निकालाची खात्रीही देतात. डॉ. पालशेतकर असंही म्हणतात की, आजची स्त्री ही घर सांभाळून स्वतःचं करिअरदेखील सांभाळत असते. अशात तिची जीवनशैली खूप धकाधकीची झाल्यामुळे काही प्रमाणात याचा परिणाम तिच्या शरीरावर होत असतो आणि म्हणून एखाद्या स्त्रीला जर बीजं गोठवायची, जपून ठेवायची असतील तर तिनं वयाच्या पस्तीशीत ती गोठवून ठेवावी. कारण नंतर स्त्री बीजाच्या प्रजननाची क्षमता कमी होत जाते.
यावर डॉ.पै असाही सल्ला देतात की गोठवून ठेवलेली बीजं वापरावीच लागतात असे नाही. कारण नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होणे केव्हाही योग्य पण जर तसं होतं नसेल किंवा एखाद्या स्त्रीची प्रजनन क्षमता कमी झाली असेल तर या गोठवून ठेवलेल्या बीजांचा गर्भधारणेसाठी उपयोग करता येतो आणि नैराश्य येत नाही.
अशा पद्धतीने यशस्वीरीत्या एक आई झालेली डायना आता आजच्या स्त्रियांना एक सल्ला देते. ही विज्ञानाची प्रगती आपल्याकरिता आहे. तिला विज्ञानाची देणगी समजून तिचा स्वतःच्या भल्यासाठी आणि पारिवारिक सुखासाठी उपयोग करा.
डायनाने या प्रक्रियेद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे. तिचं नाव तिने आर्या ठेवलं आहे. विज्ञानाच्या आणखी एका चमत्कारामुळे भारतीय महिलाही जेव्हा त्यांना हवं तेव्हाच आई बनण्याचं सुख प्राप्त करू शकतात आणि म्हणून भारतीय महिलांसाठी ही विज्ञानाची देणगी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.