पुणे – डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान जलदगतीने वापरता यावे यासाठी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण आणि शिक्षण देण्यासाठी उपकरण उत्पादक कंपन्या अतिरिक्त खर्चाचा भार उचलत असतात तसेच वैद्यकीय तंत्रज्ञानात घडणाऱ्या अत्याधुनिक सुधारणांचा लाभ भारतीय रुग्णांना कायम मिळत राहील, याची खात्री हवी असल्यास सध्याच्या उपकरण किंमत धोरणामधील सर्व मोठ्या त्रुटी दुरुस्त करण्याची नितांत आवश्यकता आहे.
हृदयातील बंद झालेल्या धमन्यांना पुन्हा खुल्या करण्यासाठी त्यांच्यात स्टेंट नामक एक छोटीशी पातळ धातूची चकती घालण्यात येते. भारतीय राष्ट्रीय औषधनिर्माण किंमत प्राधिकरण (इंडियन नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरीटी – एनपीपीए) यांनी या स्टेंटसाठी एक निर्धारित किंमत ठरवून दिल्याला आता जवळपास एक वर्ष लोटलं आहे. तेव्हापासून प्रसारमाध्यमातून प्रकाशित होणाऱ्या वार्तांकनातून याकडे लक्ष वेधण्यात आले आहे, की या निर्णयामुळे स्थानिक स्टेंट उत्पादकांचा बाजारपेठेतील हिस्सा लक्षणीय वाढलेला आहे.
तुलनेने महाग असलेल्या आयात केलेल्या परदेशी स्टेंट उत्पादकांची जागा आता हे देशांतर्गत उत्पादक झपाट्याने काबीज करू लागले आहेत. परंतु, ही स्थानिक उत्पादने ज्या परदेशी उत्पादनांची जागा घेत आहेत त्यांच्या तुलनेत गुणवत्ता, दर्जा, वापर, उपयोग, सुरक्षितता आणि कार्यक्षमता या निकषांवर तोडीस तोड आहेत किंवा नाही, याबाबत प्रसार माध्यमातून फारच थोडी चर्चा झाली आहे.
अंतिम ग्राहकासाठी खरेदी किंमत कमी करून देणे आणि सुयोग्य तंत्रज्ञान/उत्पादन यांच्या गुणवत्तेबाबत किंवा उपलब्धतेबाबत कसल्याही प्रकारची तडजोड न करता त्यामधून अपेक्षित परिणाम मिळत राहतील याची खात्री बाळगणे हेच कोणत्याही किंमत नियंत्रण धोरणाचे मूलभूत उद्दिष्ट असते. त्यामुळेच स्टेंट विषयाबाबत वास्तवात असे घडले आहे काय? हा प्रश्न विचारणे भाग पडत आहे. आधी थोडीशी पार्श्वभूमी विचारात घेऊया. एनपीपीएच्या किंमत कपातीमध्ये आयात केलेल्या, स्थानिक पातळीवर उत्पादित झालेल्या स्टेंट तसेच सध्या धातूच्या स्टेंट आणि औषधी वेष्टन असलेल्या स्टेंटस – अशा सर्वच प्रकारच्या स्टेंटसना समाविष्ट करण्यात आले आहे.
यांच्यामध्ये विभिन्न सुटे भाग असलेल्या (एकजिनसी नसलेल्या) स्टेंटचा देखील अंतर्भाव होतो. यात अशी काही उत्पादने आहेत, ज्यांना जगातील सर्वात विलक्षण आणि काटेकोर नियामकांनी अत्यंत कठोर आणि काटेकोर चाचणी करून मान्यता दिलेली आहे आणि ज्यांना अशी मान्यता मिळालेली नाही अशी उत्पादने देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. बरीचशी उत्पादने अशी आहेत की जी एका विशिष्ट प्रकारच्या रुग्णांना अगदी चपखल लागू होतात. जसे की विविध आजार असलेले (एकाच वेळी विभिन्न आजारांनी ग्रस्त असणारे) रुग्ण. अशीही उत्पादने असतात जी वापराच्या दृष्टीने अगदी मूलभूत असतात किंवा एकच आकार सगळ्यांना लागू पडेल’ अशा सरसकट प्रकारची असतात. अशा काही मुद्द्यांमुळे त्यांच्यातील फरक स्पष्ट होतो.
