– अश्विनी महामुनी
अरे तुझे लक्ष कुठे आहे? असा प्रश्न माझी आजी नेहमी विचारायची. जास्त करून माझ्या भावाला आणि त्यातही जेवायला बसल्यावर. कारण जेवायला बसल्यावरही तो कोठेतरी हरवलेलाच असायचा. लक्ष लावून जेवले नाही, तर खाल्लेले अंगी लागत नाही, असे ती त्याला म्हणायची. ते अगदी खरे होते आणि खरे आहे, असे मला आजही जाणवते.
तन्मना भुज्जीत म्हणजे जेवताना शरीर व मन ठिकाण्यावर असावे, असे ती सांगायची.
केवळ जेवतानाच नाही, तर कोणतेही काम करताना एकाग्र चित्ताने करावे असे सांगून ती नेहमी नारद मुनींची गोष्ट सांगायची. लहानपणी नारद म्हटले, की कळीचा नारद हे समीकरणच बनले होते. पण ही गोष्ट वेगळी होती.एकदा नारद भगवान विष्णूना म्हणाले, मी सतत नारायण नारायण असा जप करत असतो, तरी तुम्हाला माझ्यापेक्षा तो शेतकरी भक्त अधिक प्रिय आहे. हा असा भेदभाव का?
तेव्हा भगवान विष्णूंनी नारदाच्या हाती तेलाने काठोकाठ भरलेले एक भांडे दिले आणि सांगितले की, हे हाती घेऊन पृथ्वीप्रदक्षिणा करून ये. मात्र प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत भांड्यातील तेलाचा एक थेंबही खाली पडता कामा नये.
इतके सोपे काम दिल्यामुळे हसत हसत नारदमुनी पृथ्वीप्रदक्षिणेला निघाले. यथावकाश पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा स्वर्गात भगवान विष्णूंच्या जवळ आहे. संपूर्ण प्रदक्षिणा करताना लक्ष सतत तेलाच्या भांड्याकडेच होते. त्यातील एक थेंबही तेल बाहेर सांडू नये याची काळजी ते घेत होते. भगवान विष्णूंना ते म्हणाले, “भगवान, हे घ्या भांडे. यातील एक थेंबही तेल कोठे सांडले नाही. मी अगदी डोळ्यात तेल घालून त्याकडे लक्ष दिले आहे.
छान! भगवान म्हणाले, पण एक सांग, ही पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करताना तू माझे नामस्मरण किती वेळा केलेस?
प्रश्न ऐकून नारदांनी मान खाली घातली. तेलाकडे लक्ष देताना त्यांच्याकडून नामस्मरण झालेच नव्हते. नारदांची फजिती म्हणून या गोष्टीकडे अनेकजण पाहात असतात, तरी ही गोष्ट मी एकाग्रतेचा पाठ म्हणून वाचते. सर्व सोडून नारदमुनींनी तेलाच्या भांड्याकडेच लक्ष दिले, म्हणून एक थेंबही न सांडता ते पृथ्वीप्रदक्षिणा करून परत आले. त्या काळात त्यांना बाकी कसलेच स्मरण झाले नाही. अगदी नामस्मरण करण्याचेही स्मरण झाले नाही.
आपण कधीकधी विचार करता करता हरवून जातो. त्यावेळी आपले डोळे उघडे असून समोरील व्यक्ती दिसत नाही, मारलेली हाक ऐकू येत नाही, डोळ्यासमोरून हात फिरवल्यावर, चुटकी वाजवल्यावर वा मोठ्याने हाक मारल्यावर आपण दचकून जागेवर येतो. डोक्यावर चष्मा असून चष्मा शोधणे, खिशात पेन असून पेन शोधणे, घरातून बाहेर पडल्यावर पुन्हा मागे वळून कुलूप नीट लागले की नाही, हे पाहणे. ही लक्ष नसल्याचीच लक्षणे आहेत.आता माझ्या आजीच्या सांगण्याकडे पुन्हा जाऊ. आजकाल मुले जेवताना मोबाइलमध्ये डोके खुपसून बसलेली तिने पाहिली असती, तर हाच प्रश्न केला असता, की लक्ष कोठे आहे?
अशा अन्नाकडे लक्ष न देता अन्न नुसतेच पोटात ढकलण्याचा परिणाम वेगळा काय होणार? नजर, कान मोबाइलमध्ये गुंतलेले असताना जेवण नुसते आत ढकलायचे काम होत असेल, आपल्या शरीरातील इतर यंत्रणाही असाच हलगर्जीपणा करून अन्न नुसते पुढे ढकलायचे काम करील. मग अन्नाचे नीट पचन होणार कसे? आणि ते अंगी लागणार कसे? अशा सवयीचे तुम्हाला अपचनाचे फळ हमखास मिळाल्याशिवाय कसे राहणार?
योगात सांगितलेले आहे, की आत्मा मनसा संयुज्यते, मन इंद्रियेण, इंद्रियं अर्थेन तद् ज्ञानं! म्हणजेच, प्रथम आत्म्याचा मनाशी संयोग होतो, नंतर मन इंद्रियाशी एकरूप होते, इंद्रिय त्याच्या अर्थाशी (विषयाशी) एकरूप झाल्यावर अर्थज्ञान होते.
इंद्रियाचा काल्पनिक किंवा वैचारिक प्रतिमेशी संयोग झाल्यास त्याला वास्तविक विषयाचे ज्ञान होत नाही. नजर एखाद्या वस्तूकडे असूनही मन भरकटलेले असेल तर ती वस्तू आपल्याला दिसत नाही.
यासाठीच तर एकाग्रतेचे महत्त्व आहे. अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळाच दिसत होता, ही गोष्ट उगाच नाही सांगितलेली, एकाग्रतेचे महत्त्व सांगणारीच ती गोष्ट आहे. तेव्हाही गुरू द्रोणाचार्यांनी इतर शिष्यांना प्रश्न केलाच असेल, की
लक्ष कोठे आहे?