आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्याला नेहमीच्या वापरातील फळे -फळभाज्या, पालेभाज्या, वनौषधींच्या रसाचा चांगलाच उपयोग होतो. फक्त अशा उपयुक्त रसांची आपल्याला माहिती असणे आवश्यक असते. त्यात कोणते घटक आणि जीवनसत्वे असतात आणि ते आरोग्याला कसे पूरक ठरतात हे समजावून घेऊन त्यांचा आपल्या आहारात जर समावेश केला तर आपण कायमच निरोगी राहू आणि जगण्यातला खरा आनंद उपभोगू शकू. आपण उष्ण कटिबंधात राहतो.
त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आपणास शुद्धपाणी व ताज्या फळभाज्या, पालेभाज्या व फळांच्या रसाची गरज असते. जगण्यासाठी कर्बोदके, प्रोटीन्स, चरबी क्षार व जीवनसत्त्वे आवश्यक असतात. तसेच रक्तातील आम्लाचे प्रमाण 20 टक्के व क्षारांचे प्रमाण 80 टक्के असणे आवश्यक असते.
हे सर्व आपणास ताजी फळे, फळभाज्या, पालेभाज्या, वनौषधी यातून मिळते. विशेषतः त्यांच्या रसाचा विशेष परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. रसाहारामुळे तंतूमय पदार्थांची प्राप्ती होऊन बद्धकोष्ठता नष्ट होते व त्याच्याशी संबंधित विकारही बरे होतात हा रसाहाराचा फायदा आहे.
कर्बोदके, प्रथिने, चरबी यांची कितीही प्राप्ती झाली तर जीवनसत्वे व मिनरल्स यांच्या शिवाय मनुष्य निरोगी राहू शकत नाही. मानसिक ताण, प्रदूषण व गतिमय जीवनामुळे माणसाची जीवसत्वे व मिनरल्स यांची गरज खूपच वाढली असून याची पूर्तता रसाहाराने शक्य आहे. जीवनसत्वे मिनरल्स यांची नैसर्गिक आहारातून प्राप्ती झाली तरच शरीर त्याचा योग्य वापर करू शकते. कारण सूर्यप्रकाशात वाढलेल्या भाज्या, फळात जैविकशक्ती असते. नैसर्गिक भाजीच्या/फळाच्या रसातील क्षार कालॉइड स्वरूपात असल्याने शरीर त्वरित त्याचा उपयोग करून घेते.
आपण सर्व भाज्या शिजवून, त्यात मीठ, मसाले घालून खातो. भाज्या शिजवल्याने त्यातील अनेक बहुमोल घटकांचा नाश होतो व शरीराला ते मिळतच नाहीत. यासाठीच नियमितपणे रसपानही आवश्यक आहे. चहा, कॉफी, कोला ह्या पेयांनी आजच्या आधुनिक जगाला झपाटले आहे. पण यातील कॅफिन या उत्तेजक द्रव्यांमुळे हृदयविकार व निद्रानाश हे विकार वेगाने वाढत असून ज्यांना या पदार्थांचे व्यसन आहे, त्यांच्यासाठी रसाहार आवश्यक आहे.
रसाहारामुळे रक्त अल्कधर्मीय बनते. परिणामी लिव्हर, मूत्रपिंड, आतडे, त्वचा यांचे कार्य सुधारून शरीरात साठलेला कचरा वेगाने बाहेर फेकला जातो व शरीर व्याधीमुक्त रहाते. शरीरस्वास्थ्यासाठी जीवनसत्वे, मिनरल्स यांच्याप्रमाणेच एन्झाइम्सची नितांत गरज असते. प्रौढपणी शरीरातील एन्झाइम्सचे प्रमाण कमी होत जाते. वाढत्या वयात एन्झाइम प्राप्तीसाठी रसाहाराशिवाय दुसरा पर्याय नाही.
आपले शरीर हे एक चमत्कार असून शरीरात सुमारे 60 हजार कोटी पेशी आहेत. शरीरात अनेक रासायनिक क्रिया घडत असतात. केवळ यकृत 3000 प्रकारची रासायनिक द्रव्ये निर्माण करत असते. फळे व भाज्यातील अनेक घटक या रासायनिक क्रियेला मदत करत असतात. नियमित रसाहार करणाऱ्यांचे लैगिंक आरोग्य शेवटपर्यंत चांगले राहाते. कोलेस्टरॉलरूपी चरबीस लैंगिक
हर्मोन्समध्ये बदलणारे जीवनसत्व ए, लैंगिक हर्मोन्स निर्मिती सहाय्यभूत ठरणारे बी जीवनसत्व, नपुंसकता नष्ट करणारे जीवनसत्व ई, कामशक्ती दीर्घकाळपर्यत टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरलेले झिंक हे घटक रसाहारामुळे निश्चितपणे प्राप्त होत असतात.
प्रत्येकाने करावे रसपान !
कुठलाही रस काढल्यानंतर तो त्वरित प्यावा.
रसाहारापूर्वी व नंतर अर्धातास काही खाऊ नये.
