पुणे – अंकिता नुकतीच 34 वर्षांची झाली. तिला गर्भधारणा (Pregnancy) कधी होणार, या कुटुंबीय व मित्रमंडळी यांच्या प्रश्नाचे उत्तर ती आतापर्यंत टाळत आली होती. अंकिता व तिचा पती अर्जुन यांनी मूल होण्याविषयी सुरुवातीच्या काळात फारसा विचार केला नसला तरी त्यांनी आता मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतर जवळजवळ पाच वर्षांनी अंकिताने आई होण्याचा विषय काढला होता आणि त्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे मत अर्जुननेही व्यक्त केले होते. त्यांच्या नोकऱ्या स्थिर होत्या व ते आर्थिकदृष्ट्या स्थिरावले होते; परंतु त्यांनी मूल होण्याचा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा अंकिताला नैसर्गिकपणे गर्भधारणा (Pregnancy) होण्यासाठी फार उशीर झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
स्त्रीची तिशी येईपर्यंत किंवा त्याहूनही अधिक वर्षे पाळणा लांबवणारी अंकिता व अर्जुनसारखी अनेक जोडपी आहेत. स्त्रीला गर्भधारणा (Pregnancy) होण्यामध्ये अडथळा आणणाऱ्या कारणांमध्ये वय हे एक महत्त्वाचे कारण आहे. वयानुसार स्त्रीची प्रजननक्षमता कमी होत जाते, असे जगभरातील फर्टिलिटी तज्ज्ञांचे मत आहे. काम, प्रवास व पैशांची बचत करण्याची इच्छा अशा कारणांमुळे मूल होण्याचा निर्णय पुढे ढकलला जातो.
मोठा धोका कशामुळे निर्माण होतो?
महिलांमध्ये अंड्यांचे प्रमाण मर्यादित असते व शरीरातील अन्य भाग जसे वयस्कर होत जातात तसे अंड्यांचेही होते! आईच्या गर्भातील स्त्री भ्रूणामध्ये 1 दशलक्ष अंडी असतात व बाळाचा जन्म होईपर्यंत तिच्या गर्भाशयात केवळ 400-500 उपयुक्त अंडी उरतात. ऋतुप्राप्तिनंतर दर महिन्याला एक किंवा दोन अंडी सोडली जातात.
स्त्रीची मेनापॉजची स्थिती येईपर्यंत गर्भाशयातील अंड्यांची संख्या कमी होत जाते. काही वेळा, स्त्रीची पाळी नियमित येते; परंतु तिच्यातील अंड्यांचा साठा पूर्णपणे संपलेला असतो. विशीच्या अखेरीस किंवा तिशीच्या सुरुवातीला आपली प्रजननक्षमता झपाट्याने घटू लागते हे अनेक महिलांच्या लक्षात येत नाही.
स्त्रीचे वय वाढू लागल्यावर तिच्यातील अंड्यांची गुणवत्ताही घटू लागते आणि ती पूर्वीइतक्या वारंवारपणे ओव्ह्युलेट होत नाही. उशिरा मातृत्व स्वीकारताना, अंड्यांमध्ये क्रोमोसोमल ऍब्नॉर्मिलिटीज असण्याची शक्यता मोठी असते. त्यामुळे गर्भधारणा (Pregnancy)होणे अवघड होते किंवा गरोदर असताना गर्भपात होण्याची भीती असते.
जीवनशैली कारणीभूत आहे का?
अनेक स्त्रिया उच्च शिक्षण व करिअर यामुळे लग्न करण्याचा विचार लवकर करत नसल्यामुळे मूल होण्याचे सरासरी वय गेल्या काही दशकांमध्ये वाढले आहे. यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत गर्भनिरोधकांची सहज उपलब्धता, घटस्फोटांचे वाढते प्रमाण, आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित होईपर्यंत मूल होऊ न देण्याचा जोडप्यांचा निर्णय, इ.पाश्चिमात्त्यांचे अनुकरण करत लग्न व गर्भधारणा (Pregnancy)पुढे ढकलण्याचा निर्णय भारतीय महिलांसाठी साजेसा नाही.
कॉकेशिअन महिलांच्या तुलनेत भारतीय महिलांचे बायोलॉजिकल क्लॉक सहा तास वेगाने फिरते, असे एका अभ्यासात आढळले आहे. प्रत्यक्षात, तिशीनंतर अनेक महिलांना गर्भधारणा (Pregnancy)होण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात, तर पाश्चिमात्त्य देशांत हा प्रश्न तिशीच्या अखेरीस किंवा चाळिशीच्या सुरुवातीला निर्माण होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
महिलांचे अल्कोहोल सेवनाचे व धूम्रपानाचे वाढते प्रमाण अशा घटकांमुळे त्यांच्या अंड्यांच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होतो. ओव्हेरिअन कॅन्सर व उपचार, अगोदर झालेली ओव्हेरिअन सर्जरी, लक्षणीय ओव्हेरिअन पॅथॉलॉजी, प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअरची कुटुंबाची हिस्ट्री अशा वैद्यकीय घटकांमुळेही प्रजननक्षमता लवकर कमी होऊ लागते.
असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नालॉजीची भूमिका :
इंटरनेट विश्वामध्ये असणारी अनेक उदाहरणे व माहिती यामुळे, महिला गर्भधारणा (Pregnancy)लांबवू शकतात व नंतर आर्ट (असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नालॉजी) तंत्रज्ञानाच्या मदतीने गरोदर होऊ शकतात असा समज समाजात आहे. नैसर्गिकपणे गर्भधारणा (Pregnancy)होण्याच्या क्षमतेप्रमाणेच इन्फर्टिलिटीसाठीच्या उपचारांच्या यशावरही वयाचा परिणाम होतो, हे या महिलांच्या लक्षात येत नाही. 30व्या वर्षी एखाद्या महिलेला दिवस राहण्याची शक्यता 20% असेल तर 40 व्या वर्षी नैसर्गिकपणे गर्भधारणेचे प्रमाण दरमहा 5% इथपर्यंत कमी होते.
म्हणूनच, तिशीच्या अखेरीस किंवा त्याहीपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांनी सहा महिने गर्भधारणेचे प्रयत्न करून सफलता न मिळाल्यास लवकरात लवकर तपासण्या करून घ्याव्यात व गर्भधारणेचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर 6 महिन्यांनी उपचार करून घ्यावेत. 40 वर्षांहून अधिक वय असलेल्या महिलांनी तातडीने फर्टिलिटी स्पेशालिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अधिक वय असलेल्या महिलांची प्रजननविषयक तपासणी करताना त्यांच्या गर्भाशयातील साठ्याचे तपशीलवार मूल्यमापनही करायला हवे.
लांबवलेल्या गर्भधारणेतील जोखीम :
महिलेचे वय जसजसे वाढत जाते, तसे आई व बाळ या दोन्हींसाठी गर्भावस्थेशी संबंधित गुंतागुंत व आरोग्यविषयक प्रश्न वाढत जातात. वयानुसार अंड्यांची संख्या व गुणवत्ता घटू लागली की नैसर्गिकपणे गर्भधारणा (Pregnancy)होण्याचे स्वप्न धूसर होऊ लागते. त्यामुळे कुटुंबात मानसिक ताण व चिंता वाढत जाते.
लांबलेल्या गर्भावस्थेच्या बाबतीतील एक सर्रास आढळणारा धोका म्हणजे शेवटपर्यंत गर्भावस्था टिकून राहणे. तिशीच्या अखेरीस गर्भधारणा (Pregnancy)झालेल्या अनेक महिलांमध्ये शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे किंवा इतक्या वर्षांत विकसित झालेल्या असाधारण स्थितीमुळे गर्भपात होण्याची भीती अधिक असते.
प्रसूतीच्या दरम्यान गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका वाढतो दीर्घ काळ प्रसूतिवेदना, असिस्टेड प्रसूतीची आवश्यकता किंवा सिझेरिअन सेक्शन, किंवा स्टिलबर्थ.
गर्भावस्था, प्रसूती व प्रसूतीनंतर दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध न झाल्यास आई व बाळ यांच्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. काही व्यंगही निर्माण होण्याची शक्यता असते. डाउन्स सिंड्रोम अशी कॉन्जेनिटल ऍब्नॉर्मिलिटी असलेले बाळ जन्माला येण्याची शक्यताही असते.
तुमची प्रजनन क्षमता टिकवून ठेवा :
एखाद्या जोडप्याने मूल उशिरा होऊ देण्याचा निर्णय घेतल्यास त्यांनी शक्य तितक्या लवकर फर्टिलिटी स्पेशालिस्टचा सल्ला घ्यावा आणि स्त्रीमधील अंड्यांची संख्या तपासून घ्यावी. एएमएच लेव्हल्स या ब्लडटेस्टद्वारे महिलांच्या अंड्यांचा साठा जाणून घेता येतो. यामुळे त्यांना स्वतःची शारीरिक स्थिती समजून घेण्यासाठी व भविष्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करण्यासाठी मदत होते.
फ्रीझिंग एग्स व त्यांचा नंतर वापर केल्याने महिलांना गर्भधारणा (Pregnancy) लांबवताना मदत होते. प्रजननक्षमता टिकवून ठेवणे हा व्यक्तींना त्यांची प्रजनन क्षमता किंवा पुनरुत्पादनाची क्षमता जतन करून ठेवण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न आहे. फ्रीझिंग एजंटचा वापर केल्याने, अविवाहित व्यक्तींसाठी सिमेन, अंडी व विवाहित जोडप्यांसाठी एम्ब्रिओज असे ह्युमन टिश्यू गोठवले जातात व खास पद्धतीने तयार केलेल्या टॅंकमध्ये साठवले जातात. एखाद्या जोडप्याला मूल हवे असेल; परंतु नैसर्गिपणे गर्भधारणा (Pregnancy) होण्यासाठी फार उशीर झाला आहे असे वाटत असेल तर त्यांना अगोदर गोठवलेल्या गेमेटेस वा एम्ब्रियोंच्या सहाय्याने आयव्हीएफची (इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन) मदत घेता येऊ शकते.
थोडक्यात सांगायचे तर, लांबवलेल्या गर्भधारणेमध्ये आई व बाळामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तरुण, शिकलेल्या जोडप्यांमध्ये याविषयी माहिती व जागृतीचा अभाव आहे, हे धक्कादायक आहे. गर्भधारणा (Pregnancy) होण्यासाठी त्यांच्याकडे मोजकाच कालावधी असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. वैयक्तिक व व्यावसायिक स्थितीनुसार केव्हा मूल होऊ द्यायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य महिलांना आहे; परंतु हे निर्णय घेत असताना प्रजनानाच्या वयाचे भानही ठेवणे गरजेचे आहे.
-डॉ. करिश्मा डफळे