पूर्वी गुटगुटीत दिसणाऱ्या बाळांकडे कौतुकाने पाहिले जायचे आणि जाड माणसांना खात्या-पित्या घरचा अशी चांगली उपमा दिली जायची. पण आता मात्र या संकल्पना बदलून मगुटगुटीतफ वर्गात मोडणारी बालके स्थूल तर नाहीत ना हे तपासून पहाण्याची वेळ आलेली आहे. गेल्या दोन दशकांमध्ये जगात सर्वत्रच आणि विशेष करून भारतासारख्या विकसनशील देशात लहान मुलांमधील स्थूलता झपाट्याने वाढत चालली आहे. नुकत्याच झालेल्या काही सर्वेक्षणांमधून असे समोर आले आहे की भारतातील जवळपास 15 ते 20% मुलांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे.
शहरी भागात काही खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये हेच प्रमाण 30% इतके जास्त आहे. स्थूलतेचे आरोग्यावर होणारे वेगवेगळे परिणाम विचारात घेता लहान मुलांमधील स्थूलता हे एकविसाव्या शतकातले सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सर्वात मोठे काळजीचे कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यावर त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
स्थूलतेची कौटुंबिक पार्श्वभूमी, काही आजार व औषधे यासारखी कारणे सोडली तर स्थूलतेची इतर कारणे लहान मुलांच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये दडलेली आहेत. सध्या वेगाने घडणारे शहरीकरण, आर्थिक संपन्नता आणि पाश्चात्य जीवनशैलीचे अनुकरण यामुळे लहान मुलांचा आहार झपाट्याने बदलत आहे. याचबरोबर तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे शारिरीक हालचाली कमी व्हायला लागल्या आहेत. याचे पर्यवसन स्थूलतेमध्ये होत आहे.
लहान मुलांमधील स्थूलतेची कारणे:
स्थूलतेच्या कारणांचा विचार करायचा झाला तर तो बाळाच्या जन्माच्या आधीपासूनच करायला हवा. गर्भारपणामध्ये आईने योग्य आहार न घेतल्यास किंवा आईला गर्भारपणात मधुमेह झाल्यास बाळ जन्मतःच स्थूल असते. बाळाच्या जन्मानंतर बाळाला पुरेसे स्तनपान न दिल्यास, वरचे अथवा पावडरीचे दूध दिल्यास बाळाचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता असते. यानंतर वरचे अन्न सुरु करताना अनेक बाळांना जास्त साखर, गूळ, तूप वापरून विविध पदार्थ दिले जातात. हळूहळू बाळांच्या आहारात बिस्कीटे, केक, चॉकोलेट्स, चिप्स अशा पदार्थांचा शिरकाव व्हायला सुरुवात होते.
थोडे मोठे झाल्यावर पिझ्झा, बर्गर, फंगरचिप्स, शीतपेये अशा जंक फूडशी मुलांची मैत्री होते आणि हळूहळू अशा पदार्थांची चटक लागते. टी.व्ही. वरील खाद्यपदार्थांच्या जाहिराती यात भर घालतात. लहान मुलांमध्ये गेल्या 20 वर्षांमध्ये शीतपेयांचे सेवन 300 पटींनी वाढले आहे. या आकडेमोडीवरून मुलांमधील वाढत चाललेल्या स्थूलतेची कल्पना येईल. याचबरोबर लहान मुलांमध्ये आता मैदानी खेळांची जागा टी.व्ही., मोबाईल आणि व्हिडीओ गेम्सने घेतली आहे. अभ्यासाचा अतिताण, त्यामुळे शारिरीक हालचालींवर मर्यादा, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा अतिवापर, परिणामी होणारी अपुरी झोप या सगळ्याचा परिणाम मुलांचे वजन वाढण्यात होत आहे.
लहान मुलांमधील स्थूलतेचे दुष्परिणाम:
वजन वाढले की अनेक शरीरांतर्गत क्रियांचा, चयापचयाचा, संप्रेरकांचा समतोल ढासळतो. त्यामुळे वाढलेले वजन हे इतर अनेक रोगांना कारण ठरते. स्थूलता प्रामुख्याने मधुमेह उच्चरक्तदाब, रक्तातील चरबी वाढणे अशा आजारांना निमंत्रण देतेच, शिवाय शरीरापलीकडे जाऊन अनेक मानसिक व्याधींनाही कारण ठरते. बेढब शरीरामुळे स्थूल मुलांचा त्यांच्या स्वतःकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो, आत्मविश्वास कमी होतो, ती एकटी एकटी रहायला लागतात, मित्रमैत्रिणींमध्ये मिसळायचे, खेळांमध्ये सहभागी व्हायचे टाळतात. यातून त्यांच्यामध्ये नैराश्यही येऊ शकते. स्थूल मुलींमध्ये मासिक पाळी लवकर येऊ शकते, ती अनियमित होऊ शकते व याची परिणती पॉलिसिस्टीक ओव्हरी व वंध्यत्व यासारख्या दुष्परिणामांमध्ये होऊ शकते. लहान वयातच स्थूलतेमुळे वरील काही आजार उद्भवल्यास प्रौढ वयात त्या आजारांचे दुष्परिणाम दिसण्याची दाट शक्यता असते
लहान मुलांमध्ये स्थूलता टाळण्यासाठी काय करावे?
