आपल्या सर्वांना “तारे जमीं पर’ या चित्रपटातील इशान अवस्थी (दर्शिल सफारी) आठवतो का? तो ब च्या जागी व किंवा 3 च्या जागी 6 लिहायचा. अक्षरांमध्ये गोंधळच व्हायचा. त्या चित्रपटाने आपल्याला डिस्लेक्सिया या रोगाची ओळख करून दिली. ह्या रोगात मुलं इतर अनेक मुलांप्रमाणे लिहिणे, वाचणे करू शकत नाहीत. ही एक प्रकारची अक्षमता आहे.
पण आपल्याकडे अजूनही शिक्षित पालकही ही अक्षमता स्वीकार करू शकत नाहीत, हे सत्य आहे. एका अभ्यासानुसार प्रत्येक बालकात डिस्लेक्सियाची लक्षणे असतात. पण काहींमध्ये ती तीव्र स्वरूपाची असतात. आपल्या मुलांमध्ये किंवा जवळपासच्या कोणाही मुलामध्ये ही अक्षमता असल्यास आपली भूमिका कशी असली पाहिजे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
यासाठी एक उदाहरण पाहूया. खोडकर डोळे, हसरा चेहरा पण स्वभावाने चंचल असलेल्या आदित्यच्या पालकांना त्याच्या शाळेतील बाईंनी बोलावून त्याला चांगल्या बालरोगतज्ज्ञाकडे दाखवून आणण्याचा सल्ला दिला. त्याला दिलेला घरचा अभ्यास करण्यास काही अडचणी येत असाव्यात म्हणून कदाचित. पण तिथे गेल्यावर आदित्यच्या काही क्षमता चाचण्या डॉक्टरांनी करून घेतल्या.
या मूल्यांकनात आदित्यचा बुद्ध्यांक सामान्य बुद्ध्यांकापेक्षा म्हणजे 90-110 पेक्षा खूप अधिक म्हणजे 126 असल्याचे दिसून आले. पण शाळेत मात्र त्याची कामगिरी समाधानकारक होत नव्हती त्यामुळे त्याचा बुद्ध्यांक एवढा असेल असे वाटत नव्हते. पण आदित्यला काहीतरी अडचण होती. तोंडी उत्तरे देणे त्याला सहजशक्य होत होते पण लिहिताना मात्र तो उलटसुलट लिहीत होता. उजव्याला डावे, डाव्याला उजवे म्हणत होता. त्यामुळे त्याला डिस्लेक्सिया ही अक्षमता होती.
भारतीय डिस्लेक्सिया असोसिएशननुसार भारतातील 15 ते 20 टक्के मुलांना डिस्लेक्सियाची समस्या भेडसावत असते. तर साधारण 1000 मुले असणाऱ्या शाळेत 150 -200 मुले या समस्येने ग्रस्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
डिस्लेक्सिया म्हणजे काय?
ही एक प्रकारची अक्षमता आहे ज्यामध्ये मेंदूच्या लिहिण्या-वाचण्याच्या क्षमतेवर याचा परिणाम होतो. त्याला रीडिंग डिसॉर्डर असे नाव देण्यात आले आहे. मुलं साधारणपणे 6 ते 7 या वयोगटात असताना अक्षरे ओळखायला लागतात. पण ज्या मुलांना डिस्लेक्सिया आहे त्यांना अक्षऱे ओळखता येत नाहीत. एकसारखी दिसणारी अक्षरे, आकडे बी आणि डी, 13 आणि 61 किंवा 3 आणि 6 यांच्यामध्ये ते गडबडून जाताना दिसतात. शाळेत शिकवला जाणारा धडाही त्यांना उशिरा समजतो पण लक्षात राहात नाही. ही अक्षमता अनुवांशिकही असू शकते असे काही अभ्यासातून समोर आले आहे.
कसे ओळखावे?
ज्या मुलांना डिस्लेक्सिया झालेला असतो त्यांच्यामध्ये काही लक्षणे दिसून येतात.
वर्तणूक समस्या, मोठी वाक्ये न कळणे, गणितात कच्चे असणे त्याचबरोबर फळ्यावर लिहिलेले उतरवता न येणे, नीट उच्चार न करता येणे, उशिरा बोलणे, शब्द नीट न बोलणे, रंग, अक्षऱे, आकडे या अगदी साध्या गोष्टी न ओळखता येणे. तसेच खराब हस्ताक्षर, अक्षऱे उलटसुलट लिहिणे, उच्चारातील फरक न समजणे, तसेच परदेशी भाषा शिकण्यात अडचणी येणे. त्याचप्रमाणे संख्या, व्यक्तींची नावे लक्षात न राहणे, दिशा न समजणे, डावे उजवे, वर खाली यातील फरक न समजणे, अवयवांचा ताळमेळ न घालता येणे त्यामुळे लेस बांधणे, शर्टची बटणे लावणे आदी गोष्टी न करता येणे.
डिस्लेक्सिया हा आजार नव्हे…
हा कोणता आजार किंवा रोग नाही तर ही एक अक्षमतेची अवस्था आहे. त्याच्याशी मुलांच्या बुद्धिमत्तेचा काहीही संबंध नाही. अभ्यासाव्यतिरिक्त कोणतीही कामे करण्यास त्यांना अडचणी येत नाहीत. त्याव्यतिरिक्त ते आपल्या आवडीच्या क्षेत्रात खूप चांगले काम करतात. ही अक्षमता असणाऱ्या व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकतात. प्रत्येक व्यक्तीगणिक या समस्येची तीव्रता कमी अधिक होत असते. काही वेळेला डिस्लेक्सिया बरोबर डिस्कैल्कुलिया, डिस्प्रैक्सिया किंवा अटेंशन डेफिसिट अशाही अक्षमता मुलांमध्ये आढळून येतात. यावर वेळीच इलाज केला गेला तर समस्या नियंत्रित करता येते.