कुठलाही रस घोट घोट घेत प्यावा एकदम घटाघटा पिऊ नये.
व्हिटॅमिन्स/मिनरल्स याची गरज आयुष्यभर असते यासाठी रसाहार नियमितपणे करावा.
आपल्याला आजारात विशेष करून उपयोगी होईल व आपल्या प्रकृतीस मानवेल अशाच ज्यूसची तज्ज्ञाच्या सल्ल्याने प्राधान्याने निवड करावी.शक्य असल्यास ताज्या भाज्या व फळे याची निवड करावी. यात रासायनिक औषधांचा अंश नसतो.
रस काढण्यापूर्वी भाजी/फळ व्यवस्थित धुवून घ्यावे.
अशा रसात चवीसाठी साखर अगर इतर कुठलीही वस्तू टाकू नये.
भाजीचा रस व फळांचा रस एकावेळी घेऊ नये.रसाहारामुळे शरीरातील विषारीद्रव्ये बाहेर टाकली जातात. यामुळे कधी उलटी होणे जुलाब होणे अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे उद्भवल्यास घाबरू नये ही लक्षणे आपोआप कमी होतात. कुठल्याही एका रसात सर्व व्हिटॅमिन्स व जीवनसत्वे नसतात यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रसाचे सेवन करावे.
काही भाज्याच्या रसात चवीसाठी लिंबू/मध याचा वापर करावा.
अशा रीतीने भाज्या, फळे व पालेभाज्यांचा रसाहारमहत्वाचा.
1) फळांचा रस घेताना सकाळपासून दुपारपर्यंत घ्यावा.
2) भाज्यांचा रस घेताना दुपारपासून सायंकाळ पर्यंत अथवा रात्रीपर्यंत घ्यावा.
3) फळ व भाज्यांचे रस शरीरास उपयुक्त परंतु दोन्ही रस घेताना तीन ते चार तासांचे अंतर असावे.
4) रस ताजा असावा. म्हणजेच हवेतील प्राणवायूशी रसाचा संबंध येऊ देऊ नये आणि तो जर आला तर मुख्यत: ए व्हिटॅमिन नाहिसे होते.
5) रस काढण्याकरिता भाज्या पूर्ण वाढलेल्या व फळे पूर्ण पिकलेली घ्यावीत.
6) ज्या भाज्या व फळे नैसर्गिक खतावर वाढलेल्या असतात त्यांचाच रस आरोग्यस उपयुक्त.
7) हळूहळू तोंडात घोळवून प्यायलेला रस पचनास हलका ठरतो.
रसांचे गुणधर्म आणि विकारांवर त्याची उपयुक्तता
1) काकडीचा रस : थंड, मधुर, उष्मांक म्हणजेच कॅलरीज कमी असल्याने पाचकयुक्त ठरतो. भूक उद्दिपित करतो. संधिवातावर आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
2) कोबीचा रस : यात अ आणि क जीवनसत्वे असतात. त्यामुळे सर्दी, कफ, अल्सर, अपचन, रक्तक्षय, दृष्टीदोष, स्थूलत्व व संधिवातावर अतिशय उपयुक्त आहे. कोबीचा रस हा रक्त शुद्ध करतो आणि हृदयाची बळकटी वाढवितो.
3) गाजराचा रस : गाजरामध्ये अ,ब जीवनसत्वे असतात. कॅल्शियम, इन्शुलिन असल्यामुळे अल्सर आणि कॅन्सर रोखण्यासाठी गाजराचा रस अतिशय उपयुक्त आहे. मधुमेहींना गाजराचा रस दिल्यामुळे शर्करा नियंत्रण होते. पचन क्रियेस मदत होते हिरड्यांची व डोळ्यांची ताकद वाढते.
4) पालक रस : या रसात अ आणि क जीवनसत्वे भरपूर असतात. पालकामध्ये खनिजद्रव्येही असतात. ऑबझॅनिक ऍसिडचे क्षार पालक रसात जास्त असतात त्यामुळे आंत्रलहरींची गती वाढते. मूत्रनिर्मिती व मूत्र उत्सर्जनास हा रस उपयुक्तत्यामुळे मूत्रविकार नाहीसे होतात. खनिजामुळे आम्लता कमी होते. स्त्रियांच्या मासिक पाळीवर उपयुक्त.
5) टोमॅटो रस : टोमॅटो रसात अ जीवनसत्वे भरपूर असतात आणि लोहक्षार भरपूर असतात. रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यास टोमॅटो रस अतिशय उपयुक्त आहे. स्थूलता कमी करण्यासाठी, भूक वाढविण्यासाठी, वात व कफ विकारात आणि दृष्टी व यकृत दोष निवारणासाठी तसेच आतड्यांची स्वच्छता व पचनांच्या तक्रारीवर टोमॅटो रस गुणकारी आहे.
6) कारल्याचा रस : कारल्यामध्ये अ, ब जीवनसत्व व लोह असल्यामुळे कारल्याचा रसे हे अनेक रोगांवर वरदान ठरले आहे. कारले रसामुळे रक्तशुद्धी होते. मूतखडा विरघळण्यास मदत होते. मधुमेहींची शर्करा नियंत्रित होते. मूत्रपिंडाचे विकार बरे होतात. संधिवात आटोक्यात येतो. आतड्यांची स्वच्छता होते. काविळीत कारल्याचा रस अवश्य प्यावा.
