वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डबल मास्क वापरण्यावर अधिक जोर देत आहेत. मात्र डबल मास्क करोना संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी किती प्रभावी ठरू शकते? अलीकडेच, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी)ने मास्कबद्दल काही खास गोष्टी नमूद केल्या आहेत. सीडीसीमधील तज्ञांनी लोकांना डबल मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, असे केल्याने 90 टक्के संसर्ग करणारे थेंब (ड्रॉपलेट) टाळता येऊ शकतात.
सीडीसी तज्ञांच्या मते, डबल मास्कसाठी एक साधा आणि सर्जिकल मास्क घालता येतो. यासाठी, सर्वप्रथम, सर्जिकल मास्क चांगल्या प्रकारे लावा आणि त्यानंतर साधा किंवा दुसरा सर्जिकल मास्क त्यावर लावा. लक्षात ठेवा, आपले नाक आणि तोंड यामध्ये चांगले झाकलेले असावे.
तज्ञांच्या मते, यावेळी संसर्गाची गती वेगवान असल्याने, घराबाहेर पडताना याचा वापर केला पाहिजे, विशेषत: ज्या ठिकाणी गर्दी जास्त आहे अशा ठिकाणी. या व्यतिरिक्त प्रवासादरम्यान डबल मास्क आवश्यक आहे आणि जेथे सामाजिक अंतर पाळणे कठीण आहे, अशा ठिकाणी आवर्जून डबल मास्क लावा.
तज्ञांच्या मते, ड्रॉपलेट रोखण्यासाठी सर्जिकल मास्क 56 टक्के प्रभावी असू शकतात. हे मास्क कडा दुमडून लावले तर ते सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद होऊन त्यांची कार्यक्षमता 77 टक्क्यांपर्यंत वाढेल. दुसरीकडे, आपण दोन मास्क लावल्यास, ते ड्रॉपलेट रोखण्यासाठी 85 टक्क्यांपर्यंत उपयुक्त ठरू शकतात. असे मास्क अजिबात लावू नका जे सैल असतात किंवा योग्य फिटिंगचे नसतात.