सुंदर, तकाकी त्वचा असावी, असे सगळ्यांना वाटते. त्वचा चांगली राहण्यासाठी तिची काळजीही तितकीच घेतली पाहिजे. यासाठी आपली त्वचा कशी आहे व त्वचेचे विविध आजार कोणते असू शकतात, याविषयी जाणून घेतले पाहिजे.
“पी हळद आणि हो गोरी’ असे जीवनात घडत नसते. त्वचा सुंदर, चांगली दिसण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न केवळ वरवरचे असून चालत नाहीत. त्यासाठी मुळात आपले आरोग्य चांगले ठेवले पाहिजे. समतोल आहार, उत्तम प्रकृती, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती ही चांगल्या आरोग्याची गुरूकिल्ली आहे. तीच त्वचेसाठीही लागू होते. या गोष्टी व्यवस्थित नसतील आणि वरून खूपसे उपाय केले तरी त्वचा चांगली होणार नाही.
त्वचेचे प्रकार
प्रत्येक माणसाची तब्येत, आरोग्य वेगवेगळे असते. तसेच त्याची त्वचा ही वेगवेगळ्या प्रकारची असते. त्वचेमध्ये मुख्यतः तेलकट, कोरडी, मध्यम त्वचा असे तीन प्रकार दिसतात. हे प्रकार वेगवेगळे असल्याने त्याची काळजीही वेगवेगळ्या प्रकारे घेतली पाहिजे. परत ऋतूनुसारही त्वचेची काळजी वेगळ्या प्रकारे घ्यावी लागते. आपल्या त्वचेवर केस असतात. त्याच्या मुळाशी तैलग्रंथी असतात. व्यक्ती वयात आल्यावर संप्रेरकांच्या प्रभावामुळे त्यातून सिबम नावाचा तेलासारखा पदार्थ तयार होतो व त्वचेवर पाझरतो. आपली त्वचा मऊ राहण्यासाठी तो अत्यंत आवश्यक असतो.
ज्यांच्यामध्ये सिबम जास्त असते, त्यांची त्वचा तेलकट असते. आपल्याला घाम आल्यावर सिबम आजूबाजूला पसरते. त्यामुळेच उन्हाळ्यात किंवा दमट हवेत गेल्यावर त्वचा जास्त तेलकट दिसते. काहींचा पूर्ण चेहरा तेलकट असतो. तर, काहींच्या कपाळ, नाक हा भाग तेलकट असतो. तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तीला तारुण्यपिटीकांचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. अशा व्यक्तींनी वारंवार चेहरा धुतला पाहिजे. स्वच्छ ठेवला पाहिजे. कोरडी त्वचा असलेल्यांना सिबम हे अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे त्वचा मुलायम राहते. अशा लोकांनी त्वचेतील सिबम टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशा व्यक्तींनी साबणाचा वापर कमी करावा. चेहरा पाण्याने धुवून स्वच्छ ठेवावा.
घाम आवश्यक व स्वच्छताही
आपल्या शरीरातील नैसर्गिक यंत्रणा अत्यंत सक्षम आहे. त्यामध्ये कोणतीही गोष्ट वाईट नाही. अनेकांना घाम येणे हे वाईट वाटते. त्यामुळे वास येतो, ओले वाटते. पण, निसर्गाने आपल्याला थंड करण्यासाठी दिलेली ही यंत्रणा आहे. उन्हाळ्यात जेव्हा शरीराचे तापमान वाढू लागते तेव्हा घाम निर्माण करणारी यंत्रणा कार्यरत होते व शरीराचे तापमान योग्य पातळीवर राखण्याचे काम साधते. त्यामुळे घाम येणे चांगले लक्षण आहे.
