माझे कोलेस्टेरॉल वाढले, अमूकचे वाढले. त्यामुळे रक्तवाहिन्यांचे आजार सुरू झाले, हृदयविकाराचा झटका आला, औषधोपचार सुरू झाले, अशाप्रकारची वाक्ये कानावर नेहमी पडत असतात. साहजिकच कोलेस्टेरॉल हा शब्द अत्यंत प्रसिद्ध झाला आहे. पण, अनेकवेळा ऐकीव माहितीतून चांगल्या गोष्टींपेक्षा चुकीच्या आणि वाईट गोष्टीच जास्त पसरताना दिसतात.
आरोग्याच्याबाबतीत अशा गोष्टींमुळे खूप नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोलेस्टेरॉलबद्दलही ऐकीव माहितीवर विसंबून न राहता, त्याबद्द्लची शास्त्रीय माहिती मिळवली पाहिजे. कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीरात तयार होणारा, एक आवश्यक घटक आहे. आपल्या शरीराच्या विकासात, आरोग्यात त्याचे महत्त्वाचे कार्य आहे.
कोलेस्टेरॉल म्हणजे…
कोलेस्टेरॉल हा एक कठीण आणि मेणासारखा पदार्थ असून तो प्राणीजन्य पदार्थात आढळतो. आपल्या शरीरात तो यकृतामध्ये तयार होतो.
त्याची महत्त्वाची कार्ये पुढील प्रमाणे
आपल्या शरीरामध्ये महत्त्वाच्या संप्रेरकांच्या निर्मितीची सुरुवात होण्यासाठी लागणारा हा पदार्थ आहे. उदा.- सेक्स हॉर्मोन्स, ईस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, चयापचयाचे नियमन करणारे ऍड्रेनल हॉर्मोन.
आपल्या त्वचेला कोरडी (डीहायड्रेशन) होण्यापासून वाचविण्यासाठी तसेच त्वचेचे चुरचुरणे (इरिटेशन) थांबविण्यासाठी ज्या तैलग्रंथी स्त्रवतात, त्यातला कोलेस्टेरॉल हा एक घटक आहे.
पेशी आवरणाची रचना बदलणारा कोलेस्टेरॉल हा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे.
कोलेस्टेरॉलमुळे व्हिटॅमिन डी ची निर्मिती होते.
कसे बनते?
आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल कसे बनते हे समजून घ्यायला हवे. ही प्रक्रिया कार्बनच्या दोन फ्रॅगमेंटपासून म्हणजे ऍसिटेटपासून सुरू होते. यासाठी लागणारी ऊर्जा मेदामधून घेतली जाते. आणि सॅच्युरेटेड फॅटस् हे इंधन म्हणून वापरले जाते. पिष्टमय पदार्थांचे ज्वलन होतानासुद्धा ऍसिटेट्स तयार होतात.
म्हणजेच, सॅच्युरेटेड फॅटस् आणि जास्त जीआय (ख) असलेले पिष्टमय पदार्थ जेव्हा आहारात अधिक प्रमाणात असतात, तेव्हा पचनक्रिया चालू असताना ऍसिटेट फ्रॅगमेंटस् जास्त प्रमाणात बनतात आणि अर्थातच शरीरात जास्त कोलेस्टेरॉल तयार होते.
जास्त झाले की धोकादायक
याचे मुख्य कारणे म्हणजे रक्तवाहिन्यांच्या भित्तीकांवर साठणाऱ्या थरातील कोलेस्टेरॉल हा मुख्य घटक असतो. कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्या अरूंद होतात आणि ताठरतात. हृदयविकाराचा झटका येण्याचे, मेंदूतील रक्तस्त्रावाचे आणि रक्ताभिसरणाच्या इतर समस्यांचे मुख्य कारण आहे. शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे हा आधुनिक जीवनशैलीतील आहारपद्धतीमुळे होणारा आजार आहे.