तुम्हाला मधुमेह असेल आणि त्यावर योग्य नियंत्रण नसेल, तर त्यामुळे तुमच्या नसा आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊ शकतो. मधुमेहींना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागणे आणि काही वेळा पाय कापण्याची शस्त्रक्रिया करावी लागणे, यामागे पायाचा अल्सर हे मुख्य कारण आहे. पेरीफेरल न्युरोपथीमुळे (चेताविकारामुळे) वेदना जाणवण्याची रुग्णाची क्षमता कमी होते. त्यामुळे छोटया-छोटया जखमा बराच काळ दुर्लक्षित राहतात.
दीर्घकाळापासून मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये डायबेटिक फूड अल्सर होण्याची धोका असतो. मधुमेहामुळे होणारे रक्तवाहिन्यांचे नुकसान आणि कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती यामुळे जखमा भरून निघणे काहीसे कठीण होते. हा आजार सुरुवातीच्या टप्प्यावरच लक्षात यावा यासाठी पायाची सखोल चाचणी करणे आवश्यक आहे. पेरीफेरल न्युरोपथी आणि पेरीफेरल आर्टेरिअल आजाराची (धमन्यांचा आजार) चाचणी केल्यास रुग्णाला फूट अल्सरचा धोका आहे का, हे जाणून घेता येऊ शकते.
अशी अनेक धोकादायक कारणे आहेत, ज्यामुळे मधुमेही रुग्णांमध्ये पायाच्या समस्या आणि पाय आणि पावलांमध्ये मधुमेहासंदर्भातील संसर्ग होण्याची शक्यता असते. पादत्राणे नीट न बसणे, चालताना किंवा शरीराचे संतुलन साधताना पाय आणि बोटांची स्थिती न जाणवणे, छोटया जखमा (कापणे, खरचटणे, फोड) न जाणवणे, पायाची सर्वसाधारण झीज (यातून भोवरी आणि पायाला घट्टे पडण्याचा त्रास होऊ शकतो.) आणि पायात उसण भरणे अशा त्रासांचा यात समावेश आहे. पायाला होणा-या या प्रकारच्या दुखापतीमुळे अल्सर आणि संसर्ग होऊ शकतो. अधिक गंभीर त्रासांमध्ये पाय कापावा लागतो. रक्तवाहिन्यांना इजा झाल्यासही तुमच्या पायाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. अशा परिस्थितीत पायाला दुखापत झाली किंवा संसर्ग झाला, तर पाय बरा होणं काहीसं कठीण होतं.
योग्य ग्लायकेमिक नियंत्रण, पायाची नियमित चाचणी, योग्य पादत्राणे, रुग्णाला यासंदर्भात शिक्षित करणे यातून डायबिटीक फूटचा त्रास टाळता येऊ शकतो. मधुमेही रुग्णांनी स्वत:च्या पायाची तपासणी कशी करावी. डायबेटिक फूट सुरुवातीच्या टप्प्यावर दिसणारी चिन्हे, लक्षणे कशी ओळखावीत. त्यांनी दररोज आणि सर्व प्रकारच्या दुखापतींनंतर पाय नीट तपासावा. कितीही किरकोळ दुखापत असली ते टाळू नये. कोणत्याही प्रकारची असामान्यता जाणवल्यास डॉक्टरांना भेटावे. सुती किंवा लोकरीचे सॉक्स घालावेत. इलास्टिक असलेले आणि होजिअरी कापडाचे सॉक्स वापरू नयेत.
त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो. सुरक्षित क्लिपरनेच नखे कापा, त्यासाठी कात्री वापरू नका. एका झटक्यात नख कापा. नखांना लागून असलेल्या त्वचेपासून काही अंतर सोडा. अगदी शेवटपर्यंत नखं कापू नका. तुमच्या पायांचे संरक्षण करू शकतील अशी मजबूत आणि आरामदायी अशी पादत्राणे वापरा. पादत्राणे पायांना व्यवस्थित बसतात, याची खात्री करा. कोरडया त्वचेसाठी तेल किंवा क्रीम वापरा. पण, बोटांमध्ये क्रीम लावू नका. कोणत्याही प्रकारचे रासायनिक द्रव्य किंवा प्लास्टर वापरून घट्टे आणि भोवरी काढू नका. ही प्रक्रिया घरगुती स्वरूपावर न करता प्रशिक्षित तज्ज्ञांकडून करून घ्यावी. पायाला होणारा कोणताही त्रास, अस्वस्थता याबद्दल डॉक्टरांशी बोलून त्यात काही गंभीर समस्या नाही, याची खात्री करून घ्या. कारण, संसर्ग झालेल्या अल्सरवर वेळीच उपचार न केल्यास पाय कापावा लागतो.