तथापि, किमतींवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने विचार करता, ही उत्पादने सरधोपटपणे दोन प्रकारांत विभागली जातात. एक म्हणजे निव्वळ धातूची स्टेंट आणि दुसरी म्हणजे औषधाचा अंतर्भाव असलेली स्टेंट किंवा डीईएस (ऊएड). त्यांनी यापैकी प्रत्येकाला किमतीसाठी कमाल मर्यादा धोरण आखून दिले आहे. डीईएस श्रेणीतील अनेक आयात उत्पादनांचा विचार करता, किमतीची ही कमाल मर्यादा खूपच अल्प असून त्यामुळे ती अजिबातच संयुक्तिक ठरत नाही आणि त्यामुळे त्यांची निर्मिती करणाऱ्यांना ही उत्पादने भारतात उपलब्ध करून द्यावीत किंवा नाही असा विचार करण्यास भाग पडत आहे.
या प्रश्नाचे उत्तर निःसंदिग्धपणे होय असेच आहे. या पैकी प्रत्येक उत्पादन अत्यंत विशिष्ट कार्य करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विकसित करण्यात आलेले आहे. उपयुक्तता, किंमत किंवा कामकाजी कार्यक्षमता किंवा अधिक जास्त विचार करायचा तर मधुमेहासारख्या सह-आजाराने ग्रस्त रुग्णाच्या शरीरात स्टेंट बसविण्यातील समर्पकपणा यांच्याशी या उत्पादनाचा उद्देश, हेतू जोडला गेला पाहिजे. थोडे सविस्तर समजावून सांगतो. डीईएसमध्ये विविध भाग असतात.
जसे की खुद्द स्टेंट; ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे त्या धमन्या किंवा रक्तवाहिन्या पुन्हा आकुंचन पावू नयेत यासाठीचे औषध; औषधाला स्टेंटभोवती गुंडाळून ठेवणारे पॉलीमरचे आणि त्याच्या धमनीतील मिसळण्यावर नियंत्रण राखणारे वेष्टन; जिचा वापर करून स्टेंट आत सारला जातो ती डिलिव्हरी सिस्टीम.
सर्वप्रथम जेव्हा डीईएस सादर झाली तेव्हापासून या सर्व घटकांमध्ये वेळोवेळी सुधारणा – आधुनिकता होत गेलेल्या आहेत. यामध्ये स्टेंटची जाडी आणि लवचिकता; स्टेंटची रेडीओ अपारदर्शकता किंवा आत बसविते वेळची दृश्यमानता; वापरले गेलेले औषध इत्यादीचा समावेश होतो, परंतु ही आधुनिकता केवळ एवढ्या घटकांपुरतीच मर्यादित आहे असेही नाही.
या आधुनिक सुधारणांचे आभार मानायला हवेत. आधीच्या पिढीतील रेस्टेनोसिस सारख्या विशिष्ट शास्त्रीय एंड पॉईंटचाच वापर करणाऱ्या स्टेंटच्या तुलनेत सध्याच्या पिढीच्या डीईएसमधून मिळणारे परिणाम अधिक वरच्या दर्जाचे आहेत. तथापि, सध्याची आधारभूत किंमत तसेच किमतीवरील कमाल मर्यादा धोरण यामुळे या नवीन पिढीच्या आधुनिकतेला वावच उरलेला नाहीये. हे नीट समजून घेण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहूया. स्टेंटमधील इनोव्हेशनचा एक महत्वाचा पूर्वपरिणाम म्हणजे मधुमेही रुग्णांच्यात स्टेंट बसविल्यानंतर मिळणारे सुधारित परिणाम होय. मधुमेहींमध्ये हृदयातील धमनीत अडथळा (ब्लॉकेजेस) निर्माण होण्याचा धोका हा तुलनेने अधिक असतो, अशा परिस्थितीत आजाराचे स्वरूप आणखी गंभीर, किचकट बनते आणि धमनीमध्ये जमा होणारा गुठळीचा थर (प्लाक) स्टेंट यशस्वीपणे बसविण्याच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरतो.
त्यामुळे स्टेंटमध्ये आधुनिकता येऊन देखील बहुतांश वेळा डॉक्टर अशा रुग्णांना बायपास सारख्या खुल्या शस्त्रक्रिया करून घेण्याचाच सल्ला देतात. मधुमेही रुग्णांचा विचार करता स्टेंटमधून मिळणाऱ्या लाभात, परिणामात सुधारणा घडवून आणणारा डीईएस ही खुल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत कमी जोखमीची प्रक्रिया असून त्यामध्ये रुग्णाच्या तब्येतीत लवकर सुधारणा घडून येते, आणि हे उद्दिष्ट निश्चितच साध्य करण्याजोगे आहे, नाही का! आता विचार करा, असे डीईएस तयार केले गेलेत की ज्यांच्या वापरामुळे मधुमेही रुग्णांना देखील अगदी सर्वसामान्य लोकांसारखेच किंवा जवळपास त्या तोडीचे परिणाम मिळत आहेत. विकासकांनी संशोधनासाठी पुरेसा वेळ आणि आर्थिक गुंतवणूक केल्याखेरीज हे शक्य
होणार नाही.
