बाजारात लहान लहान वेतासारखे तुकडे असलेले आंबट औषध मिळते. ते फार गुणकारी असते. हेच ते आम्लवेतस होय. आम्लवेतस ओळखण्यास मुळीच अडचण पडत नाही. कारण हे वेताच्या जातीचे असते. वेत प्रत्येकाने पाहिलेला असतो. त्यासारखेच हे असून चवीने फक्त आंबट असते.
भूकेसाठी आणि अन्नपचनासाठी
आम्लवेतस आंबट आहे. त्यामुळे इतर सर्व आंबट पदार्थाप्रमाणे हे खाल्ले असतादेखील कडकडीत भूक लागते. तसेच खाल्लेले अन्न पचविण्याचा त्यात फार मोठा गुण आहे. दहा ग्रॅम आम्लवेतस घेऊन, 50 ग्रॅम पाण्यात रात्री भिजत टाकून, सकाळी ते वाटावे व गाळून घ्यावे. त्यात चव येण्यापुरते सैंधव घालून भूक न लागणाऱ्या माणसांनी प्रत्येक वेळी दहा ग्रॅम रोज याप्रमाणे घ्यावे. त्यामुळे भूक लागते.
वातशमनकारी
दहा ग्रॅम आम्लवेतासाचे तुकडे, साठ ग्रॅम पाण्यात भिजत घालावे. सकाळी त्याची पुड करावी. त्यात काळे मीठ घालून ते तयार मिश्रण रोज पाच ग्रॅम घ्यावे. यामुळे शरीराचा वात कमी होतो. तसेच वायू कमी झाल्यामुळे शरीराची सूज कमी होते.
पोटाचा जडपणा जाण्यासाठी
जेवणापूर्वी आम्लवेतस चूर्ण जर किंचित सैंधव मीठ घालून घेतले तर पोट साफ होऊन अन्न पचनाच्या ढेकरा येतील तसेच पोटाचे जडत्व कमी होईल व उत्तम भूक लागून मंदाग्निची तक्रार दूर होईल. अग्नि प्रदिप्त होईल. जर हे चूर्ण जेवणाच्या पूर्वी असे घेतल्यास थोड्याच दिवसांत भूक न लागण्याची तक्रार कमी होईल.
अरूचीवर
अरुचीवर हे आम्लवेतस चांगले औषध आहे.
पोटदुखीवर
पोटात भूक आहे पण अन्न तोंडात घातले तर खाववत नाही, अन्न फिरते, अन्नावरची वासना उडते. अशा परिस्थितीत जर अशा वेळी पोटदुखीचाही विकार जडत असेल तर आम्लवेतस उपयोगात आणावे. ते सर्व तक्रारींवर उत्तम लागू पडते. आम्लवेतसाचे पाणी, पोटदुखीच्या माणसाने हिंग व मीठ घालून घ्यावे, पोटदुखी थांबते.
परिणामशूलावर
परिणामशूल म्हणजे अन्न जिरल्यानंतर किंवा जिरत असताना जे पोट दुखते ती व्याधी त्यावरही आम्लवेतस हे औषध उत्तम लागू पडते. जेवणानंतर तासाभराने आम्लवेतस पाणी काही दिवस सारखे घेतल्यानंतर पोटदुखी कायमची जाते.
गुल्माच्या पोटदुखीत
गुल्माच्या पोटदुखीत म्हणजे पोटात गुबारा धरला आहे, वायू नीट सरत नाही, ढेकरा येत नाहीत, पोट दुखत आहे, अशावेळी आम्लवेतसाचे पाणी रोज 10मि.ली. याप्रमाणे तीन वेळ घेतल्याने वायू सरून पोटदुखी थांबते.
शौचास साफ होण्यासाठी
आम्लवेतसात मलाच्या गाठी दूर करण्याचा मोठा गुणआहे. शौचास नीट साफ होत नसेल तसेच , मलाची गाठ बनत असेल तर अशावेळी अन्न नकोसे वाटते. तोंड बेचव होते, खाल्लेले अन्न नीट पचत नाही, क्वचित प्रसंगी उलटीही होते किंवा उलटीची भावना निर्माण होते. अशा वेळी आम्लवेतस घेतल्याने मलाच्या गाठी मोडतात, शौचशुद्धी होते, भूक चांगली लागते व तोंडास चांगली चव येते.