7) लिंबू रस : लिंबू रसात क जीवनसत्व व लोह असते त्यामुळे शरीरशुद्धी होते. लिंबूरसात आम्लता अधिक असल्यामुळे चांगली भूक लागते. हा रस कफहारक आहे. पचन तक्रारी दूर करतो. घशाचे विकार दूर करतो. आम्लपित्तात उपयुक्त. संधिवात झालेल्यांनी लिंबूरस अवश्य प्यावा. मलेरिया, टायफाईड, सर्दी, फ्ल्यू या विकांरामध्ये लिंबूरस शक्ती देते. रक्तवाहिन्यांना मजबूती देणारा एकच रस आहे तो म्हणजे लिंबू रस.
8) सफरचंदाचा रस : सफरचंदामध्ये ब जीवनसत्व असते व लोहक्षार असतात. अपचन, डोकेदुखी, मूतखडा, आम्लपित्त, आतड्याच्या व ओटीपोटाच्या तक्रारींवर सफरचंद उपयुक्त आहे. मज्जासंस्थेची शक्ती वाढविणारा एकमेव रस आहे सफरचंदाचा रस. दमेकऱ्यांनी तर हा रस अवश्य प्यावा.
9) अननसाचा रस : या रसामध्ये ब जीवनसत्व अधिक असते. क्लोरिन असल्यामुळे रक्तशुद्धी आणि आतड्यांमधील जंतूंचा नाश होतो. हृदयाचे कार्य नीट चालण्यासाठी व मूत्रपिंडाचे कार्य योग्य प्रकारे होण्यासाठी उपयुक्त आहे.
थोडक्यात, नैसर्गिक पेय ही कशी उपयुक्त व शरीर स्वास्थ्य राखणारी आहेत हे आता तुमच्या लक्षात आले असेलच. तेव्हा प्रत्येकाने नैसर्गिक पेयांना म्हणजेच रसाहाराला स्थान द्यावे.
फळांचा रस नित्य सेवन करा अन रोगमुक्त व्हा!
प्रत्येक ऋतुमानानुसार बाजारात फळं येत असतात. प्रत्येक फळाचा आस्वाद आपण घेतला पाहिजे. सिझनचे प्रत्येक फळ हे मानवी शरीरास आवश्यक असते. फळांमधून नैसर्गिकरित्या साखर मिळते. ज्याची बाधा अगदी मधुमेहींनासुद्धा होत नाही. फळ शरीरास उर्जा प्रदान करते. अशा विविध फळांचे रस आपल्या आहारात आपण समाविष्ट केले पाहिजेत. रोज एखाद्यातरी फळाचा रस घ्यावा जो रोगप्रतिकारकशक्ती वाढवतो. आपल्या शरीराची एम्युनिटी राखतो. आता आपण एकेक करून प्रत्येक फळाचे महत्व जाणूया. आपल्या देशात अनेक चवींची, अनेक प्रकारची फळे रास्त भावात उपलब्ध असतात त्याचा फायदा आपण आपली सदृढ प्रकृती राखण्यासाठी घेतला पाहिजे.
सुदृढ हृदयासाठी आवळा रस
आवळ्याचे फळ हिरवट, पिवळे व बाहेरून उभ्या रेषा असणारे असे असते. आवळ्याचा विशिष्ट मौसम असतो. ह्या फळात जितकी रोगनिवारक शक्ती आहे तितकी अन्य कोणत्याच फळात नाही. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले जीवनसत्त्व “सी’ आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. कांती सतेज होण्यासाठी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. च्यवनप्राशावलेहामधे आवळ्याचे प्रमाण जास्त असते.
गुणधर्म ः आवळ्यामध्ये “सी’ जीवनसत्व भरपूर असते त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आवळ्याची खूप मदत होते. आवळ्याचा स्वाद कडवट, तिखट, आंबट, तुरट आणि मधुर असतो. आवळा हा केशवर्धक, धातुवर्धक, दृष्टी सतेज करणारे, बलवर्धक, रक्तशोधक व त्रिदोषनाशक आहे. आवळा हा कोणत्याही तूत पथ्यकारक व आरोग्यवर्धक असतो.
घटक ः आवळ्यामध्ये गॅलिक ऍसिड असते. आवळ्यामध्ये असणारे “सी’ जीवनसत्व फार काळ टिकते. उलट आवळे सावलीत सुकवले की त्यातील “सी’ जीवनसत्त्व वाढते. 100 ग्रॅम सुकवलेल्या आवळ्यात 2400 ते 2600 मि. ग्रॅम “सी’ जीवनसत्त्व असते. आपणास रोज 75 मि. ग्रॅम. “सी’ जीवनसत्वाची आवश्यकता असते. अगदी थोड्या आवळ्यातून माणसाची ही गरज पूर्ण होते.
– सुजाता टिकेकर