डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत
जगभरात कोरोना व्हायरस जितक्या वेगाने पसरला, तितक्याच वेगाने त्याबद्दलचे गैरसमजही पसरले. इंटरनेट आणि सोशल मिडीयामुळे अनेक दिशाभूल करणारे सल्ले तळागाळात पोहोचले. यातले अनेक सल्ले आहार आणि जीवनशैलीबाबत होते. अमुक खाऊन कोरोनाला पळवून लावता येईल, तमुक टाळून कोरोनापासून संरक्षण मिळेल, हे सप्लीमेंट घेऊन प्रतिकारशक्ती वाढवता येईल आणि तो काढा घेऊन कोरोना मरून जाईल असे सल्ले छातीठोकपणे देणारे स्वयंघोषित तज्ञ घराघरात दिसू लागले. अशा सल्ल्यांमागे वहावत जाऊन आपला वेळ आणि कष्ट वाया घालवू नका! त्यापेक्षा कोरोना व्हायरस आणि आहाराबाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यामागील वैज्ञानिक वस्तुस्थिती समजून घ्या.
1. कोरोना व्हायरस अन्नाद्वारे संक्रमित होऊ शकतो का?
नाही. असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. कोरोनाला वाढण्यासाठी होस्ट (मनुष्य किंवा प्राणी) यांची आवश्यकता असते. तो अन्नात वाढू शकत नाही.
2. अंडी, मासे, कोंबडी किंवा इतर मांसाहारातून कोरोना पसरु शकतो का?
कोरोनाचा प्रसार प्राण्यांपासून (विशेषत: खवले मांजर, वटवाघूळ अशा वन्य प्राण्यांपासून) झाला असण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. परंतु नेमका स्रोत माहित नाही. अंडी, चिकन, मासे व्यवस्थित धुवून (विशेषतः गरम पाण्याने धुवून) त्यानंतर पुरेसे शिजवल्यास त्यातील सर्व प्रकारचे विषाणू नष्ट होतात. त्यामुळे हे पदार्थ चांगले शिजवून खायला काहीच हरकत नाही. या पदार्थांमध्ये उच्च दर्जाची प्रथिने असतात जी तुमची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी मदत करू शकतात.
3. आईसक्रीममधून कोरोना पसरतो का?
नाही. आईस्क्रीममध्ये हा विषाणू नसतो. पण जंतुसंसर्ग झाला असताना, घसा दुखत असताना किंवा खोकला झाला असताना आईसक्रीम खाणे टाळावे.
4. किटो डाएट घेतल्याने मी कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहू शकतो का?
नाही. किटो डाएटमुळे कोरोनापासून संरक्षण मिळते असा कोणताही पुरावा नाही.
5. सारखे गरम पाणी पित राहिल्याने किंवा गरम पाण्याच्या गुळण्या करत राहिल्याने कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर रहाता येईल का?
पुरेसे पाणी पिणे हे जरी शरीरासाठी चांगले असले तरी वारंवार गरम पाणी पिऊन अथवा गुळण्या करून कोरोना संसर्गापासून दूर रहाता येईल हा समज चुकीचा आहे.
6. लसूण खाल्ल्याने कोरोनाचे विषाणू मरतात का?
लसूण खाणे हे जरी तब्येतीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगले असले तरी लसूण खाल्ल्याने कोरोनाचे विषाणू मरू शकत नाहीत किंवा त्याच्या संसर्गापासून कोणतेही संरक्षण मिळत नाही.
7. एखादा विशिष्ट अन्नपदार्थ प्रतिकारशक्ती वाढवू शकतो का किंवा कोरोना व्हायरसची लागण होण्यापासून रोखू शकतो का?
नाही, असा कोणताही जादूई खाद्यपदार्थ अस्तित्वात नाही! निरोगी जीवनशैली (नियमित व्यायाम, सकस आहार, पुरेशी विश्रांती) रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवते.
मग काय करावे?
आहार- आहारात वैविध्य ठेवणे, विविध रंगाच्या भाज्या व फळे खाणे, पुरेशी प्रथिने घेणे हे महत्वाचे आहे. माणसाच्या शरीरातील एकूण पेशींपैकी निम्म्यापेक्षा जास्त पेशी शरीरात वसाहती करणार्या सूक्ष्मजीवांच्या असतात. यातील उपयुक्त सूक्ष्मजीव आपली रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यास मदत करत असतात. या सूक्ष्मजीवांचे खाद्य म्हणजे आहारातील तंतूमय पदार्थ, डाळी-कडधान्ये आणि आंबवलेले पदार्थ. त्यामुळे अशा पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करावा.
व्यायाम – व्यायाम शरीरातील रक्ताभिसरण वाढवून पांढर्या रक्तपेशींना कामाला लावतो. त्यामुळे आठवड्यातून मिनीटे मध्यम तीव्रतेचा किंवा मिनीटे जास्त तीव्रतेचा व्यायाम चांगल्या प्रतिकारशक्तीसाठी गरजेचा आहे.
झोप आणि मानसिक स्वास्थ्य – योग्य आहार आणि नियमित व्यायाम याबरोबरच पुरेशी झोप आणि विश्रांती देखील महत्वाची आहे. ताणतणाव आपली प्रतिकारशक्ती कमी करतात. थकलेले आणि तणावाखाली असलेले शरीर जंतुसंसर्गाला लवकर बळी पडते.
थोडक्यात, उत्तम जीवनशैली आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवते. पण एका ठराविक मर्यादेपलिकडे प्रतिकारशक्ती वाढवणे शक्य नसते. त्यामुळेच उत्तम प्रतिकारशक्ती आणि ठणठणीत तब्येत असणार्यांना करोनाचा संसर्ग होणारच नाही असे सांगता येत नाही. पण संसर्ग झाल्यास त्यातून लवकर बाहेर पडण्यास प्रतिकारशक्ती मदत करते. वृद्ध, आजारी व कुपोषित व्यक्ती कोरोनाच्या संसर्गाला लवकर बळी पडतात आणि त्यांच्यात जंतुसंसर्गाचे दुष्परिणाम जास्त दिसून येतात ते त्यांच्या कमी झालेल्या प्रतिकारशक्तीमुळेच.