डिंक हा पदार्थ सर्वांच्या परिचयाचा आहे. झाडांचा, विशेषतः जी संस्कृतमध्ये क्षीरीवृक्ष म्हणून म्हटलेली झाडे आहेत, त्यांचा आतील चीक बाहेर वाहतो व वाळून झाडास चिकटून राहतो. तो डिंक होय. बाभळ, वड, पिंपळ, खैर वगैरे झाडातून डिंक फार येतो. त्याचे पिवळे खडे असतात. हा डिंक थंड पाण्यात टाकला असता विरघळतो व विरघळल्यानंतर ते सबंध डिंकाचे पाणी चिकट होते. डिंक हा एक मोठे घरगुती औषध आहे.
वायूचा खोकला, कफावर उपयुक्त : वायूचा सुका खोकला असला, खोकून खोकून घसा पिंजला, आवाज बसला, यावेळी डिंकाचे लहान लहान खडे तोंडात धरावे, त्याने वायूचा खोकला लवकर थांबतो व कफही सुटतो.
जळजळ व आग होत असल्यास : पोटात, गळ्यात, छातीत, परसाकडच्या जागेवर किंवा लघवीच्या जागेवर कोठेही जळजळ झाली असता , शरीराच्या कोणत्याही भागात आग झाली असता, डिंकाच्या पाण्याने ती ताबडतोब थांबते. दर वेळेला अंदाजे 20 ग्रॅम डिंकाचे पाणी व तितकेच दूध व खडीसाखर घालून घेतले असता गळ्यातील, पोटातील, लघवीच्या वाटेची किंवा परसाकडच्या वाटेची जळजळ ताबडतोब थांबते.
जुलाब रोखण्यासाठी : पोटात आग होऊन वारंवार जुलाब होत असतील तरीही डिंकाने थांबतात. परसाकडची किंवा लघवीची आग डिंक पोटात घेऊन डिंकाच्या पाण्याची बस्ति त्या भागात घेतल्यास ताबडतोब कमी होऊन बरे वाटते.
गनोरियावर : प्रमेह अलीकडे ज्यास पू प्रमेह असे म्हणतात किंवा इंग्रजीत ज्यास गनोरिया असे म्हणतात तो डिंकाच्या पिचकारीने ताबडतोब थांबतो. डिंकाचे पाणी करून, त्याची पिचकारी दिवसातून दोन वेळा घेतली असता लघवीच्या इंद्रियातील व्रण बरा होऊन, पू थांबतो व आगही थांबते.
तोंड आल्यावर : तोंड आले असताही डिंकाच्या पाण्याच्या वरचेवर गुळण्या कराव्यात, तोंड बरे होते. आलेल्या तोंडास डिंक दुधात उगाळून लावला असता त्यानेही तोंड बरे होते.
शक्तीवर्धक : शक्तीसाठी डिंक अमृत आहे. शरीरातील कोणताही भाग ढिला झाला असता डिंक पोटात द्यावा. ढिलेपणा तेव्हाच कमी होतो. डिंकाची बारीक पूड करून ती डिंकाची पूड दर वेळेला 1।। ते 3 ग्रॅम, 50 मि.लि. दुधातून दिवसातून चार वेळ घ्यावी.अवयवांचा ढिलेपणा मोडतो.
अवयवांना ताकद येण्यासाठी : शरीर निर्बल होऊन पायात जोर नसेल, हातपाय कापत असतील, कमरेत जोर नसून बसवत नसेल तर या सर्वांवर डिंक पोटात घेतल्यावर त्वरित बरे वाटते.
खोकला व ताप बरा होण्यासाठी : ताप, त्यात होणारा खोकला डिंकाने ताबडतोब कमी होतो. डिंकाची पूड दुधात घालून जरा वेळ ठेवून त्यात थोडी साखर घालून घ्यावी, खोकला थांबतो व शक्ती वाढते.
अशक्तपणावर रामबाण : डिंकात एक न विरघळणारी जात आहे. तिला कथल्या गोंद असे म्हणतात. कथल्या गोंद आणून साफ करून 10 ग्रॅम रात्री पाण्यात भिजत ठेवावा. सकाळी तो फुगून वाटीभर होतो. त्यात दूध आणि साखर घालून अशक्त माणसाने प्यावे; शक्ती येते व खोकला कमी होतो.