आपण काय करू शकता? अक्षमतेचा स्वीकार करा
आपल्या मुलामध्ये ही अक्षमता आहे याचा स्वीकार न केल्यामुळे यावर उपचार होण्यास वेळ लागतो. आपल्या मुलामध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास तज्ज्ञाचा सल्ला घेणे उत्तम. काही वेळा मुलांना विशेष शिक्षण देऊनसुद्धा ही समस्या कमी होऊ शकते.
कोणाकडून मिळेल मदत?
नोंदणीकृत चिकित्सक, क्लिनिकल किंवा रिहॅबिलिटेशन सायकोलॉजिस्ट, ऑक्युपेशनल थेरेपिस्ट, स्पीच किंवा लॅग्वेज थेरेपिस्ट, विशेष शिक्षक यांच्याकडून या समस्येवर मदत मिळवू शकतो. भारतीय रिहॅबिलिटेशन कौन्सिलकडून या सर्वांना मान्यता दिलेली असली पाहिजे.
शिक्षकांना भेटा?
विविध प्रकारे अभ्यास शिकणे, विशेष शिक्षकांची मदत घ्या. हस्ताक्षर आणि अभ्यास यांच्याशी निगडीत इतर कौशल्य आत्मसात केली जाऊ शकतात. ऑडियो बुकच्या मदतीने अभ्यास हा या मुलांसाठी पर्याय असू शकतो.
वातावरण तयार करा ः
या मुलांच्या क्षमतेनुसार अभ्यास करण्यासाठी तसे वातावरण तयार करा. एखाद्या शांत जागी त्यांचा अभ्यास घ्यावा. दिलेला अभ्यास पूर्ण करण्यास अधिक वेळ द्यावा. घरात शांतता राखावी. मुलांना ज्या क्षेत्राची आवड आहे ते करण्यास प्रोत्साहन द्यावे.
हीन भावना वाढू देऊ नका ः
काही वेळेला आपण अशा मुलांना ते इतर मुलांसारखे नाहीत असे जाणवून देतो. पण त्यामुळे मुलांवर कधी कधी परिणाम होऊन ते स्वतःला हीन किंवा कमी दर्जाचे समजू लागतात. मुलांना काही आजार नाही हे समजावून सांगा. त्यांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करा.
उपचारतज्ज्ञ निवडताना काळजी घ्या ः
आपल्या घराजवळ असणाऱ्या तज्ज्ञाची निवड करणे चांगले. विषयातील तज्ज्ञता, त्यांची प्रसिद्धी आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या सुविधा या सर्वांविषयी जाणून घ्या.
काही गोष्टींकडे लक्ष द्या
– द येल सेंटर फॉर डिस्लेक्सिया अँड क्रिएटिव्हीटी या अमेरिकन संस्थेनुसार
– शब्द किंवा अक्षरे उलटसुलट लिहिणाऱ्या प्रत्येक मुलाला डिस्लेक्सिया झालेला असतो असे नाही. सामान्यपणे सर्वच मुले सुरुवातीला असे करतात.
– काही मुले किंवा मोठे सुद्धा हळूहळू शिकू शकतात. पण बऱ्याचदा त्यांना अभ्यासात अडचणी येतात.
– ही समस्या फक्त मुलांमध्ये आढळते असे नाही तर ती मुलींमध्येही असू शकते.
अक्षम असूनही गुणवान –
– कोडी सोडवण्यात ही मुले अव्वल ठरतात.
– अफाट कल्पनाशक्तीचे वरदान या मुलांमध्ये असते.
– तोंडी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवतात.
– डिझाईन, ड्रामा, संगीत आदी कलेशी निगडीत क्षेत्रात उत्तम चमक दाखवतात.
– गोष्टीचे सार लवकर समजून येते.
– अभ्यासाव्यतिरिक्त अनेक क्षेत्रात जसे कॉम्प्युटर्स, क्रीडा प्रकार, सर्जनशील कामांमध्ये या मुलांना विशेष गती असते.
– इतरांविषयी प्रेम, सहानुभूती या भावना प्रबळ असतात.
समस्या कधी वाढते?
ज्या मुलांमधील ही अक्षमता किंवा डिस्लेक्सिया ओळखला जाऊ शकत नाही त्यांची ही समस्या काळाबरोबर वाढतच जाते. ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत त्यामुळे ही मुले पुढे अभ्यास करू शकत नाहीत किंवा शिकू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात एक कमीपणाची, हीन भावना रुजायला लागते. त्यामुळे ते अभ्यासात मागे पडतात आणि सातत्याने नापास होत राहतात. तसेच इतर मुलांच्या तुलनेत ते स्वतःला कमी लेखू लागतात. त्यामुळे त्यांच्यावर ताण येऊ लागतो.
अभ्यास जमत नसल्याने पालक त्यांना शिक्षा करतात, रागवतात. त्यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होतोच पण आपण बावळट किंवा वाईट आहोत असा त्यांचा पक्का समज होतो. त्यामुळे आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो. त्यामुळे भविष्यात त्यांना भावनिक आणि व्यावहारिक या दोन्ही समस्या भेडसावू शकतात.
– डॉ. संतोष काळे