सध्याच्या धोरणानुसार जायचे तर अशा प्रकारच्या उत्पादनांना देखील किंमत पातळी लागू होईल आणि डीईएस जरी असले तरी त्याला त्यापेक्षा कमी प्रभावी असलेल्या अन्य उत्पादनांच्या रांगेत बसवूनच त्याच किंमत पातळीवर आणले जाईल. त्यामुळे, ते कदाचित मधुमेहाची जागतिक राजधानी असलेल्या भारतात उपलब्ध होईलही परंतु देशात विकल्या जाणाऱ्या डीईएसच्या एकूण संख्येवर जोपर्यंत त्याचा काही परिणाम होत नाही किंवा ती संख्या वाढत नाही, तोवर अशा उत्पादनांचा ज्यांना प्रंचंड मोठा लाभ मिळणार आहे, परंतु ते या लाभापासून वंचित राहत आहेत असे रुग्णही खूप असतील. आरोग्य सुरक्षेबाबतचे निर्णय अतिशय विवेकी आणि बारकाईने विचारपूर्वक घेतलेले असायला हवेत.
अर्थातच उप समितीने सरकारला असा सल्ला दिलेला आहेच, की स्टेंट तंत्रज्ञानात झालेले अगदी थोडेसे इनोव्हेशन देखील किमतीच्या दृष्टीने विचार करता, उप-विभाग करण्यास भाग पाडू शकते. परंतु यासाठी जेवढ्या प्रमाणात पुराव्याची आवश्यकता आहे त्यामुळे कमाल मर्यादा फारच वाढते. जोवर डीईएस बाकीच्यांपेक्षा उत्कृष्ट असल्याचे उल्लेखनीय मार्गाने सिद्ध होत नाही, तोवर ते काही वेगळे आहे असे मानलेच जाणार नाही.
वैद्यकीय तंत्रज्ञानात, क्लिनिकल ट्रायल्स या उत्पादनाचे श्रेष्ठत्व किंवा उत्कृष्टता दर्शविण्याच्या दृष्टीने आखलेल्या नसतात, तर सुरक्षा आणि कार्यक्षमता यांच्या अनुषंगाने ते उत्पादन निकृष्ट नाही’ हे दाखविण्यासाठी आखलेल्या असतात. कायदेशीर नियामक परवानगीसाठी देखील हाच निकष वापरला जातो. उत्कृष्टता सिद्ध करून दाखवण्यासाठी कित्येक दशके ते उत्पादन क्लिनिकमध्ये किंवा शल्यक्रियांमध्ये यशस्वीपणे वापरले जावे लागते आणि त्यायोगे असंख्य पुरावे-सिद्धांत जमा व्हावे लागतात. उत्कृष्टतेच्या माहितीच्या गरजेची परिणती उप-विभाग करण्यात झाली असून किंमत श्रेणीची उतरंड ठरविण्यामागचा हेतूच सुरुवात करण्यामधील अडथळा बनला आहे.
सध्याच्या दृष्टिकोनापेक्षा औषध आणि उपकरण यांच्यातील अत्यावश्यक फरक घडवून आणणाऱ्या नव्या दृष्टिकोनाचे अधिक सुयोग्य आणि समंजस म्हणून स्वागत व्हायला हवे. डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान जलदगतीने वापरता यावे यासाठी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण आणि शिक्षण देण्यासाठी उपकरण उत्पादक कंपन्या अतिरिक्त खर्चाचा भार उचलत असतात; जे औषधनिर्माण कंपन्यांना करावे लागत नाही. औषधांच्या तुलनेत उपकरणे ही अधिक वेगाने कालबाह्य किंवा निरुपयोगी होत असतात आणि त्यांच्या वितरणासाठी तुलनेने खर्च देखील अधिक येत असतो.
– डॉ. शिरीष हिरेमठ,
(सिनीअर इंटलव्हेंशनल कार्डिऑलजिस्ट, रुबी हॉल क्लिनिक)