करोनाचा धोका नियंत्रणात आणायचा असेल तर नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढली पाहिजे. त्यासाठी ड जीवनसत्त्व योग्य उपाय ठरेल, असे मत आयर्लंडच्या संशोधकांनी एका अहवालात मांडले आहे. करोनाचा धोका अनेक देशांमध्ये अद्याप गंभीर आहे. मात्र, काही देशांमध्ये त्याचा प्रभाव कमी होत चालला आहे.
याबाबत काही तपासण्या व पाहण्या करण्यात आल्या. त्यात ज्या करोनाबाधितांमध्ये ड जीवनसत्त्व जास्त आहे त्यांना यातून पूर्ण बरे होण्यात यश आले आहे. ज्या देशांच्या नागरिकांच्या शरिरात ड जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त आहे तेथिल मृत्यूदरही कमी आहे. उत्तर ध्रुवीय भागातील काही देशांत बाधा होण्याचे व मृत्यू होण्याचे प्रमाण आश्चर्य वाटावे इतके कमी आहे. याबाबत काही चाचण्या करण्यात आल्या होत्या.
त्यातून असे लक्षात आले की ड जीवनसत्त्वाची मात्रा शरिरात जास्त असेल तर त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती जास्त असते व अशा व्यक्तींना करोनाची बाधा झाली तरी त्यातून पूर्ण बरे होता येते, असेही मत या संशोधकांनी व्यक्त केले आहे.
स्पेन, फ्रान्स, इटली, ब्रिटन, अमेरिका, भारत तसेच चीन येथील नागरिकांच्या तपासणीचा अहवाल अभ्यासला तर असे लक्षात येते की या देशांतील ज्या नागरिकांमध्ये ड जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होते त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे.