डायबेटिक न्यूरोपॅथी याचा शब्दश: अर्थ रक्तशर्करेचे प्रमाण सातत्याने अधिक राहिल्याने मज्जातंतूंची हानी होणे असा आहे. डायबेटिक न्यूरोपॅथी झालेल्या रुग्णांना भेडसावणाऱ्या वेदना इतक्या तीव्र असतात की, त्यामुळे शांत झोप लागत नाही, दैनंदिन कामकाज करण्यात अडचणी येतात तसेच आयुष्याचा आनंद उपभोगताही येत नाही.
reflexology foot massage both feetडायबेटिक न्यूरोपॅथीमुळे कमरेखालच्या भागात वेदना आणि अवघडलेपण येते. मधुमेह झालेल्या प्रौढांमध्ये शरीराच्या खालच्या भागात संरक्षक संवेदना कमी होणे किंवा नाहीशा होण्याने तोल सांभाळणे, पायांना जखमा होणे आणि आयुष्याचा दर्जा घसरणे अशा समस्या भेडसावतात.
जगाच्या तुलनेत भारत मधुमेहींची संख्या असलेल्या देशांच्या यादीत दुस-या क्रमांकावर आहे, कोट्यवधी मधुमेही सध्या भारतात असून तातडीचे प्रतिबंधात्मक उपाय योजले नाही तर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज आहे की मधुमेहाने ग्रासलेल्यांपैकी बहुसंख्य रुग्णांना डायबेटिक न्यूरोपॅथीने कुठल्या तरी प्रकाराने विळखा घातलेला असतो आणि वर्षाहून अधिक काळ मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये त्याचा धोका अधिक असतो. हा विकार रक्तशर्करेची मात्रा नियंत्रणात ठेवू न शकणाऱ्या आणि लठ्ठ व्यक्तींमध्येही दिसून येतो.
डायबेटिक न्यूरोपॅथीचे प्रकार :
शरीरावर परिणाम करणाऱ्या जागांवरून डायबेटिक न्यूरोपॅथीचे प्रकार आढळतात, ते पुढीलप्रमाणे आहेत
पेरिफेरल न्यूरोपॅथी – सर्वाधिक आढळणाऱ्या न्यूरोपॅथीच्या या प्रकारात टाच, हात, दंड, पाय आणि तळव्यांमध्ये दुखणे जाणवते.
ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी – या प्रकारात शरीराच्या अशा भागांवर परिणाम होतो ज्याच्या कार्याची आपल्याला सतत जाणीव होत नाही.
उदाहरणार्थ- पचन, मलाशय आणि मूत्राशयातील हालचाली, घाम येणे, लैंगिक कार्यक्षमता आणि हृदय, फुप्फुसे, डोळे, रक्तदाब नियंत्रित करणारे मज्जातंतू.
प्रॉक्झिमल न्यूरोपॅथी – मांडया, नितंब, कंबर यांच्यावर परिणाम करणाऱ्या न्यूरोपॅथीच्या या प्रकारामुळे पायांमध्ये अशक्तपणा येतो.
फोकल न्यूरोपॅथी – एक मज्जातंतू किंवा त्याच्या समूहावर परिणाम झाल्याने अचानक स्नायूंमध्ये अशक्तपणा किंवा तीव्र वेदना उद्भवतात.
डायबेटिक न्यूरोपॅथीशी संबंधित वेदना
डायबेटिक न्यूरोपॅथीचा प्रादूर्भाव झाल्याने पाय आणि तळव्यांमध्ये बधिरपणा किंवा झिणझिण्या येतात. काही व्यक्तींमध्ये डायबेटिक न्यूरोपॅथीची लक्षणे सौम्य प्रकारची असतात, पण काही दुर्दैवी व्यक्तींमध्ये या कमालीच्या वेदनादायी व जीवघेण्या ठरू शकतात. दुर्धर न्यूरोपॅथिक वेदना मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आढळून येतात.
दुर्धर डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे न्यूरोपॅथीची समस्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणे. न्यूरोपॅथीमध्ये जळजळ, विजेच्या धक्क्यासारख्या वा खुपल्यासारख्या वेदना आणि खोलवर वेदना अशी लक्षणे आढळतात.
दिवसाच्या तुलनेत रात्री या वेदना तीव्र रूप धारण करतात. या विकारात केवळ वेदनाच उद्भवतात, असे नाही तर चित्तवृत्ती आणि झोपेवर परिणाम होणे, स्वावलंबन आणि स्वाभिमानाला धक्का पोहोचणे, परस्पर नातेसंबंधांवर दुष्परिणाम होणे, अशा घटनांमुळे मधुमेही रुग्णांच्या जीवनमानाच्या एकूणच दर्जावर कमालीचा परिणाम होतो.
डायबेटिक न्यूरोपॅथी वेदनांवर उपचार करताना- डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे उद्भवणाऱ्या वेदनांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे असले तरी रक्तशर्करा पातळी नियंत्रणात ठेवणे हा या विकारावर उपचार, प्रतिबंधाची पहिली पायरी आहे. मधुमेहामुळे मज्जातंतूची झालेली हानी भरून काढण्यासाठी सध्या कुठलेही उपचार उपलब्ध नाहीत.
त्यामुळेच, रक्तशर्करा पातळीची मर्यादा नियंत्रणात ठेवल्याने लक्षणे आणि वेदना नियंत्रणात राहण्यास मदत होते. खरं तर, भारतातील मधुमेही रुग्णांमध्ये डायबेटिक न्यूरोपॅथीविषयी जागरूकता नाही, त्यामुळे त्यावर उपचार लवकर केले जात नाहीत. त्यामुळेच, डायबेटिक न्यूरोपॅथी झालेल्या रुग्णांचा विकार दुर्धर होऊन त्याचे रूपांतर डायबेटिक फूटमध्ये होऊन, पाय कापण्याची वेळ येते.
न्यूरोपॅथीक वेदनांमध्ये मेडिकल स्टोअरमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणाऱ्या पॅरासिटामॉल आणि आयबुप्रोफेन यासारखी औषधे फारशी प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळेच, औषधे घेण्याआधी रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही श्रेयस्कर. डायबेटिक न्यूरोपॅथी झालेल्या रुग्णांमध्ये विकार बळावून दुर्धर डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये त्याचे रूपांतर होते. डायबेटिक न्यूरोपॅथीवर सुरुवातीलाच उपचार करण्यास सुरुवात केली तर त्याची वाढ खुंटते आणि वेदनांवरही नियंत्रण राहते.
लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी
सातत्याने रक्तशर्करेचे प्रमाण अधिक राहिल्याने मज्जातंतूंना हानी पोहोचते, याच अवस्थेला डायबेटिक न्यूरोपॅथी असे म्हणतात.
डायबेटिक न्यूरोपॅथी ही मधुमेहींमध्ये सर्वाधिक आढळणारा बिघाड आहे.
न्यूरोपॅथीची वेदना म्हणजे जळजळ, टोचण्याची वा खुपसल्याची भावना, असामान्य किंवा अतिसंवेदनशील आणि खोलवर दुखणे.
डायबेटिक न्यूरोपॅथीवर सुरुवातीलाच उपचार करण्यास सुरुवात केली तर त्याची वाढ खुंटते आणि वेदनांवरही नियंत्रण राहते. औषधांच्या दुकानात सहज आणि प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणा-या पॅरासिटेमॉल आणि आयबुप्रोफेन न्यूरोपॅथीच्या वेदनांमध्ये फायदेशीर ठरत नाही.