वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित ऋतू म्हणजेच हिवाळा सुरू आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये वर्षातून अधिक काळ उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो, ज्यामुळे हिवाळ्यातील थंडावा या उष्णतेपासून मोठया प्रमाणात आराम देतो. पण, हिवाळा देखील प्रत्येकाला सुखदायक अनुभव देईल असे नाही. या ऋतूमध्ये देखील विविध दाहक आजार पसरतात किंवा हार्ट फेल्युरसारखे आजार अधिक बिकट होतात.
हिवाळ्यामध्ये कमी होणा-या तापमानामुळे हृदयावर अधिक ताण पडू शकतो, खासकरून हार्ट फेल्युरने पीडित लोकांना याचा अधिक धोका असतो. कारण हृदयाने शरीराला पुरेशा प्रमाणात रक्त व ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी अधिक काम करण्याची गरज असते. त्यामुळेच हिवाळ्यादरम्यान हार्ट फेल्युरने पीडित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचे प्रमाण वाढत असते. म्हणूनच हृदयाचे आरोग्य व योग्य ती काळजी घेण्यासाठी संभाव्य धोक्यांबाबत माहीत असणे महत्त्वाचे आहे.
हिवाळ्यात हृदयाची काळजी कशी घ्याल?
आरोग्यदायी आहार सेवन करा
आरोग्यदायी व संतुलित आहारामुळे रोगप्रतिकारकशक्ती कायम राखण्यामध्ये मदत होते. आहारामध्ये ताजे गरमागरम पदार्थ आणि चहा,कॉफी यांसारख्या पेयांसोबतच उच्च-फायबरयुक्त पदार्थाचा समावेश करा. यामुळे तुम्हाला पौष्टिक मूल्य मिळेल आणि हृदयाला हिवाळ्यासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त ऊर्जा मिळेल.
उबदार रहा
थंड किंवा उच्च-दाब असलेल्या वातावरणामध्ये गेल्याने हार्ट फेल्युरने पीडित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागू शकते. थंड वातावरणामुळे रक्तामध्ये देखील बदल होऊ शकतात. ज्यामुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका वाढू शकतो. ज्यामुळे हृदयाघात किंवा स्ट्रोकचा धोका वाढून हार्ट फेल्युर होऊ शकते. म्हणूनच हिवाळ्यादरम्यान ऊबदार राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
हिवाळ्यातील आजारांपासून संरक्षण
हिवाळ्यामध्ये धुके व प्रदूषके जमिनीच्या जवळ असतात, ज्यामुळे छातीचे आजार, श्वास घेण्यामध्ये त्रास होणे आणि ताप यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. यापैकी एखादा आजार झाल्यास श्वास घेण्यामध्ये खूपच त्रास होऊ शकतो. हार्ट फेल्युरने पीडित रुग्णांना श्वास घेण्यामध्ये त्रास होतोच आणि कोणत्याही प्रकारचा व्हायरल फिव्हर किंवा तापामुळे श्वास घेण्यामध्ये त्रास होऊन रुग्णाची स्थिती अधिक खालावू शकते.
रक्तदाबावर सतत लक्ष ठेवा
हिवाळ्यादरम्यान थंड वातावरणाचा सिम्पथॅटिक मज्जासंस्थेचे कार्य आणि हार्मोन कॅटेक्लोमाइनचे उत्सर्जन अशा शरीराच्या कार्यावर परिणाम होतो. यामुळे हृदयाचे ठोके वाढून रक्तदाब वाढू शकतो आणि रक्तवाहिन्यांचा प्रतिसाद कमी होऊ शकतो, ज्यामुळे हृदयाचे कार्य वाढू शकते. तसेच अशा स्थितीमुळे हार्ट फेल्युरने पीडित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागू शकते. मिठाचे सेवन कमी करत योग्य रक्तदाब ठेवा आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवा.
सूर्यप्रकाशात उभे राहा
सूर्यप्रकाशातील जीवनसत्त्व म्हणजेच जीवनसत्त्व ड हृदयामधील उती कडक होण्यापासून प्रतिबंध करते. या उती हृदयाघातानंतर हार्ट फेल्युरपासून हृदयाचे संरक्षण करतात. हिवाळ्यामध्ये पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे जीवनसत्त्व ड कमी प्रमाणात मिळते, ज्यामुळे हार्ट फेल्युरचा धोका वाढतो. म्हणूनच हृदयाच्या संरक्षणासाठी पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व ड मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सूर्यप्रकाशात उभे राहण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी ते दुपारी या कालावधीदरम्यान यूव्हीबी किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते.