“जसा आहार तसा विचार’ असे म्हटले जाते. माणूस जसा आहार घेतो तसेच त्याचे विचार आणि आचार असतात असे म्हटले जाते. माणसाचे आरोग्य आचार,विचार हे सर्व तो घेत असलेल्या आहारावरच अवलंबून असते. अन्न औषध म्हणून सेवन करा असे निसर्गोपचारात म्हटले आहे. आहार जर औषध समजून घेतला तर सर्व उपयुक्त घटकांचा समावेश आणि अपायकारक घटकांना निषिद्ध मानले तर शरीराची योग्य वाढ होण्याबरोबरच अनारोग्य दूर ठेवणे सहज शक्य आहे. म्हणूनच आहाराचे आरोग्य रक्षणातील महत्व अनन्यसाधारण असेच आहे.
आपल्या शरीरातच व्याधी रोखण्याची आणि निवारण्याची क्षमता असते. ही क्षमता आपल्या आहारावर अवलंबून आसते. शरीराची अंतर्गत क्षमता आहाराने वाढविणे, राखणे आणि त्यास योग्य निसर्गोपचाराची जोड देणे हाच आरोग्याचा खरा मूलमंत्र होय. सात्विक आहार असेल तर माणूसही सात्विक बनतो. तामसी माणसाचा आहार हा वेगळाच असतो. मांसाहार करणारा माणूस पशुतुल्य व्यवहार करतो. कारण जसा आहार तसा विहार. म्हणून आहार कोणता घ्यावा, किती घ्यावा, कां घ्यावा याचे शास्त्रीय ज्ञान असणे महत्वाचे आहे.
निसर्गोपचाराच्या सिद्धांतानुसार आपल्या पोटात अर्धा भाग अन्न, पावभाग पाणी आणि पावभाग हवा अशा प्रमाणातच आहार घेणे योग्य असल्याचे सांगितले आहे. यामुळे पचन अभिशोषण इत्यादी क्रिया उत्तम प्रकारे होऊन सेवन केलेले अन्न अंगी लागते. शिवाय त्यापासून काहीही अपाय होत नाही.
आहाराचे कार्य प्रामुख्याने चार प्रकारचे असते.
एक : शरीरास शक्ती अथवा उर्जा देणे,
दोन : शरीराची झालेली झीज भरून काढणे,
तीन : शरीराची वाढ करणे,
चार : रोगप्रतिबंधक शक्ती कायम राखणे.
अयोग्य, अधिक किंवा अतिखाण्याने आपण अनारोग्य ओढून घेतो.
अन्न तारी, अन्न मारी,
अन्न नाना विकार करी… असे म्हटले जाते ते याचसाठी. माणूस मरत नाही तो स्वत:ला मारतो असे एका तज्ञ डॉक्टराने म्हटले आहे. चार पांढऱ्या राक्षसापासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. साखर, मीठ, मैदा आणि चरबीयुक्त आहार हे ते चार पांढरे राक्षस होत. काहींनी याच राक्षसांना विषाची उपमाही दिली आहे.
आहार कोणी किती घ्यावा हे एक शास्त्र असून माणसाची प्रकृती, वय, ऋतू इत्यादीवर ते अवलंबून असते. काय खावे आणि काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु आयुर्वेदानुसार शाकाहारच योग्य सांगितला आहे. शास्त्रीय मीमांसा वाचल्यास शाकाहारच उत्तम योग्य आणि सर्वश्रेष्ठ सांगितला असून आरोग्यपूर्ण, जीवनदायी आणि दीर्घायुष्य प्राप्त करून देणारा आहे हे आपल्या लक्षात येईल.
या क्षेत्रात जे संशोधन झालेले आहे त्याचा विचार केला तर असे दिसते की, शाकाहारात प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे, क्षार हे अधिक असतात. अपाच्य (पचणार नाहीत असे) घटक आणि चरबी नसते. शाकाहार सुपाच्य असल्याने पचनेंद्रियांवर कमीत कमी ताण पडतो आणि त्यामुळे इंद्रिये अनेक वर्षे सक्षम राहतात.याशिवाय शाकाहारी अन्नघटकांचे शोषण आणि अभिसरण जलद होते. शाकाहाराने अवाजवी वजन वाढण्याची शक्यता कमी असते.
शाकाहारात मांसाहारापेक्षा अधिक उर्जा असते असे आढळून आले आहे. शंभर ग्रॅम मांसात 118 कॅलरीज असतात तर 100 ग्रॅम बीन्समध्ये 158 कॅलरीज असतात. 100 ग्रॅम सर्व कडधान्यात 200 कॅलरीज असतात. तर 100 ग्रॅम सर्व प्रकारच्या सुक्या मेव्यामध्ये 400 कॅलरीज असतात. यावरून असे म्हणता येईल की, शाकाहारी पदार्थात उर्जाशक्ती ही मांसाहारी पदार्थापेक्षा जास्त असते. परंतु ते पचण्यासाठी शरीरातील खर्च होणारी उर्जा मात्र मांसाहाराच्या पचनास लागणाऱ्या उर्जेपेक्षा कमी लागते. तसेच दोन्ही आहाराच्या किमतीत खूप फरक
दिसून येतो.
मांसाहारापेक्षा शाकाहार त्यामानाने स्वस्त असल्याचे दिसून येते. म्हणूनच आहार निवडताना शाकाहाराचीच निवड करणे योग्य आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते शाकाहार हाच सर्वोत्तम आहार आहे. शिवाय स्वस्त आणि मस्तही आहे हे सांगणे नकोच. तेव्हा अभक्षण भक्षण करून रोगांना निमंत्रण देण्यापेक्षा शाकाहर घेऊनच निरोगी आणि दीर्घायुषी व्हावे एवढेच सांगावेसे वाटते. म्हणून शाकाहारच श्रेष्ठ मानला गेला आहे.
– वसंत बिवरे