पुणे – कॅन्सर म्हटले की माणसाच्या मनात कमालीची भीती आणि मृत्युचे भय दाटून येत असते. अनिश्चितता आणि अनाकलनीय असे या रोगाचे स्वरुप असल्याने दुर्दैवाने ही भीती खरी असते.
कॅन्सरच्या अनेक व्याख्या उपलब्ध आहेत. आपल्या स्वत:च्या कृतींचाच परिणाम म्हणून आपल्या शरीराने केलेला तो विश्वासघात असतो.
या साध्या कृती बहुतांशवेळा पर्यावरणाशी संबंधीत असतात. (धूम्रपान, तंबाखू इत्यादी.), अन्नपदार्थ (जंक फूड, स्पाईसेस इत्यादी) आणि कौटुंबिक पार्श्वभूमी (अनुवंशिक). यातील बहुतांश गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये येऊ शकतात, तर काही आपल्या क्षमतांच्या पलिकडच्या असतात. यातील अधिक धोका असणाऱ्या गटांचे वर्गीकरण करून आपण त्याच्याशी लढा देऊ शकतो आणि त्याला आपल्या निरीक्षणाखालीसुद्धा आणू शकतो.
अर्थात हे शक्य आहे पूर्वनिदान आणि वेळेत योग्य उपचार सुरू झाले तरच. विज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे आपल्या देशातसुद्धा अद्ययावत अशा स्वरुपाच्या उपचारपद्धती आता अस्तित्वात आल्या असून जगाच्या स्पर्धेत आता आपण कुठेही मागे नाही.
या सर्व उपचारांचा मुख्य आणि मूलभूत उद्देश म्हणजे, कॅन्सरला शरीरातून दूर करणे आणि पुन्हा तो कधीही परत येणार नाही, यासाठी प्रयत्न करणे. कमीत कमी साईड इफेक्ट आणि गुंतागुंत निर्माण होणार नाही याची दक्षता घेत कॅन्सर दूर करण्याची शस्त्रक्रिया केली जाते. परंतु कॅन्सरचा प्रकार आणि त्याचा प्रकार व पद्धती लक्षात घेऊन काही वेळेस शस्त्रक्रिया पुरेशी ठरत नाही. आणि त्याचवेळी रेडिओथेरपी आणि केमोथेरपी यांचे महत्त्व अधोरेखीत होते.
कॅन्सरच्या अद्ययावत अशा रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीमुळे त्याची टिकून राहण्याची क्षमता वाढत असल्याचे आणि पुन्हा परत येण्याची प्रवृत्ती लक्षणीयरित्या कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
रेडिएशन थेरपी ही एक स्थानिक उपचार पद्धती असून त्यामध्ये कॅन्सरशी संबंधित पेशी कायमस्वरुपी संपवून टाकण्याची क्षमता बाळगून असते. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे आपण आता अधिक नेमक्या तंत्राने रेडिएशन देऊ शकतो. त्यामुळे त्याचा अधिकाधीक परिणाम कॅन्सरग्रस्त पेशींवर आणि कमीत कमी सामान्य अवयवांवर होतो. त्यामुळे कॅन्सरच्या उपचारांमध्ये साईड इफेक्टचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते.
रेडिएशनची अधिक परिणामकारकता आता वाढली असून त्यामुळे वेदना कमी करणे आणि हाडांमध्ये पसरलेला आणि अधिक विकसीत स्वरूप धारण केलेल्या कॅन्सरमध्ये जी फ्रॅक्चर्स होतात ते रोखणे आता शक्य झाले आहे. त्यामुळे भविष्यात असे रुग्ण वेदनारहित आणि आरामदायी आयुष्यसुद्धा जगू शकतात. सर्जिकल ऑन्कॉलॉजी, मेडिकल ऑन्कॉलॉजी आणि रेडिएशन ऑन्कॉलॉजी यांच्या एकत्रित आणि सामुहिक अशा सहयोगातून कॅन्सरवर उपचार करणे आवश्यक असते.