कॉंटॅक्ट लेन्सेसचा योग्य वापर केल्यास ते चष्म्यांसाठी उत्तम पर्याय आहेत. ते दृष्टीमधील सुस्पष्टता व अचूकता वाढवतात. तरीही त्यांच्या वापरामध्ये काही धोकेसुद्धा आहेत. आजकाल लेन्सेसचा वापर अधिकाधिक प्रमाणात होत आहे. ज्यामुळे उत्पादन कंपन्या दर्जा व आरामदायी सुविधेसंदर्भात उच्च असलेल्या लेन्सेसची निर्मिती करतात.
कॉन्टॅक्ट लेन्सेस डोळ्यांवर ठेवून झोपू नका
जेव्हा तुम्ही झोपता, तेव्हा डोळे कोरडे होतात, तसेच डोळ्यांना होणारा ऑक्सिजन पुरवठादेखील कमी होतो आणि अशावेळी जर तुम्ही लेन्स परिधान केलेली असेल, तर डोळ्यांना कॉर्नियाचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊन दृष्टीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. सर्वोत्तम पर्याय म्हणजे झोपताना लेन्स परिधान करूच नये. (जोपर्यंत ते त्या आनुषंगाने बनवले गेले नसतील.)
कॉन्टॅक्ट लेन्सेसची काळजी घ्या
दर्जात्मक कॉन्टॅक्ट लेन्स सोल्यूशन्ससह आपल्या हाताच्या तळव्यावर स्वच्छ बोटांनी लेन्सेस हळूवारपणे साफ करा. पाण्याचा वापर कधीच करू नका. दररोज लेन्स केसमधील सोल्यूशन बदला. दर महिन्याला सोल्यूशनची बाटली बदला. दर महिन्याला लेन्स केस बदला. वार्षिक किंवा सहामाही वापरण्यात येणाऱ्या लेन्सेसपेक्षा मासिक डिस्पोजेबल लेन्सेसचा वापर करा. शेवटचे म्हणजे, लेन्स व केस खाली पडल्यास टाकून द्या आणि नवीन लेन्सेस व लेन्स केसचा वापर करा. तसेच, पोहताना लेन्सचा वापर करू नका आणि चुकून केल्यास लेन्स टाकून द्या.
कॉन्टॅक्ट लेन्सेसचा अतिवापर टाळा
कॉर्नियल अल्सर हा डोळ्यांच्या बाहेरील पारदर्शक भागाला होणारा संसर्ग आहे. यामुळे दृष्टी गमावण्याचा धोका निर्माण होतो. पोहताना कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर केल्यास स्यूडोमोनास जीवाणू किंवा असेन्थ अमिबा परजीवीची निर्मिती होते; यामुळे डोळ्यांना वेदना होतात, डोळे लालसर होतात, डोळ्यांमधून पाणी येते आणि अस्पष्ट दिसू लागते. अशी स्थिती उद्भवल्यास त्वरित कॉर्निया स्पेशालिस्टकडे जाऊन त्वरित डोळ्यांमध्ये ऍन्टिबायोटिक थेंब टाकण्याची गरज असते. जर बुरशीजन्य किंवा एसेन्थअमिबा संसर्ग असेल, तर 3 महिन्यांपर्यंत उपचाराची आवश्यकता असते. कदाचित कॉर्नियल प्रत्यारोपणासह कॉर्निया बदलण्याची गरज भासू शकते.
लेन्स न बदलल्यास होतो आजार…
निर्धारित केलेल्या कालांतराने कॉन्टॅक्ट लेन्स न बदलल्यामुळे जायण्ट पेपिलरी कंजन्क्टिव्हिटीज हा आजार होतो. या आजाराचा लेन्सेसवर देखील परिणाम होतो, ज्यामुळे डोळ्यांची जळजळ होत पापण्यांच्या खाली पॅपिला नावाचा कणीदार थर निर्माण होतो, जाण्याचा आकार मोठा असतो. याचा कॉर्नियावर परिणाम होऊन तीव्र वेदना होण्यासोबतच फोटोफोबिया (प्रकाश सहन न होणे) होतो व डोळे अतिप्रमाणात लाल होतात. काही काळ लेन्स वापर थांबवून, ल्युब्रिकेटिंग ड्रॉप्सचा वापर, मासिक कालांतराने बदला येऊ शकणाऱ्या उच्च उत्तम डीके (ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची क्षमता असलेल्या) लेन्सेसचा वापर करण्याच्या माध्यमातून उपचार करता येतो.
कॉन्टॅक्ट लेन्स असोसिएटेड रेड आय
क्लेअर या आजारामध्ये डोळे लालसर होतात, जे झोपताना लेन्सेस परिधान केल्यामुळे होते. लेन्सेस अधिक घट्ट बसवल्यास कॉर्नियाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होतो, ज्यामुळे हा आजार उद्भवतो. हा आजार गंभीर नसला, तरी संसर्गामुळे डोळे लालसर होत असल्यामुळे आजाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उपचारामध्ये एक आठवडा किंवा अधिक काळापर्यंत लेन्सेसचा वापर थांबवणे, ल्युब्रिकण्ट्स व ऍन्टिबायोटिक ड्रॉप्सचा वापर आणि योग्यरीत्या फिट होण्याकरिता लेन्सेसमधील बदल अशा पद्धतींचा समावेश आहे.