पुणे – हल्ली आपण बघतोय की नवीन पालकांमध्ये मुलांचा दातांबद्दल बऱ्याच शंका असतात. बऱ्याचदा लहान मुलांचे दात किंवा दुखतात घाबरून जातात. बऱ्याचदा दातांची रचना वेडी वाकडी असते. अशी बरीच कारण असतात जी पालकांसमोर बरेच उभे करतात. आज आपण अशाच काही समस्या बघणार आहोत.
माणसांमध्ये दातांचे दोन सेट असतात. दुधाचे दात आणि कायम स्वरूपी दात यायला सहाव्या महिन्यात सुरवात होते. समोरचे दात येतात व नंतर मागचे दात. अडीच ते तीन वर्षापर्यंत सगळे दुधाचे दात येतात. दुधाच्या दातांमध्ये जागा/अंतर असणे नॉर्मल असते. मुलांचा तोंडामध्ये 20 दुधाचे दात असतात. सहाव्या वर्षांपासून तोंडात कायमस्वरूपी दात यायला सुरवात होते.
तोंडात दात नसताना एखाद्या रुमालाने किंवा मुलायम कपड्याने बाळाचे तोंड आतून पुसून घ्यावे. असे दिवसातून 2 ते 3 वेळा करावे. पहिल्या दाताचे टोक दिसले कि बोटात अडकवायचे ब्रशने तो दात घासायला सुरवात करावी. दात येतांना मुलं सगळ्या वस्तू तोंडात घालतात. या वस्तू खराब असल्या की, त्यांचे पोट बिघडते व ते आजारी पडू शकतात. मुलांची चावायची खेळणी वेळोवेळी व्यवस्थित धुवावीत व स्वच्छ ठेवावीत.. अंगठा चोखायची सवय लागत असल्यास ती लगेच थांबवावी.
बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज आहे की, त्रास झाल्याशिवाय डेंटिस्टकडे जायची गरज नसते. परंतु, त्रास होऊ नये म्हणून दर सहा महिन्यातून एकदा दात तपासून घ्यावेत. शक्यतो बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या जवळ बाळाला पहिल्यांदा डेंटिस्टकडे न्यावे. अशाने पालकांना लहान मुलांचा दातांची काळजी घेण्यासाठी काय करावे लागते, हे समजते. प्रत्येक मूल वेगळे असते. त्यांचं डाएट आणि सवयींप्रमाणे दात कसे स्वच्छ करावेत हे जितक्या लवकर कळेल तितके चांगले.
तोंडामध्ये दात आला की तो किडण्याची शक्यता 100% असते. पहिल्या दाताचा टोक तोंडात दिसला की तो घासला जायला पाहिजे. मग बाळाचे वय कितीही असू देत. हल्लीचे खाद्यपदार्थ खूप गोड व चिकट असतात. म्हणून मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण खूप जास्त झाले आहे. वयाच्या तीन ते चार वर्षात काही मुलांचे दात किडल्यामुळे ते काढावे लागतात किंवा रूट कॅनॉलला जातात. असा होऊ नये म्हणून गोड व चिकट पदार्थ बाळाला देऊ नयेत. गोड़ पदार्थानी मुलं चिडचिडी पण होतात. म्हणून मुलांना जितके कमी गोड़ द्याल तितके तब्येतीला आणि दातांना चांगला.
रात्री दुधाची बाटली तोंडात ठेऊन मुलांना झोपवू नये. दररोज झोपण्यापूर्वी दात घासलेच पाहिजेत. ज्या मुलांना थुंकायची समाज नसते त्यांनी टूथपेस्ट वापरू नये. फक्त ब्रशने त्यांचे दात घासावेत. थुंकायची समज आली की 10 वर्षापर्यंत लहान मुलांच्या टूथपेस्टचा वापर करावा.
11 व्या वर्षांपासून मोठ्यांची टूथपेस्ट कमी प्रमाणात वापरू शकता. दिवसातून 2 वेळा दात घासावेत. थोडक्यात गोड़ व चिकट पदार्थांवर नियंत्रण, सोडा असलेल्या पेय पदार्थ ना देणे, परिपुर्ण आहार घेणे, दिवसातून 2 वेळा दात घासने आणि दर 6 महिन्यांनी एकदा दात तपासून घेणं हे दातांची काळजी घेण्याचे उत्तम उपाय आहेत.
लहान मुलांमध्ये बऱ्याच ट्रीटमेंट्स होऊ शकतात. सर्व दुधाच्या दातांच्या ट्रीटमेंट्सचा हेतू ते दात वाचवणं व चावण्याची क्रिया व्यवस्थित चालू ठेवणं, असा असतो. दात किडू नयेत म्हणून काही उपचार केले जातात. त्यांना प्रेव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्स असं म्हणतात. दाताला तरिही काही त्रास झाल्यास डेंटिस्ट आवश्यक ते टेस्ट करतील व योग्य ट्रीटमेंट सुचवतील.
लहान मुलांचे उपचारांचे विज्ञान खूप आधुनिक झाले आहे. मुलांचे दात वाचवणं त्यांचा तब्येतीसाठी आणि योग्य वाढीसाठी महत्वाचे आहे. मुलांची वाढ होत असताना जबड्यात खूप बदल होत असतात. दातांमध्ये फटी असणं किंवा रचना नीट नसणं स्वाभाविक आहे. बऱ्याचदा वयाच्या 12 ते 13 व्या वर्षी सगळे दुधाचे दात पडून कायमस्वरूपी दात आले की दातांची रचना आपोआप व्यवस्थित होते.
नाही झाली तर दातांना तारा लावून ते सरळ करून घ्यावेत. पुष्कळ वेळा दुधाचे सगळे दात पडायच्या आधी दात वाकडे येऊ नयेत म्हणून काही उपचार करता येतात. म्हणून वर्षातून दोन वेळा डेंटिस्टकडे जाणे महत्वाचे असते. दुधाचे दात हे जरी पडून जाणारे असले तरी ते महत्वाचे असतात.
त्यांचे पुष्कळ फायदे असतात. जसे की मुलांना चावायला मदत करणे, चेहऱ्याला व्यवस्थित आकार देणे, कायमस्वरूपी दातांची जागा जपून ठेवणे, अन्न नीट चावल्या मुळे तब्येत व्यवस्थित ठेवणे, सुरवातीपासून काळजी घेतली तर नंतरचा त्रास वाचतो. लक्षात ठेवा दातांचे 2 सेट देव विनामूल्य देतो. तिसऱ्या सेटचे पैसे भरावे लागतात!