लठ्ठपणामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्या तरी त्याचा महिलांना जास्त त्रास होत असल्याचे दिसून येत असते. लठ्ठपणामुळे शरीराच्या अंतर्गत होत असलेल्या परिणामांबरोबरच आता बाह्य परिणामही दिसून येऊ लागले आहेत. परंतु कसून व्यायाम केल्याने लठ्ठपणासोबत बहिरेपणाचाही धोका टाळता येऊ शकतो.
बऱ्याचदा आपल्याला येणारा बहिरेपणा हा वाढत्या वयानुसार येत असल्याचे समजून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण हा बहिरेपणा शरीरातील वाढत्या लठ्ठपणामुळे येत असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे. उत्तम आरोग्य व शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिल्यास या बहिरेपणावर मात करता येऊ शकते, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.
महिलांच्या शरीराच्या वस्तुमानाचे मोजमाप करणाऱ्या बॉडी मास इंडेक्सची (बीएमआय) मोजणी केली असता, ज्या महिलांचे बीएमआय 30 ते 34 इतके होते त्यांच्यामध्ये 17 टक्क्यांपर्यंत तर बीएमआय 40 पेक्षा जास्त असलेल्या महिलांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा जास्त बहिरेपणा असल्याचे दिसून आले. तसेच 80 ते 88 सेमी इतका कमरेचा घेर असलेल्या महिलांमध्ये 11 टक्के, तर 88 सेमीपेक्षा जास्त घेर असणाऱ्या महिलांमध्ये 27 टक्क्यांपेक्षा अधिक बहिरेपणा असल्याचे दिसून आले.
तसेच रोज ठरावीक व्यायाम करणाऱ्या महिलांमध्ये बहिरेपणाचा धोका कमी असल्याचेही संशोधनात उघड झाले आहे. आठवडाभरात रोज दोन तास चालणाऱ्या महिलांमध्ये एक तास चालणाऱ्या महिलांपेक्षा 15 टक्के बहिरेपणाचा धोका कमी असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगामध्ये 360 दशलक्ष लोक हे वाढत्या शरीरामुळे बहिरेपणाचे बळी ठरलेले आहेत. हे संशोधन अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.