स्थूलतेचे वरील दुष्परिणाम पाहिल्यावर लक्षात येईल की स्थूलता झाल्यानंतर त्यावर उपाय करण्यापेक्षा ती होऊ नये म्हणूनच काळजी घेणे श्रेयस्कर आहे. त्यासाठी पुढील पावले उचलता येतील.
1) गरोदरपणातली काळजी: नवजात बाळांमधील स्थूलता टाळण्यासाठी गर्भारपणात आईच्या आहाराची योग्य काळजी घ्यायला हवी. आईचे वजन योग्य रीतीने वाढत आहे ना, आईची रक्तशर्करा चांगली आहे ना याची खातरजमा करायला हवी. हे केल्यास बाळाचे वजन जन्मतःच जास्त भरणार नाही.
2) पहिले सहा महिने केवळ स्तनपान करणे बाळाला पहिले सहा महिने केवळ स्तनपान करावे. वरचे काहीही देऊ नये. या काळात वरचे दूध, पावडरचे दूध पूर्णपणे टाळावे. बाळांना बाटलीची सवय मुळीच लावू नये.
3) आहारात साखर व मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवावे : सहा महिन्यांनंतर वरचे अन्न सुरु करताना पहिले वर्ष त्यात साखर, गूळ अथवा मीठ यापैकी काहीही घालू नये. शिवाय यावेळी पॅकबंद पदार्थ (उदा. बिस्कीटे) पूर्णपणे टाळावे. किमान एक वर्ष स्तनपान सुरु ठेवावे. एक वर्षानंतरही बाळांच्या आहारात साखर, गूळ, मीठ, तूप यांचा मर्यादित प्रमाणात वापर करावा. आता साखर आणि मीठाला तंबाखूची उपमा दिली जाते. या दोघांचाही अतिवापर घातक असतो आणि हळूहळू जिभेला याची चटक (व्यसन) लागते.
4) आहारातील भाज्या व फळे भरपूर घेणे: भाज्या आणि फळांमधील तंतूमय पदार्थ पोट भरायला मदत करतात शिवाय अनेक पोषकद्रव्येही पुरवतात. त्यामुळे मुलांना ताज्या भाज्या व फळे भरपूर द्यावीत. फळांचे रस देऊ नयेत.
5) तहान लागल्यावर पाणीच पिणे. बऱ्याच घरांमध्ये हल्ली शीतपेये सर्रास आढळून येतात. तहान लागली की मुले पाण्याऐवजी शीतपेये, सरबते यांना प्राधान्य देतात. हे टाळायला हवे. साखर घातलेली कोणतीही पेये नियमित स्वरूपात घेणे टाळावे. तहान लागल्यानंतर पाणीच प्यावे.
6) पॅकबंद पदार्थ व जंक फूड टाळणे: बहुतांशी पॅकबंद पदार्थ (बिस्कीटे, केक, चिप्स, चॉकलेट्स) वजन वाढण्यासाठी कारण ठरतात. पॅकबंद पदार्थांवरील फूड लेबल्स वाचल्यास त्याचे कारण कळेल. या पदार्थांमध्ये साखर, मीठ आणि फॅट्सचा सढळहस्ते वापर केला असतो. शिवाय पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसा यासारखे जंक फूड नियमित स्वरूपात खाणे म्हणजे स्थूलतेला निमंत्रणच. सहा महिन्यातून एकदा गंमत म्हणून खायला हरकत नाही!
7) टी.व्ही. चा वापर कमीत कमी ठेवणे : टी.व्ही. पहाणे म्हणजे मोकळ्या हवेत खेळण्याचा किंवा रात्री झोपेचा वेळ वाया घालवणे. शिवाय घराघरांमध्ये सहकुटुंब टी.व्ही. समोर जेवण घेतले जाते. टी.व्ही. पहात जेवल्याने जास्त खाल्ले जातेच शिवाय टी.व्ही. वरील जाहिराती लहान मुलांना जंक फूडकडे आकर्षित करतात. टी.व्ही. पाहून मुले हे पदार्थ घरात आणण्याचा हट्ट करतात. पर्यायाने टी.व्ही. हे मुलांमधील स्थूलतेचे मोठे कारण ठरतो.