अतिसारावर
अतिसारावरही वरीलप्रमाणे तयार केलेले आम्लवेतसाचे पाणी थेंब थेंब वरचेवर द्यावे, त्याने वारंवार होणारे परसाकडचे थांबते.
आवेवर
पोटात कळ येऊन शौचास होत असेल तरीही आम्लवेतसाचे पाणी प्यायला द्यावे त्यामुळे आव थांबते. आव व मुरड्यास हरबऱ्याच्या आंबीचा ज्याप्रमाणे उपयोग होतो, त्याप्रमाणे किंबहुना आंबेपेक्षाही जास्त आम्लवेतसाचा उपयोग होतो.
संग्रहणीवर
संग्रहणीवरही आम्लवेतस चांगले लागू पडते. एखादेवेळी परसाकडे पुष्कळ होते.
मुतखड्यावर
मुतखडा बरा होण्यासाठी आम्लवेतसाचा औषध म्हणून वापर केला जातो. व त्यापासून फायदा होतो असे आढळून आले आहे की मुतखड्यात होत असलेला दाह हे औषध घेतल्याने कमी होतो.
सूजेवर, जखमेवर
आम्लवेतसाचा वरून लावण्यासही उपयोग होतो. शरीरातील एखादी जागा सुजली, लाल झाली, तिथे अतिशय आग होऊ लागली म्हणजे आम्लवेतस पोटिसाप्रमाणे, बारीक वाटून, गरम करून बांधावे. त्याने आग कमी होऊन बरे वाटते.
अजीर्णावर
आम्लवेतस हे अजीर्ण बरे करते. विशेषतः मांस खाऊन झालेले अजीर्ण याने ताबडतोब बरे होते. क्रव्याद्रस हे अजीर्णनाशक औषध आम्लवेतसाची भावना देऊन बनवतात जे अजीर्णात उपयुक्त आहे. विषबाधेवर
आम्लवेतासाचा धोताऱ्यामुळे विषबाधा झाली असता खूप उपयोग होतो. अशाप्रकारे आम्लवेतस लहान वेतासारखी वनस्पती औषधी आहे.
अननस
अननस कोणाला आवडत नाही अशी व्यक्ती पहायला मिळणे फारच दुर्मिळ आहे. अननस हे फळ आंबट गोड चवीचे असते. ते जीभेला चव आणते म्हणजेच आयुर्वेदात त्याला रूचिप्रद किंवा रूचीपूर्ण म्हटले जाते.
अजीर्णावर
खूप जेवणामुळे पोटाला तडस लागली असेल किंवा अति जेवणामुळे अजीर्ण झाले असेल तर अननसाच्या दोन फोडी खाव्यात. त्यामुळे अजीर्ण कमी होते.
पोटात केस गेला असता
अननसाचा मुख्य उपयोग पोटात केस गेला असता होतो. पोटात केस गेले असल्यास त्यावर अननसाच्या फोडी खाव्यात. पोटातील केसाचे पाणी होते.
मुत्रल
अननस हे फळ किडनी साफ ठेवण्यास उपयुक्त आहे. ते बहुमूत्रल आहे म्हणजेच अननसाच्या फोडी किंवा रस प्यायला असता. त्या व्यक्तिला पुष्कळ वेळा लघवीला जावे लागते, त्यामुळे उत्सर्जन संस्था उत्तमप्रकारे कार्यरत होते.
रुचिपूर्ण
अननसाने तोंडाला चव येते. जर नुकताच ज्वर येऊन गेला असेल अथवा सर्दीने तोंडास चव नसेल तर अननस कापून त्याच्या फोडींना मिरपूड व साखर लावून खाल्ल्याने तोंडाला चव येते तसेच लघवीस कमी होते.
अन्न पचनासाठी
अननस हा आंबट गोड चवीचा आहे. त्याचा रस जेवणानंतर अर्धा कप प्यायल्यास अथवा त्याच्या चार फोडी नियमित खाल्यास अन्न पचन योग्य प्रकारे होते. अशाप्रकारे अननस हे फळ अत्यंत उपयुक्त आहे.