पुणे – मायफळ हे कोणतीही वनस्पती नसते. ओक वृक्षाच्या कोवळ्या फांदीवर एक विशिष्ठ प्रकारच्या किटक छिद्र पाडून त्यात अंडी घालतात. ह्या अंडीतून जेव्हा अळी बाहेर पडते तेव्हा वनस्पतींचा पेशीसमुह त्याभोवती जमा होऊन गांठ तयार होते त्यास मायफळ म्हणतात.
मायफळामध्ये कटु, उष्ण, वात रोग, अतिसार, संग्रहणी, अरूची, स्तंभक इ. गुणधर्म असतात.
औषधी उपयोग:- मधुमेहामध्ये एक ग्रॅम मायफळ चूर्ण साखर न घालता नेहमीसारखा चहा करून प्यावा. याने लवकर शुगर नियंत्रीत होण्यास मदत होते.
माता- भगिनींनी श्वेतप्रदरामध्ये एक ग्रॅम मायफळ चूर्ण पाण्यासोबत सात दिवस घ्यावे. याने सात दिवसांत आराम मिळतो.
अतिसार होत असल्यास मायफळ व डाळिंबाच्या फळावरील सालीचे चूर्ण ताकासोबत घ्यावे.
तोंडावर सुरकुत्या पडतात तेव्हा मायफळाची पाण्यात वाटून घट्ट पेस्ट करून पाच मिनिटे लेप करून ठेवावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने तोंड धुवावे.
तोंड बेचव झाल्यास मायफळ लिंबूच्या रसात उगाळून जिभेला लावावे व थोड्या वेळाने गरम पाण्याने गुळणी करावी.
दात हालत असल्यास मायफळ चूर्ण दहा ग्रॅम, पांढरा कात दहा ग्रॅम व तुरटी दहा ग्रॅम घेऊन बारीक पावडर करून ठेवावी. रोज याने दात घासल्यास दात घट्ट होतात.
सांध्यांना सूज आल्यास मायफळ पाण्यात उगाळून लेप करावा.
कोणी घरीच दंतमंजन बनवत असेल तर त्यांनी त्यात मायफळ घालावे.
त्वचेवर व्रण झाल्यास मायफळ उगाळून लावावे. याने व्रण संकुचीत होऊन रोपण होते.
शौचावाटे रक्त पडत असल्यास मायफळ गाईच्या दूधात उगाळून द्यावे. याने लवकर आराम मिळतो.
– डाॅ. डहाळे, नाशिक