हवामानातील बदलाचा परिणाम हा त्वचेवरही होतो. वातावरणातील गारठ्यामुळे ओठांची त्वचा कोरडी पडते. कधी कधी ओठांना भेगा पडून त्यातून रक्त वाहू लागतं. तरुण, मध्यमवयाच्या रुग्णांपेक्षा वृद्धांमध्ये ओठांची त्वचा कोरडी पडून त्यातून रक्त वाहण्याच्या तक्रारी जास्त आढळतात.
वाढत्या वयामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होत जातो. पाणी, फळं आणि कोशिंबिरीतून ओठांना जास्तीत जास्त नैसर्गिक पाण्याचा ओलावा मिळतो. त्यासाठी चोवीस तासांत किमान आठ-दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. फळांमध्ये आणि कोशिंबिरींमध्ये पाण्याचा भाग टक्के असतो. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ खाणं हे त्वचेबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं.
ओठांचा मऊपणा टिकवण्यासाठी त्यांना नियमितपणे पेट्रोलियम जेली किंवा ई जीवनसत्त्व असलेल कोल्ड क्रीम लावणं गरजेचं आहे. हल्ली बाजारात निरनिराळे लीप ग्लासेसही उपलब्ध आहेत. मात्र ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लावावेत.
ओठ काळे पडण्यांचं प्रमुख कारण आहे उन्हाळा. ओठांना जास्तीचं ऊनही सहन होत नाही.
सतत उन्हात फिरण्याने सूर्य किरणातील अतिनील घटनांमुळे (अल्ट्राव्हायलेट) ओठ काळे पडतात. यासाठी दुपारच्या वेळेत उन्हात जाणं टाळावं. सनस्क्रीनचा वापर करावा. शरीरात जर हिमोग्लोबीन या घटकाची कमतरता निर्माण झाली असेल तरीही ओठ काळसर दिसतात. त्यासाठी सर्व पालेभाज्या, फळं, मोड असलेली कडधान्यं यांचा आहारात समावेश असणं गरजेचं आहे.
अनेक वेळा ओठांच्या कडांना चिरा पडतात. त्याचं कारण आहे, ब जीवनसत्त्व आणि झिंक या खनिजाची कमतरता. त्यासाठी झिंक असलेली मल्टीव्हिटामिनची औषधं घेणं फायद्याचं ठरतं. पौष्टिक आहार, भरपूर पाणी, तसंच फळं आणि कोशिंबिरीतून ओठांना भरपूर ओलावा मिळतो.