पण, तो तसाच सारखा त्वचेवर राहणे मात्र चांगले नाही. तो तसाच राहिला तर बुरशीसारख्या जंतूंना पोषक वातावरण मिळते. त्यातून सुरमा, नायटा यासारख्या फंगल इन्फेक्शनना आमंत्रण मिळते. हे होऊ नये यासाठी त्वचा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे, घाम आल्यावर अंघोळ करणे, पुसणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात सुती कपडे वापरल्यावर घाम टिपला जातो. ज्यांना जास्त घाम येतो त्यांनीही सुती कपडे वापरण्यास हरकत नाही. सुती कपड्यामुळे हवा खेळती राहते. उन्हाळ्यात शरीराच्या ज्या भागात जास्त घाम येतो, तिथे पावडर वापरावी. म्हणजे जास्तीचा घाम शोषला जाईल.
काय आहे नागीण?
लहानपणी अनेकांना कांजण्या हा विकार झालेला असतो. अंगावर पाण्याने भरलेले फोड उमटतात. ताप, अंगदुखी होते. हा आजार औषधाने पूर्ण बरा होतो. पण, काहीवेळा त्याचे विषाणू पाठीच्या मणक्याच्या मज्जारज्जूमध्ये सुप्त अवस्थेमध्ये राहतात. ती व्यक्ती मध्यमवयीन झाल्यावर किंवा त्यापुढील आयुष्यात प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे मणक्याचे ऑपरेशन, केमोथेरपी आदीमध्ये उपचार करताना, सुप्त अवस्थेतील विषाणू उचल खातात व त्वचेवर फोड उमटू लागतात. त्याला नागीण म्हणतात. परंतु बऱ्याचवेळा नागीण होण्यापूर्वी यातले कोणतेही कारण आढळत नाही. नागीण होण्याआधी दुखते, ठणकते, आग होते, खाजते. काहींना प्रचंड वेदना होतात. उतारवयात दाह व पुरळाची व्याप्ती जास्त असू शकते.
नागिणीचे वैशिष्ट्य म्हणजे डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत ते कोठेही उठले तरी, शरीराच्या एकाच भागावर पुढून मागे अथवा मागून पुढे असे छोटे पाण्याने भरलेल्या फोडांच्या समूहाच्या स्वरूपात उमटत राहतात. नागिणीचे पुरळ हे शरीराच्या नसांच्या वरच्या भागात उमटतात. नसा या पाठीच्या मणक्याच्या
मज्जारज्जूतून निघून डाव्या व उजव्या बाजूला स्वतंत्रपणे जातात. नागीण एकाच नसेच्या भागात उमटते. त्यामुळे “नागीण वेढा टाकते’ ही पूर्णपणे गैरसमजूत आहे.
फोड साधारणतः 7-10 दिवस उमटत राहतात. सुरुवातीला त्यात पाणी असते. नंतर त्याचे पांढरट -पिवळ्या पूसारख्या द्रवामध्ये रूपांतर होते. नंतर खपली धरते व पडते. या काळात त्वचा फार संवदेनशील बनते. त्वचेची आग होते. नागीण हे त्वचा व आतील नस या दोन अवयवांचे दुखणे आहे. दाह तीन ते सहा महिने टिकू शकतो.
नागिणीच्या एका रुग्णापासून संपर्कातल्या दुसऱ्या व्यक्तीला नागीण होत नाही. तशा अर्थाने नागीण संसर्गजन्य आजार नाही. पण, कांजण्यांचा व नागिणीचा विषाणू एकच असल्यामुळे नागीण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात असणाऱ्यांपैकी ज्या व्यक्तींना विशेषतः लहान मुलांना कांजण्या झालेल्या नाहीत, त्यांना मात्र कांजण्या होऊ शकतात. हा संसर्ग केवळ त्वचेवरच्या फोडांमार्फतच नव्हे तर श्वासातूनही होत असल्यामुळे नागीण झालेल्या व्यक्तींनी लहान मुलाजवळ झोपणे, कडेवर घेणे टाळावे. नागीणवर विषाणूविरोधी औषधे वापरली जातात. उपचारांची सुरुवात नागीण झाल्यावर लवकरात लवकर 48 तासांच्या आत केल्यास उपयोग होतो.