8) लहान मुलांना खेळायला प्रवृत्त करणे : हल्लीची मुले अभ्यासाच्या ओझ्याखाली दबली गेली असतात. दिवसभर शाळा – क्लास यातच त्यांना अडकवून ठेवले असते. बाकीचा वेळ मुले घरात टी.व्ही. समोर किंवा मोबाईलसमोर असतात. खेळायला वेळ मिळत नाही. मुलांनी मोकळ्या हवेत कमीत कमी एक तास खेळायला हवे. मुलांना चालण्याची, व्यायाम करण्याची जबरदस्ती करू नये. त्यांच्या आवडीचा भागदौड करायला लागणारा कोणताही खेळ म्हणजे त्यांच्यासाठी उत्तम व्यायाम आहे.
9) जागरणे टाळावी : अनेक मुले टी.व्ही., मोबाईलमध्ये गुंतून रहातात आणि रात्री उशीरा झोपतात. काही मुले परीक्षा जवळ आली की रात्री जागून अभ्यास करतात आणि अशावेळी कॉफी, चिप्स असे खाद्यपदार्थ खातात. अपुरी झोप आणि अवेळी, चुकीचे खाणे या दोन्ही गोष्टी स्थूलतेला कारण ठरतात. मुलांनी 8 ते 9 तास सलग झोपले पाहिजे.
पालकांची भूमिका
लहान मुले अनुकरणप्रिय असतात. पालक म्हणजे मुलांच्या खाण्या-पिण्याच्या, व्यायामाच्या बाबतीतले पहिले आदर्श! आई-वडील चुकीचं खाताना दिसले, सतत टी.व्ही. / मोबाईलमध्ये व्यस्त असलेले दिसले की मुले त्यांचे अनुकरण करणारच. अनेक घरांमध्ये पालक मुलांना दर वीकेन्डला हॉटेलिंगला घेऊन जातात. दोन मिनीटांच्या अंतरावर असणाऱ्या शाळेत मुलांना गाडीने सोडायला जातात. घरी प्रेमापोटी बळजबरी खायला लावतात. अन्नपदार्थांचा (कॅडबरी, मिठाई) बक्षीस म्हणून वापर करतात.
हे सगळे मुलांच्या वजनाच्या दृष्टीने घातक आहे. हे टाळायला हवे. पालकांनी मुलांच्या वजनाबाबत जागरूक रहायला हवे. नियमितपणे – दर महिन्याला मुलांचे वजन तपासायला हवे. ते बरोबर आहे ना याची खात्री करायला हवी. ते जास्त असल्यास वेळीच जागे होऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. खरंतर मुलांना आरोग्यदायी सवयी लावण्यामध्ये कुटुंबातील सर्वांनाच सामील करून घ्यायला हवे. घरी पालक आणि इतर कुटुंबिय पौष्टिक खाताना दिसले आणि नियमित व्यायाम करताना दिसले की मुले आपसूकच त्यांचे अनुकरण करतील.
शाळांची भूमिका
शाळा म्हणजे मुलांचे दुसरे घरच! दिवसाचा बराच वेळ मुले शाळेत असतात. अनेक शाळांमध्ये आजही मुले डबे घेऊन जातात. काही शाळांमध्ये डब्यात काय आणायचे याचा तक्ता दिला असतो. हा तक्ता तयार करताना आहारतज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. अनेकदा तक्ता दिला असतो पण त्याचे पालन होताना दिसत नाहीत. याकडेही लक्ष द्यायला हवे. हल्ली काही खाजगी शाळंमध्ये मुलांना जेवण दिले जाते. यात बऱ्याचदा पावभाजी, नूडल्स, छोले-भटुरे असे मुलांच्या आवडीचे पण त्यांच्या वजनासाठी घातक पर्याय असतात. हे बदलायला हवे. अनेक शाळांच्या कॅन्टीनमध्ये किंवा शाळांच्या बाहेर वडा-पाव, समोसे, कच्छी दाबेली, चिप्स असे पदार्थ असतात.
मुले ते खाणारच. काही दिवसांपूर्वी शाळेसभोवतालच्या परिसरात अशा पदार्थांवर बंदी आणण्याच्या निर्णयावर विचार सुरु होता पण याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. यावर विचार करून योग्य पावले उचलायला हवीत. याबरोबरच शाळांनी मुलांच्या वजनांची नियमित तपासणी करून त्याची नोंद ठेवायला हवी. आरोग्यदायी आहार, वजन यावर मुलांसाठी व महत्वाचे म्हणजे पालकांसाठी कार्यक्रम, व्याख्याने आयोजित करायला हवीत. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी लहान वयातील स्थूलतेचे प्रमाण नक्की कमी होईल आणि आजची निरोगी मुले उद्याच्या निरोगी भविष्याचा पाया ठरतील!