स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमीच असतं. जेव्हा ठराविक मर्यादेपेक्षा जास्त हिमोग्लोबिन घटल्यास शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होतं. मग उलट्या होणं, त्वचाविकार, उदासीनता यांसारख्या शारीरिक-मानसिक त्रासांना आयतंच आमंत्रण मिळतं. अशा वेळी ब-6 जीवनसत्त्वयुक्त आहारामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण सुधारतं.
पॅरिडॉक्सल, पॅरिडोक्स्झामाईन, पॅरिडोक्साईन हे ब-6 या जीवनसत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येक व्यक्तीला साधारण दोन मिलीग्रॅम इतकी ब-6 या जीवनसत्त्वाची गरज असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी घटते. शरीराची वाढ खुंटते. त्वचाविकार यांसारख्या समस्या उद्भवतात. हातापायांतील शक्तीही कमी होते. हात-पायही भरपूर दुखतात.
यकृतात स्निग्ध पदार्थ जमून त्याचं कार्य मंदावतं. त्यामुळे मेद आणि प्रथिनांचं शोषण नीट होत नाही. यकृताचं कार्य मंदावल्यामुळे पोट बिघडतं. हिमोसिडरॉसिस नावाचा विकार होतो. या विकारात यकृत आणि स्प्लीनमध्ये लोहाचे क्षार जमू लागून तिथल्या पेशी नष्ट होतात. अस्थिमज्जेस (बोनमॅरो) इजा होते. प्रतिकारशक्ती घटते.
मज्जांसंस्थेच्या कामात अडथळे निर्माण होतात. लहान मुलांमध्ये ब-6 जीवनसत्त्वांचं घटल्यास त्यांना सारख्या फिट्स येतात. कधी कधी क्षयाच्या रुग्णांनाही या जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा त्रास होतो.
क्षयाच्या आजारात ऍलोपॅथीत आयसोनिकोटिनिक ऍसिड हायड्रॉझाईड नावाचं औषध देतात. या औषध उपचारामुळे ब-6 जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते. ती भरून काढणे गरजेचे असते.