पावसाळा आला की, असंख्य आजार वाढतात. उकाड्याच्या काहिलीने बेजार झालेल्याला लागलीच थंडावा निर्माण झाला की, वातावरणात बदल होऊन आजारांना निमंत्रण मिळते. तसेच पावसात सर्रास दूषित पाण्याने आजारांना निमंत्रण मिळते. दूषित पाण्याचाही पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. रोगराई पसरते.
प्रतिकारशक्ती कमी असलेल्या वृद्ध आणि बालकांना त्याचा फैलाव जलदगतीने होतो. अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ, पोलिओ यांसारखे आजार तर पाचवीलाच पूजलेले. तर हे आजार होऊ नयेत आणि आजारांवर मात करण्यासाठी कोणती उपाययोजना करावी याबाबत काही थोडेसे..
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
अतिसार : एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखे शौचास होणे.
गॅस्ट्रो : उलटी व जुलाब यामुळे शरीर कोरडे पडणे म्हणजेच गॅस्ट्रो. दूषित पाण्यामुळे या रोगाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणात होतो.
कावीळ : दूषित पाणी तसेच अन्नपदार्थांमधून पसरणारी कावीळ वर्षभर असते. मात्र, पावसाळ्यात अशा संसर्गजन्य आजारात वाढ होते.
विषमज्वर : हा एक प्रकारचा ताप असून दूषित अन्न आणि पाणी यापासून पसरतो. हा फक्त माणसाच्या विष्ठा पाण्यात मिसळून पसरणारा आजार आहे.
दूषित पाण्यामुळे उलटी व जुलाब यासारखे आजार होऊ शकतात. यामुळे शरीर कोरडे पडू शकते. दूषित पाण्यामुळे या रोगाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणात होतो. उदा. एकाच ओढ्यात कपडे धुणे, आंघोळ करणे, जनावरांना धुणे इ. साठी वापर केला, तर त्याचप्रमाणे उघड्यावरचे अन्न खाल्ल्याने, पाणी न गाळता, न उकळता तसेच न झाकलेले पाणी पिणे म्हणजेच स्वच्छतेचा अभाव, असल्यामुळे गॅस्ट्रोची लागण होण्यास सुरुवात होते.
लक्षणे
पोट दुखणे व वारंवार पातळ शौचास होणे.
उलटी होणे, लहान मुलांची टाळू खोल जाणे, डोळे खोल जाणे.
तोंड कोरडे पडणे वजनात घट होणे.
लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे.
उपाययोजना
पाणी उकळून व गाळून पिणे.
घराच्या परिसरातील स्वच्छता राखणे.
शौचाला जाऊन आल्यानंतर हात साबणाने धुणे.
जलसंजीवनी देणे. याने फरक न पडल्यास दवाखान्यात दाखवावे.
इतर उपाययोजना
गावातील पाणीपुरवठा योजनेची नियमित पाहणी करणे.
गावातील मुख्य टाकी नियमित धुऊन स्वच्छ करणे.
मुख्य पाईपलाईन ते टाकीपर्यंत पाईपलाईनमध्ये गळती आहे का ते पाहणे. टाकीवर नेहमी झाकण आहे का ते पाहावे.
पाण्याच्या टाकीचा परिसर स्वच्छ असावा.
शक्यतो हातपंपाचे पाणी, पायऱ्या नसणाऱ्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरावे किंवा सार्वजनिक विहिरीत टीसीएल टाकून ते पाणी पिण्यासाठी वापरावे; परंतु तिथे दररोज घाण होणार नाही याची काळजी घ्यावी.
-डॉ शितल जोशी