बहुतेकजण वजन कमी करण्याची मोहिम मोठ्या उत्साहाने सुरू करतात. वजन कमी झाल्यावर आपण कसे दिसू याचे चित्रही डोळ्यासमोर उभे राहते. वजन कमी झाल्यावर जीवनशैलीशी निगडीत व्याधी आणि दुखणी देखील बरी होतील, असे वाटत असते. असे असले तरी रोज नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी आहाराचे सेवन करूनही वजन कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही आणि मग पुन्हा त्याचे टेन्शन येऊ लागते. म्हणजेच रोजच्या जीवनातील आनंद हिरावून घेण्यात आणखी एका गोष्टीचा समावेश होतो.
एकीकडे शरीर तंदुरुस्त असण्यासाठीचे प्रयत्न आणि दुसरीकडे स्थूलपणासारख्या समस्या दूर ठेवण्यासाठी वजन कमी करणे आवश्यक असते. त्याबद्दल सतत विचार करत राहण्यामुळे वजन कमी करण्याची मोहिम आणखी कठीण होते. खरे तर वजन कमी करण्याचे एकदा ठरवले की, आपले शरीर ज्याप्रमाणे भुकेचे संकेत देत असते त्यानुसार खावे. जेवण कधीही टाळू नये किंवा बंद करू नये. त्याचबरोबर वेळेवर झोपणे, किमान सात तासांची गाढ व शांत झोप मिळणे आवश्यक असते. त्याखेरीज कुटुंबिय, मित्रमंडळी यांच्यासोबत अधूनमधून वेळ घालवणे, हास्यविनोद करणे आणि नियमित कामे करणेही आवश्यक असते.
आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर अनेक सोशल मिडियातून पोषण, आजारपण, वजन कमी करण्याच्या टिप्स शेअर करत असतात. नुकत्याचा त्यांनी सणासुदीच्या दिवसांमध्ये वजन घटवण्यासंदर्भातील टिप्स शेअर केल्या आहेत.
1) भूक असले तेवढेच खा.
2) नियमित व्यायाम आवश्यक आहे. रोजच्या व्यायामाला सुटी नको. फार तर त्यामध्ये बदल करावा. धावणे, चालणे, योगासने, प्राणायम, पोहणे, जिममध्ये जाणे अशी विविधता ठेवता येऊ शकते.
3) वजन कमी करण्याच्या मोहिमेत झोपेचा खूप मोठा वाटा असतो. कमी झोप, निद्रानाश यामुळे वजन वाढते. त्याउलट लवकर आणि वेळेवर झोपणे, सकाळी लवकर उठणे यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर रोज रात्री किमान सात तास शांत झोप मिळणे आवश्यक आहे.
4) वजन कमी करायचे म्हणून पोटावर/शरीरावर अन्याय करू नका. शरीराल उर्जेसाठी आणि रोजची कामे करण्यासाठी उर्जा आवश्यक असते. ती अन्नातून मिळत असते. त्यामुळे सकाळची न्याहरी कधीही टाळू नका. रोज किमान दोन वेळा जेवण करणे आवश्यक आहे. अर्थात आहारात कोणते पदार्थ किती प्रमाणात असावेत याबद्दल आहारतज्ज्ञांचा सल्ला घेता येऊ शकतो.
5) रोजचे काम, हिंडणे-फिरणे, कुटुंबियांना वेळ देणे, मित्रमंडळींबरोबर हास्यविनोद, टाईमपास अशा गोष्टी नेहमीप्रमाणे चालू ठेवाव्यात. वजन कमी करायचे म्हणून गंभीरपणे वागण्याची गरज नसते.
वजन कमी करताना काय करू नये?
1) सगळे लक्ष वजन कमी करण्याकडे देण्याची गरज नसते. नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे सुरू ठेवावीत.
2) सुरवातीला सगळे अवघड वाटू शकते. पंधरा दिवस किंवा महिनाभरात लक्षणीय वजन कमी होत नाही. त्यासाठी किमान तीन ते सहा महिन्यांचा वेळ द्यावा लागतो.
3) नियमित व्यायाम आवश्यक आहे. त्यातून पळवाट काढून व्यायामाला दांडी मारू नये. मुख्य म्हणजे व्यायामाकडे तंदुरुस्तीचे साधन म्हणून पहावे. शिक्षा म्हणून पाहू नये.
4) अनेकदा वजन कमी करण्याच्या मोहिमेत काही खायचे म्हटले की, आपण गुन्हेगार आहोत असे वाटू लागते. सगळ्या गोष्टी मर्यादित प्रमाणात कराव्यात. पंधरा दिवसातून एखादा बटाटेवडा, गोड पदार्थ खाण्यास हरकत नाही. एकदम आयुष्यातील आनंदाच्या छोट्या-छोट्या गोष्टी हद्दपार करू नयेत.
5) रोज किती किलोमीटर चालणे झाले, धावलो किंवा किती कॅलरी बर्न झाल्या याचा हिशेब करत बसू नये.
The post Weight Loss Mistakes : वजन कमी करताना काय करू नये? जाणून घ्या… टिप्स appeared first on Dainik Prabhat.