पुणे – रंगांचा उत्सव होळी येण्यास अजून काही दिवस बाकी आहेत. प्रेम आणि बंधुत्वाचे प्रतीक असलेला हा सण यावर्षी 29 मार्च रोजी साजरा केला जाईल. तुम्हीही यंदा होळी साठी सज्ज झाला असाल. वास्तविक रंग तयार करण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. यामुळे त्वचेची ऍलर्जी आणि केसांचे नुकसान होऊ शकते. या गोष्टी टाळण्यासाठी आपण घरीच नैसर्गिक गोष्टींनी रंग बनवू शकता. चला तर, नैसर्गिक गोष्टींपासून रंग कसे तयार करायचे हे पाहूया.
* लाल रंग – यासाठी कोरडे लाल चंदन पावडर बनवा. याशिवाय जास्वंद फुलांची पावडर उन्हात वाळवून तयार करावी. नंतर त्यात पीठ घाला. जास्वंद फुलांसह लाल रंग बनवू शकता. ओला रंग तयार करण्यासाठी लाल चंदन किंवा जास्वंद फुले 5 लिटर पाण्यात उकळा. नंतर त्यात सुमारे 20 लिटर पाणी घाला. आपल्याला छान लाल रंग मिळेल. याशिवाय डाळिंबाची साले पाण्यात उकळून तुम्ही लाल रंगही तयार करू शकता.
* हिरवा रंग – हिरवा रंग करण्यासाठी आपण मेंदी वापरु शकता. यासाठी मेंदीची पूड पिठात मिसळा. जर रंग पक्का हवा असेल तर त्यात पाणी घाला.
* पिवळा रंग – हरभरा पीठ आणि हळद एकत्र करुन आपण हा रंग बनवू शकता. यासाठी घेतलेल्या हळदीच्या दुप्पट प्रमाणात हरभरा पीठ मिक्स करावे. या व्यतिरिक्त आपण त्यात मुल्तानी माती आणि टॅल्कम पावडर देखील घालू शकाल. 1 टेस्पून हळद 2 लिटर पाण्यात मिसळा आणि पक्का पिवळा रंग होण्यासाठी रात्रभर सोडा. याशिवाय झेंडूची फुले वापरूनही पिवळा रंग तयार करता येतो. ही फुले पाण्यात उकळा आणि रात्रभर भिजवून ठेवा.
* गुलाबी रंग – बीटरूटच्या मदतीने आपण गुलाबी रंग बनवू शकता. यासाठी 1 बीटरूट धुवून घ्या. नंतर त्याचा रस काढा आणि 1 लिटर पाण्यात मिसळा. रात्रभर भिजवत ठेवा. सकाळी उकळवा आणि आवश्यकतेनुसार पाण्यात मिसळा. होळी खेळण्यासाठी तुम्हाला गुलाबी रंग मिळेल.
* केशरी – केशरी रंग तयार करण्यासाठी आपण पलाश म्हणजेच पळस फुले वापरू शकता. असे मानले जाते की श्रीकृष्णानेही पळसाच्या फुलांचा उपयोग होळी खेळण्यासाठी केला होता. केशरी रंगासाठी पळसाची फुले सुकवून पावडर बनवा. त्याशिवाय ही फुले पाण्यात उकळून ही रंग तयार करता येईल. आपल्याला परिपूर्ण केशरी रंग मिळेल.
* निळा रंग – यासाठी नील वनस्पती वापरा. कोरडा रंग तयार करण्यासाठी त्याची फुले वाळवून दळून घ्या. तसेच ते पाण्यात उकळवून निळा रंग तयार करा. आपल्याला गडद निळा रंग मिळेल.