पर्वतासन बैठक स्थितीतील आसन आहे. या आसनात शरीराची स्थिती ही पर्वतासारखी होते म्हणून याला पर्वतासन म्हणतात. या आसनाचे दुसरे नाव वियोगासन आहे. आसन करण्याची सोपी पद्धत आहे.
प्रथम पद्मासनात बसावे, भरपूर श्वास घ्यावा आणि दोन्ही हात वर उचलताना गुद्द्वाराचा संकोच करावा आणि आकाशाच्या दिशेने दोन्ही हात वर न्यावेत. कोणी कोणी दोन्ही हात सरळ समांतर ठेवतात तर काहींच्या मते दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करणे चांगले. हात ताठ ठेवावेत. या आसनात प्राणवायूची गती ऊर्ध्व होते. दोन्ही हात आकाशाकडे नेऊन ताणले जातात. या आसनात जेवढा वेळ श्वास रोखता येईल तेवढा वेळ रोखावा. मग हळूहळू श्वास सोडत दोन्ही हात सावकाश गुडघ्यावर टेकवावेत. या आसनामुळे शरीर बलवान होते. छातीचे विकार दूर होतात. हृदय मजबूत होते, रक्त शुद्धी होते, फुफ्फुसाचे रोग बरे होतात. श्वास घेऊन थोडा वेळ रोखून सोडल्यामुळे दम्यासारख्या विकारात पर्वतासन केल्यामुळे आराम मिळतो. पर्वतासन टिकवता येते. योगीपुरुष पर्वतासनात सूर्यभेदन प्राणायाम तसेच नाडीशुद्धी प्राणायाम करतात. पाठीच्या कण्याचे विकारही या आसनाने बरे होतात. हाताच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते.
बैठकस्थितीत बसून पर्वतासन करतात. याची वेळ साधारण दररोज सर्व आसने करून झाल्यानंतर शेवटी म्हणजे आसनांचा अभ्यास संपवताना करतात. निरोगी लोकांनी तर पर्वतासन करावेच पण श्वासाचा त्रास होणाऱ्या दमेकऱ्यांनीसुद्धा पर्वतासन करावे. सुरुवातीला 30 सेकंद टिकवावे. मग ते बऱ्याच मिनिटांपर्यंत म्हणजेच सात ते आठ मिनिटे टिकवता येते. पर्वतासन हे करायला सोपे आसन आहे. नमस्कार स्थितीमध्ये दोन्हीही बोटे एकमेकांवर ठेवल्यामुळे सर्व बोटांचे दहा दाबबिंदू व्यवस्थित दाबले जातात. म्हणजेच ऍक्युप्रेशरचेही फायदे मिळतात.
दोन्ही हात कानावरून ताठ डोक्यावर नमस्कारस्थितीत स्थिर ठेवले जातात त्यामुळे कानाच्या बाजूंच्या स्नायूंवर दाब येतो व त्यांचे कार्य सुधारते. कर्णेंद्रियांचे कार्य सुलभ व व्यवस्थित चालू राहण्यास मदत होते. ऐकण्याची म्हणजेच श्रवणशक्ती वाढते कारण थोडावेळ हाताच्या स्नायूंनी दोन्ही कानांची रंध्रे बंद होतात. थोडक्यात, पर्वतासन हे प्रत्येकाने व नियमित करावे. पर्वत हा खालच्या बाजूला पसरलेला व वरच्या बाजूला निमुळता होत जातो तशीच शरीराची अवस्था या आसनात होते. दोन्ही हात खांद्याच्या पातळीत समोर उचलून त्यांची बोटे एकमेकांत अडकवून हाताची बोटे पंजाच्या बाहेरील बाजूस ठेवतात. तशाच स्थितीत हाताचे तळवे ऊर्ध्व दिशेला नेऊन शरीराच्या वरच्या दिशेला ताणून घेतात.
सर्व शरीर ताणले गेल्यामुळे हात, पाठ, पोट यांची कार्यक्षमता वाढते. हे एक ताणासन आहे. पाठीचा कणाही चांगल्याप्रकारे ताणला जातो. त्यामुळे पाठीचा कणा लवचिक व कार्यक्षम बनतो.पर्वतासन रोज एक मिनिटे तरी टिकविलेच पाहिजे. आसनात स्थिरता यायला वेळ लागत नाही. पाठीच्या कण्याचे काही विकारही या आसनामुळे बरे होतात. गुदद्वाराचा संकोच व अतिरिक्त दाबामुळे मुळव्याधीसारखे रोग बरे व्हायला मदत होते.