– ऋषिकेश जंगम
या आठवड्या पासून ‘नो शेव्ह नोव्हेंबर अर्थातच दाढी न करण्याचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात दाढीला कात्री न लावण्याचा पणच जगभरात केला जातो. गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळेच परदेशातील काही ट्रेंड आणि कल्पना याच माध्यमांवरून व्हायरल होऊन आपल्याकडे आल्या आहेत. आणि याच कल्पना तरुणांमध्ये रुजताना दिसत आहे.
दरम्यान, अशीच एक कल्पना परदेशाप्रमाणे आपल्या देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. ती म्हणजे, नोव्हेंबर महिन्यामध्ये दाढी न करण्याची संकल्पना. या निमित्तानं तरुणांना एक हटके आणि ट्रेंडी लूक आपल्या साठी निवडता येतो.
आपल्या देशात सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली की तो एक ट्रेण्ड बनून जातो. मात्र, त्यामागील मूळ उद्देश काय आहे, हे खूपच कमी जणांना ठाऊक असते. नो शेव्ह नोव्हेंबर. हा फक्त एक व्हायरल ट्रेण्ड नसून ती एक सामाजिक मोहीम आहे. परदेशात मागील अनेक वर्षांपासून ही मोहीम सुरू आहे. यामागे पुरुषांचे आरोग्य आणि खास करून प्रोस्टेट कॅन्सरबद्दल जगरूकता निर्माण करण्याचा हेतू आहे.
काय आहे? नो शेव्ह नोव्हेंबर
नो शेव्ह नोव्हेंबर ही मोहीम 1999 साली ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथील काही तरुणांनी एकत्र येऊन सुरु केलेली मोहीम आहे. आता तुम्ही म्हणाल दाढी न करण्यामागे कसली आली मोहीम… पण याच्या मागे सुद्धा एक मोठं कारण दडलं आहे.
या तरुणांनी ही मोहीम कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी सुरु केली होती. कॅन्सरवरील उपचारात रुग्णाचे केस गळू लागतात. दाढीसाठी खर्च होणारे पैसे एक महिनाभर बाजूला टाकून हे पैसे कॅन्सरग्रस्तांना आणि पुरुषांना होणाऱ्या आजारासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांना दान करायचे आणि याच हेतूने ही मोहीम राबवली जात आहे.
कॅन्सरच्या रुग्णांबद्दल सहानभूती व्यक्त करण्याच्या या प्रयत्नाला 2004 पासून ‘मोव्हेंबर’ हे नाव देण्यात आले. या शब्दातील मो म्हणजे ‘मुस्टॅचेस’ (मिशा) आणि व्हेंबर हे ‘नोव्हेंबर’ महिना दर्शवणारे शब्द एकत्र करून हा शब्द तयार झाला. मात्र अनेकांना हा खरा उद्देश ठाऊक नसला तरी सोशल मीडियामुळे फॅशन ट्रेण्ड म्हणून नो शेव नोव्हेंबर साजरा करणाऱ्यांची संख्या वाढलीय हे विशेष. आता या परदेशी श्रावणाची मज्जा सोशल मीडियावर अगदी डिसेंबपर्यंत टिकून राहील यात काडीमात्र शंका नाही.