क्षयरोगावर उपयुक्त : क्षयरोग्यास डिंक देतात. सन 1854 सालापासून सन 1857 सालापर्यंत संशोधक न्यू बोअर या शास्त्रज्ञाने हेस मिजिअर यांच्या सहाय्याने डिंकाचे संशोधन केले. त्यांत त्यांना कॅल्शियम सॉल्ट व कॅल्शियम कार्बोनेट सॉल्ट, कॅल्शियम पोटेशियम सॉल्ट व कॅल्शियम मॅग्नेशियम सॉल्ट आढळून आले. डिंक हा पौष्टिक आहे.
सांधेदुखीवर : शरीरास घट्टपणा येण्यासाठी डिंकाचा वरून उपयोग करतात. चांगला भिजलेला डिंक कमजोर किंवा निखळलेल्या सांध्यांना लावून वर कापूस बसवितात. त्याने सांधा घट्ट होतो व बरे वाटते.
भाजल्याने आग होत असेल तेव्हा भाजले असता कोंबड्याच्या अंड्यातील बलक व डिंक भाजलेल्या जागी लावला असता आग होत नाही. बरे वाटते.
डोळे आले असता : आलेल्या डोळ्यात डिंक व खडीसाखर पाण्यात उगाळून घातली असता बरे वाटते. तसेच लाली उतरते व डोळ्यातून पाणी गळण्याचे थांबते.
शरीरावरील डाग घालवण्यासाठी : शरीरावर कोणाच्याही कारणाने पडलेले डाग, डिंक पाण्यात उगाळून वरचेवर लावीत गेल्याने नाहीसे होतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी : रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी शक्तीसाठी डिंकाचे पौष्टिक लाडू करतात ते असे ,डिंकाचे लाडू चांगला डिंक घेऊन जाडसर कुटावा. तो बारीक तारेच्या चाळणीने चाळावा म्हणजे बारीक डिंक गळून जाईल. चाळणीत राहिलेले डिंकाचे बारीक खडे मोजून घ्यावे. जितका डिंक तितकेच तूप घेऊन ते चांगले खरपूस तळावे. डिंकाचे बारीक खडे तळले असता फुगून लाह्यासारखे दिसतात.
ते बुंदी काढण्याच्या लोखंडाच्या झाऱ्यावर 4 तास निथळत ठेवावे. तूप निथळून डिंकाच्या लाह्या चांगल्या सुकल्यावर, त्या पितळेच्या खलबत्त्यात किंवा दगडाच्या पाट्यावर हलक्या जातीने बारीक कराव्यात. डिंकाच्या इतकीच साखर घेऊन, डिंक जात्याच गोड आहे म्हणून तितकीच घ्यावी. त्याचा तीन तारी चांगला पाक करावा.
तो पाक खाली उतरण्याच्या वेळी, त्यात डिंकाचा विसावा भाग केशर व डिंकाचा सहावा भाग कस्तुरी घालावी व सुंठ, मिरे, पिंपळी, दालचिनी, वेलदोडे, लवंग, तालिमखाना, जायफळ, मोचरस, अश्वगंध, गोखरू, सळी, चंदन व कृष्णागरू ही पंधरा औषधे मिळून डिंकाचा आठवा भाग कुटून वस्त्रगाळ केलेले चूर्ण घ्यावे. हे सर्व साखरेच्या तीन तारी केलेल्या पाकात टाकावे व त्यातच तळून पुन्हा बारीक केलेला डिंक टाकावा. चमच्याने नीट ढवळावे.नंतर मिश्रण घट्ट होऊ देऊन लाडू वळावा.
बाळंतपणात पौष्टिक लहान लहान सुपारी एवढाले लाडू बांधून अग्नीचे बल पाहून खावे.काही जण साखरेचा पाक तयार झाला असता, त्यात वेलची व डिंक घालून लाडू करतात. औषधी जिन्नस घालीत नाहीत. काही जण खोबरे चांगले किसून त्याच्यामध्ये खसखस घालून, खरपूस भाजून खोबरे आणि खसखस मिळून डिंकाइतके घेऊन, दुप्पट साखरेत तीन तारी पाक करून डिंकाचे लाडू करतात. बाळंतिण बायकांना बाळंतपणात डिंकाचे लाडू खायला देण्याची परंपरा आहे. त्यात खोबऱ्याचे बारीक तुकडे, खारकांचे थोडे तुकडे, बेदाणे, खसखस वगैरे घालून लाडू करतात.